प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 10:45 PM2024-05-17T22:45:10+5:302024-05-17T22:46:27+5:30

Lok Sabha Election 2024 : ही घटना उत्तर-पूर्व दिल्लीतील उस्मानपूर पोलीस स्टेशन परिसरातील करतार नगरमध्ये घडली.

kanhaiya kumar attacked during election campaign delhi youth who came to garland slapped, Lok Sabha Election 2024  | प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!

प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!

नवी दिल्ली : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान उत्तर-पूर्व दिल्लीतील काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कन्हैया कुमार यांना फुलांचा हार घालण्याच्या बहाण्याने आलेल्या तरुणाने त्यांना थप्पड लगावली. यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. 

ही घटना उत्तर-पूर्व दिल्लीतील उस्मानपूर पोलीस स्टेशन परिसरातील करतार नगरमध्ये घडली. यादरम्यान, आम आदमी पक्षाच्या महिला नगरसेवक छाया शर्मा यांच्याशीही गैरवर्तन करण्यात आले. याप्रकरणी महिला नगरसेवकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण कन्हैया कुमार यांच्या जवळ येतो आणि आधी त्यांना हार घालतो, त्यानंतर तो कन्हैया यांच्यावर हल्ला करताना दिसत आहे. मात्र, यावेळी उपस्थित कन्हैया कुमार यांच्या समर्थकांनी त्या तरुणाला लगेच पकडले. 

नगरसेवक छाया शर्मा यांनी आपल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, आज दुपारी ४ वाजता करतार नगर येथील सत्यनारायण भवन कौन्सिलर कार्यालय चौथा पुष्टा येथे  बैठक संपल्यानंतर सुमारे ७-८ जण आले. त्यांच्यापैकी दोघांनी इमारतीत प्रवेश करून कन्हैया कुमार यांना पुष्पहार घातला आणि जोरदार थप्पड लगावली. तसेच, त्यांनी माझी ओढणी पकडून कोपऱ्यात नेले, यानंतर त्यांनी मला आणि माझ्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच 30 ते 40 जणांवर काळी शाई फेकली. यामध्ये तीन ते चार महिला जखमी झाल्या, असे तक्रारीत म्हटले आहे. 

दरम्यान, उत्तर-पूर्व दिल्ली मतदारसंघातून काँग्रेसने कन्हैया कुमार यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपाने या जागेवरून मनोज तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. 25 मे रोजी लोकसभेच्या दिल्लीतील सर्व 7 जागांवर मतदान होणार आहे.

Web Title: kanhaiya kumar attacked during election campaign delhi youth who came to garland slapped, Lok Sabha Election 2024 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.