लोकसभेत प्रश्न मांडताना दिसले नाहीत, अमोल कोल्हे यांचा संजय मंडलिक यांच्यावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 12:25 PM2024-05-04T12:25:29+5:302024-05-04T12:27:10+5:30

'गॅस सिलिंडरकडे पाहून मतदानास जा'

Not seen raising questions in Lok Sabha, Amol Kolhe targets Sanjay Mandlik | लोकसभेत प्रश्न मांडताना दिसले नाहीत, अमोल कोल्हे यांचा संजय मंडलिक यांच्यावर निशाणा

लोकसभेत प्रश्न मांडताना दिसले नाहीत, अमोल कोल्हे यांचा संजय मंडलिक यांच्यावर निशाणा

कोल्हापूर : कोल्हापूरचे खासदार लोकसभेत जनतेचे प्रश्न मांडताना फारसे दिसले नाहीत, अशी टीका अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी रात्री शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक येथे झालेल्या सभेत केली. वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजी जेथे यांचे नाव आजही अभिमानाने घेतले जाते, पण स्वाभिमानाशी बेईमानी करणाऱ्यांना, तत्त्वाशी गद्दारी करणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान दिले जात नाही, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचार सभेत कोल्हे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी अजित खराडे होते.

स्वाभिमानाचा, समतेचा विचार देणाऱ्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात तत्त्व, निष्ठा, मूल्य यांना किंमत राहिलेली नाही. या गाेष्टी बाजारात विकत घेऊ शकतो हेच अलिकडील राजकारणाने दाखवून दिले आहे. प्रधानमंत्र्यांच्या दबावानंतर ही सगळी मूल्ये पन्नास खोक्यांना विकली जाऊ लागली आहेत. म्हणूच लाचार होऊन सरपटत जाणाऱ्या गर्दीत सहभागी व्हायचे की ताठ मानेने स्वाभिमानी फौजेबरोबर जायचे हे दोनच मार्ग आपल्यासमोर आहेत, असे कोल्हे म्हणाले.

प्रचार सभेतून आजकाल वैयक्तिक टीका केली जाऊ लागली आहे. जेव्हा वैयक्तिक टीका केली जाते तेव्हा समजायचे की समोरच्यांचा आत्मविश्वास ढळला आहे, असे सांगून कोल्हे म्हणाले की, केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातली, महाराष्ट्रातील अनेक उद्योग बाहेर गेले. महाराष्ट्राचा स्वाभिमान डिवचला गेला. परंतु महायुतीच्या राज्यातील ३९ खासदारांपैकी एकानेही लोकसभेत आवाज उठवला नाही. म्हणूनच तुम्हाला का निवडून द्यायचे असा प्रश्न त्यांना विचारण्याची वेळ आली आहे.

यावेळी शाहू छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, विक्रम जरग, चंद्रकांत यादव, चंद्रकांत सूर्यवंशी, दत्ता टिपुगडे, लालासो गायकवाड, संजय पवार यांची भाषणे झाली.

गॅस सिलिंडरकडे पाहून मतदानास जा

केंद्र सरकारने तरुणांना हक्काचा रोजगार देण्याऐवजी त्यांना ऑनलाइन गेमिंग सुरू करून दिले. त्यामुळेच मतदानाला जाताना या बेरोजगारांचा चेहरा पाहून बाहेर पडा, गॅस सिलिंडरला तीन वेळा नमस्कार करून बाहेर पडा, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Not seen raising questions in Lok Sabha, Amol Kolhe targets Sanjay Mandlik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.