वसंत मोरेंना पाहताच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी कार थांबवली अन्...; काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 10:38 PM2022-08-22T22:38:43+5:302022-08-22T22:43:43+5:30

पुण्यातील मनसेचे डॅशिंग नगरसेवक वसंत मोरे गेल्या अनेक महिन्यांपासून माध्यमांत चर्चेचा विषय आहेत. याचं कारणही तसेच आहे. मुंबईतील गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी हिंदुत्वाची प्रखर भूमिका घेत थेट मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत हनुमान चालीसा आंदोलन छेडलं. या आंदोलनावर वसंत मोरेंनी जाहिरपणे नाराजी व्यक्त केली होती.

वसंत मोरे यांच्या विधानानंतर मनसेत त्यांच्याविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यानंतर पुण्यातील मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. त्यानंतर वसंत मोरे मनसे सोडणार अशा चर्चा सुरू झाल्या. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही वसंत मोरेंना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. परंतु त्याचवेळी मनसेनं तातडीने शहराध्यक्षपदावरून वसंत मोरे यांना हटवून साईनाथ बाबर यांची निवड केली. त्यानंतर वसंत मोरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.

राज यांच्या भेटीनंतर वसंत मोरे यांनी मनसेत राहणार असल्याचं स्पष्ट केले. राज ठाकरेंवर माझं खूप प्रेम आहे. मनसे सोडणार नाही असं मोरे यांनी म्हटलं. त्यानंतर मोरे यांनी कात्रज भागात मनसेचे नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी घेतली. तब्बल २ महिन्यांनी राज ठाकरे यांच्या तब्येत ठीक झाल्यानंतर आता ते पक्ष संघटनेत सक्रीय झाले आहेत. आज मुंबईत मनसे नेते, सरचिटणीसांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर घडलेल्या एका प्रसंगाने सगळ्यांचे लक्ष वेधलं.

राज ठाकरे बैठक आटोपून निघत असताना गाडी गेटबाहेर पडत होती. तेव्हा त्याठिकाणी वसंत मोरे काही कार्यकर्त्यांसह तिथे उपस्थित होते. तेव्हा गाडी थांबवून वसंत मोरे यांना राज ठाकरेंनी हाक दिली. त्यानंतर ते जवळ जाताच त्यांना कारमध्ये बसण्यास सांगितले. मोरेदेखील कारमध्ये पुढील सीटवर बसले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

याबाबत वसंत मोरे म्हणाले की, राज ठाकरेंच्या मनात वसंत मोरे आहे. दोन-तीनदा राज ठाकरेंसोबत गाडीत बसलो होतो. पर्यावरण शहराध्यक्षांच्या अहवालाचं प्रकाशन करायचं होतं. तेव्हा साहेबांनी घरी जात असताना मला बस म्हटलं. या प्रसंगाने मला १०-१२ वर्षापूर्वीच्या एका घटनेची आठवण झाली.

जेव्हा खडकवासल्याचे मनसेचे आमदार रमेश वांजळे साहेबांसोबत कारमध्ये होती. तेव्हा ताफा जात असताना अचानक वाहनांचा ताफा थांबला. त्यानंतर सुरक्षा रक्षक मला शोधत शोधत आले. तेव्हा मी १० व्या नंबरवर माझी गाडी होती. बॉडीगार्डनं साहेबांनी बोलावल्याचा निरोप दिला. मग मी पळत पळत पुढे गेलो. तेव्हा त्यांनी कारमध्ये बसण्यास सांगितले हे आठवलं.

तब्बल २ महिन्यांनी माझी आणि राज साहेबांची भेट झाली. साहेब आजारी होते. मागे भेटलो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ताण दिसत होता. आज मला साहेबांना पाहून खूप बरे वाटले. आज साहेबांच्या चेहऱ्यावर अजिबात ताण नव्हता. घरापर्यंत जात बऱ्याच गप्पागोष्टी झाल्या अशी माहिती वसंत मोरे यांनी दिली.

आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात मनसेही सक्रीय झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेते, सरचिटणीस यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीनंतर मनसेनं विविध लोकसभा मतदारसंघनिहाय निरीक्षक नेमले आहेत.

त्यात पुणे ग्रामीण भागातील मावळ, शिरुर आणि बारामती लोकसभेसाठी पक्षाने पुण्यातील नेत्यांना जबाबदारी दिली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सहीनं पत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात बारामती लोकसभा मतदारसंघात वसंत मोरे, सुधीर पाटसकर, रणजित शिरोळे यांना निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

३ महिन्यापूर्वी शिवतीर्थवरील बैठकीत वसंत मोरे यांची समजूत काढण्यात राज ठाकरे यांना यश आले. त्यानंतर कात्रज भागात मनसेचे नगरसेवक निवडून आणणार या भूमिकेतून ते काम करू लागले. त्यातच वसंत मोरे यांना राज ठाकरेंनी नवी जबाबदारी देत बारामती लोकसभा मतदारसंघात निरीक्षक म्हणून पाठवलं आहे.