'गुरूतुल्य संजय राऊतांच्या येण्याने ताण कमी', सुषमा अंधारेंना मिळाली पोच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 06:26 PM2022-11-11T18:26:42+5:302022-11-11T18:53:40+5:30

पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर १०० दिवसांनी जामीन मिळाला आहे. संजय राऊतांच्या जामीनानंतर राज्यभरात शिवसैनिकांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर १०० दिवसांनी जामीन मिळाला आहे. संजय राऊतांच्या जामीनानंतर राज्यभरात शिवसैनिकांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

संजय राऊत यांचे सुटकेनंतर सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले. आर्थर रोड तुरुंगाबाहेर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती. तर, आतषबाजी करत राऊतांचे शिवतिर्थवर स्वागत करण्यात आले.

संजय राऊत यांच्या सुटकेनंतर महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त केला. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) म्हणाल्या की, आम्ही सगळे जण आनंद व्यक्त करण्यासाठी जमलो आहोत. टायगर इज बॅक, हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. यावेळी बोलताना त्यांना रडू कोसळलं होतं.

तब्बल १०२ दिवसांनी आमच्या कुटुंबातील महत्त्वाचा सदस्य बाहेर येत आहे. मरण पत्करेन, शरण नाही असं सांगणारा आमचा नेता परतला आहे. लढाई सुरू असताना सेनापती, सरदार असणे गरजेचे असते. काळ पालटणार नाही असं ज्यांना वाटलं त्यांना कळालं असेल शिवसेना विचार आहे कधीही संपणार नाही. शिवसेना दुपटीने तेवढेच आमदार आणण्याची ताकद ठेवते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

सुषमा अंधारे यांनी आज संजय राऊत यांच्या भांडूप येथील घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी, त्यांच्यासमवेत औपचारीक गप्पाही मारल्या. त्यांच्या कुटुंबासमवेत त्यांनी सेल्फी घेतले आणि संजय राऊत हे मला गुरूतुल्य असल्याचंही त्या म्हणाल्या. यावेळी, विधानपरिषद विपक्ष नेते अंबादास दानवेही उपस्थित होते.

शिवसेनेतील सगळ्यात लांब पल्ल्याची तोफ,गुरुतुल्य व्यक्तिमत्व सन्माननीय संजय राऊत साहेबांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बऱ्याच दिवसानंतर मनमोकळ्या गप्पा झाल्या.

तब्बल 102 दिवस मला पक्षात येऊन झालेत आणि तब्बल 102 दिवसांनी सन्माननीय राऊत साहेब हे आमच्या सगळ्यांना भेटीसाठी उपलब्ध झालेत हा एक योगायोगच म्हणावा परंतु एक नक्की राऊत साहेबांच्या येण्याने खूप ताण कमी झाल्यासारखा वाटत आहे, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटलं.

थोडेसे हलके वाटत आहे आणि सोबतच शिवसेनेची ताकद दहा पटीने वाढली आहे. राऊत साहेबांना म्हटलं, सर आम्ही खारीचा वाटा उचलायचा प्रयत्न केला आमच्या आमच्या परीने खिंड लढवली फार मोठे काही नाही केलं, असे सुषमा अंधारे यांनी फेसबकवरुन सांगितले.

राउत साहेब उत्तरले, तुम्ही ही खिंड निकराने लढलात म्हणजेच ही देखील पावनखिंड झाली. यासारख्या एका छोट्या शिवसैनिकांसाठी ही फार मोठी पोच आहे, असेही सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियातून म्हटले आहे.