जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 10:07 PM2024-05-14T22:07:16+5:302024-05-14T22:07:50+5:30

'पहिल्या चार टप्प्यातील 380 जागांपैकी 270 जागा मिळवून PM मोदींनी पूर्ण बहुमत मिळवले आहे. आता पुढील लढाई 400 पार करण्यची आहे.'

Amit Shah On CAA : No power in the world can stop CAA; Amit Shah attacks TMC-Congress from Bengal | जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

Amit Shah On CAA : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी(दि.14) पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मतुआ समाजाचा बालेकिल्ला असलेल्या बनगाव येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी मतुआ समाजाच्या नागरिकत्वावरील चिंता दूर करण्याच्या प्रयत्न केला. शाहंनी त्यांना आश्वासन दिले की, या समाजाच्या सदस्यांना नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) अंतर्गत भारतीय नागरिकत्व दिले जाईल. 

जगातील कोणतीही शक्ती CAA रोखू शकत नाही
शाह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर CAA बद्दल खोटा प्रचार आणि अफवा पसरवल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, सीएए केंद्राचा कायदा आहे, त्यामुळे ममता बॅनर्जी याची  अंमलबजावणी कधीच थांबवू शकत नाहीत. आमच्या निर्वासित बांधवांना भारताचे नागरिक होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, हीच मोदींचे गॅरंटी आहे. ममता बॅनर्जी यांनी लक्षात ठेवावं की, नागरिकत्व केंद्र सरकारच्या अधिकारात आहे, राज्य सरकारच्या नाही. काँग्रेस म्हणते की, ते सत्तेत आल्यावर सीएए रद्द करणार, पण याला जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असे शाह यांनी स्पष्टपणे सांगितले

ममता बॅनर्जी खोटं बोलत आहेत
शाह पुढे म्हणाले की, ममता व्होट बँकेच्या राजकारणासाठी घुसखोरीला परवानगी देतात आणि सीएएला विरोध करतात. ममतांची व्होट बँक बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर आहेत. ममता व्होट बँक खूश करण्यासाठी हिंदू निर्वासितांना नागरिकत्व देण्यास विरोध करत आहेत आणि घुसखोरांच्या समर्थनार्थ CAA विरोधात रॅली काढत आहेत. ममता बॅनर्जी सीएएबाबत खोटी माहिती पसरवत आहेत. माटुआ समाजातील लोकांना मी हमी देतो की, सीएएमुळए कोणालाही कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला नागरिकत्व मिळेल आणि देशात सन्मानाने जगता येईल. 

30 जागा मिळताच ममतांचा काळ संपणार 
हावडा येथील एका जाहीर सभेत शाह यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला आणि बंगालमधील तृणमूल काँग्रेसची भ्रष्टाचाराची राजवट फक्त भाजपच संपवू शकते असे सांगितले. शाह म्हणाले की, टीएमसी राजवटीत घुसखोरी, बॉम्बस्फोट, सिंडिकेट राजवट आणि अराजकतेमुळे बंगालमधील परिस्थिती वाईट आहे. बंगालला या परिस्थितीतून नरेंद्र मोदी आणि भाजपच वाचवू शकते. लोकसभा निवडणुकीत बंगालला 30 जागा मिळताच ममतांचा काळ संपेल. चिटफंड घोटाळा, शिक्षक भरती घोटाळा, पालिका भरती घोटाळा, रेशन घोटाळा, गुरे आणि कोळसा तस्करीत गुंतलेल्यांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा. एकाही भ्रष्टाचाऱ्याला सोडले जाणार नाही, असा इशाराही शाहंनी टीएमसीला दिला.

Web Title: Amit Shah On CAA : No power in the world can stop CAA; Amit Shah attacks TMC-Congress from Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.