औरंगाबादमध्ये कमी तर बीड, जालन्यात रेकॉर्डब्रेक मतदान; फायनल टक्केवारी झाली जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 12:22 PM2024-05-14T12:22:51+5:302024-05-14T12:48:56+5:30

खैरे-भुमरे-जलील, पंकजा मुंडे-सोनवणे, दानवे-काळे दिग्गज उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’ बंद

Record-breaking turnout in Aurangabad low, Beed, Jalna; Fate of veteran candidates 'EVM' off | औरंगाबादमध्ये कमी तर बीड, जालन्यात रेकॉर्डब्रेक मतदान; फायनल टक्केवारी झाली जाहीर

औरंगाबादमध्ये कमी तर बीड, जालन्यात रेकॉर्डब्रेक मतदान; फायनल टक्केवारी झाली जाहीर

छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड आणि जालना या तीन मतदारसंघात झालेल्या मतदानामध्ये चुरस दिसली. औरंगाबादमध्ये ६३.०७ टक्के मतदान झाले. बीडमध्ये ७०.९२ टक्के तर जालन्याची मतदानाची टक्केवारी ६९.१८ इतकी राहिली.

औरंगाबादमध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील, उद्धवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि शिंदेसेनेचे संदिपान भुमरे यांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले. जालन्यात रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांचे तर बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्या भवितव्याचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे.

बीडमध्ये यावेळी रेकॉर्डब्रेक सुमारे ७०.९२ टक्के इतके मतदान झाले. जालन्यानेही २०१९ च्या निवडणुकीचे रेकॉर्ड मोडले. तिन्ही मतदारसंघात सकाळी ७ पासून मतदान सुरू झाल्यानंतर सकाळी काही ठिकाणी मतदानाचा जोर दिसला. दुपारनंतर गर्दी ओसरली. सायंकाळी ५ वाजेनंतर मतदानासाठी गर्दी वाढली. मतदानाची वेळ संपून गेल्यानंतरही अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. वाळूज महानगरासह ग्रामीण भागातील अनेक मतदान केंद्रांवर रात्री आठ वाजेनंतरही मतदान चालू होते. हीच परिस्थिती बीड आणि जालना मतदारसंघातही दिसली.

तिरंगी लढतीची मोठी चर्चा
औरंगाबादच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता छत्रपती संभाजीनगर शहरात दिसली. महायुतीचे संदिपान भुमरे, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यातील लढतीत कुणी कुणाची मते कापली याची गणिते मांडण्याचे काम रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते करताना दिसले. बीडमध्ये भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे आणि जालन्यात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे या दोन नावांमुळे या मतदारसंघातील लढतीकडे पूर्ण राज्याचे लक्ष लागून होते.

असे झाले मतदान
औरंगाबाद: ६३.०७ टक्के,
(२०१९-६३.४८ टक्के)
बीड: ७०.९२ टक्के
(२०१९- ६६.१७ टक्के)
जालना: ६९.१८
(२०१९- ६४.५५)

Web Title: Record-breaking turnout in Aurangabad low, Beed, Jalna; Fate of veteran candidates 'EVM' off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.