‘मिसळ’पे चर्चा पोहोचली थेट जेवणाच्या ताटापर्यंत; प्रचार टिपेला, घडामोडींना ऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 09:15 AM2024-05-05T09:15:19+5:302024-05-05T09:15:59+5:30

मतदारांना बाहेर काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कोल्हापूर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे शाहू छत्रपती व महायुतीचे संजय मंडलिक यांच्यात सरळ लढत होत आहे.

The discussion of 'misal' reached directly to the dinner plate; To the campaign tip, to the events | ‘मिसळ’पे चर्चा पोहोचली थेट जेवणाच्या ताटापर्यंत; प्रचार टिपेला, घडामोडींना ऊत

‘मिसळ’पे चर्चा पोहोचली थेट जेवणाच्या ताटापर्यंत; प्रचार टिपेला, घडामोडींना ऊत

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ लोकसभा मतदारसंघात प्रचार टिपेला पोहोचला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गाव टू गाव पिंजून काढला आहे. मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी स्थानिक पातळीवर स्वतंत्र यंत्रणा तयार असून, सुरुवातीच्या टप्प्यात सुरू असलेली ‘मिसळ पे चर्चा’ आता थेट जेवणाच्या ताटापर्यंत पोहोचली आहे.

कोल्हापूर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे शाहू छत्रपती व महायुतीचे संजय मंडलिक यांच्यात सरळ लढत होत आहे. आघाडीच्या उमेदवारांनी सुरुवातीच्या टप्प्यात काेल्हापूर शहरासह उपनगर व तालुक्याच्या ठिकाणी मिसळ पे चर्चेचे आयोजन करून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. महायुतीकडूनही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अनेक ठिकाणी मिसळ पे चर्चा आयोजित केली गेली. हातकणंगलेच्या तुलनेत कोल्हापूर मतदारसंघात मिसळ पे चर्चा जरा जादाच रंगली होती.

आता प्रचार अंतिम टप्प्यात आहे. रविवारी सायंकाळी जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून जेवणावळी वाढल्या आहेत. मतदानासाठी दोनच दिवस राहिल्याने जेवणासह मतदारांना खूश करण्यासाठी सर्व प्रकारची यंत्रणा सक्रिय झाली आहे. सोमवारी छुपा प्रचार राहणार असून, या दिवसात घडामोडींना ऊत येणार आहे.

हॉटेल, धाबे बुक....
उमेदवारांची यंत्रणा प्रत्येक तालुक्यात पोहोचणार नाही, त्यामुळे स्थानिक नेत्यांकडेच सगळी जबाबदारी दिली आहे. त्यांनी हॉटेल, धाबे बुक केले आहेत. सायंकाळी ५ वाजेपर्यंत जेवणावळीचे पास संबंधितांकडे पोहोचविले जातात.

...वाढदिवसाच्या आडून पंगती उठू लागल्या
उमेदवारांच्या सगळ्या हालचालींवर निवडणूक विभागाचे बारीक लक्ष असते. सभा, वाहनांसह इतर खर्चाची नोंद केली जाते. त्यामुळे निवडणूक विभागाच्या नजरेतून वाचण्यासाठी अनेक क्लृप्त्या केल्या जात आहेत. 
मंगल कार्यालयाबाहेर एखाद्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाचे डिजिटल फलक लावायचे आणि तिथेच पंगती उठवायच्या असे प्रकार सुरू आहेत.

Web Title: The discussion of 'misal' reached directly to the dinner plate; To the campaign tip, to the events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.