अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 04:44 PM2024-05-05T16:44:10+5:302024-05-05T16:44:10+5:30

अजित पवार यांनी काल विविध नेत्यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसंच महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला.

ajit pawar targets Supriya Sule on the last day of campaigning in baramati lok sabha seat | अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Ajit Pawar Speech ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात आज महाविकास आघाडी आणि महायुतीकडूनही प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दौंड तालुक्यातील वरवंड इथं सभा पार पडली. विशेष म्हणजे याच ठिकाणी काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली होती. आजच्या सभेत बोलताना अजित पवार यांनी काल विविध नेत्यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसंच महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला.

पाणीप्रश्नावरून सत्ताधारी राजकारण करत असल्याचा आरोप काल सुप्रिया सुळे यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, "कोण मायचा लाल दौंड, बारामती, इंदापूरचं पाणी आडवतो ते मी पाहते, असं काल कोणीतरी बोललं. अगं पण तिथं पाणीच नाही तर काय पाहते? अरे यांना काही माहिती नाही. आम्ही सगळी कामं करायचो. या राहुल कुल यांना विचारा, किती टीएमसीची धरणं आहेत, किती पाणी पुण्याला प्यायला जातं, किती पाणी शिल्लक राहतं? पाणीच शिल्लक नाही तर कोण अडवणार? अगं बाई आम्ही तुला निवडून द्यायचो, उगीच मला बोलायला लावू नका," असा इशारा अजित पवारांनी दिला आहे.

"मी तर ठरवलं आहे या भावकीवर बोलायचंच नाही. त्यांचं त्यांना लखलाभ. असं काही बोललं तर थोडा वेळ लोकांना बरं वाटेल, पण त्यातून लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत. तुमच्या शेतामध्ये पाणी आणण्यासाठी राज्याचा पैसा आणला पाहिजे, केंद्राचा पैसा आणला पाहिजे. बुडीत बंधारे बांधले पाहिजेत. पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला पाहिजे," असंही अजित पवार म्हणाले.

महेश भागवतांवर निशाणा

बारामती लोकसभा मतदारसंघातून ओबीसी बहुजन पक्षाकडून महेश भागवत हेदेखील निवडणूक रिंगणात आहेत. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी अजित पवारांनी प्रयत्न केले होते. मात्र भागवत यांनी राज्यसभेची मागणी केल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. "तुमच्या तालुक्यातील एक उमेदवार उभे आहेत. मी त्यांना सांगून दमलो, पण त्यांच्या अपेक्षा खूप होत्या. त्यांना मी सांगितलं की बँकेचा संचालक बनवतो, चेअरमन बनवतो, महामंडळ देतो, कॅबिनेट मंत्रि‍पदाचा दर्जा देतो. पण ते म्हणाले मला राज्यसभेचा खासदार करा. मग मी म्हटलं की, हे आपल्या डोक्याच्या पलीकडचं आहे," अशा शब्दांत अजित पवार यांनी महेश भागवत यांच्यावर निशाणा साधला.

Web Title: ajit pawar targets Supriya Sule on the last day of campaigning in baramati lok sabha seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.