'शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र मंत्रालय अन् विधानभवन परिसरात लावावे'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 07:42 PM2020-12-31T19:42:26+5:302020-12-31T19:55:49+5:30

शिवसेनाप्रमुखांनी जाज्वल्य हिंदुत्वाचा विचार कानाकोपऱ्यातल्या माणसांपर्यंत पोहचवून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्वाचे चैतन्य निर्माण केले.

मराठी माणसांच्या मनात आणि देशभरातील हिंदूंच्या ह्रदयात आजही बाळासाहेबांचं अजरामगर स्थान आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची येत्या दि,23 जानेवारीला जयंती आहे. त्यापूर्वी शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र मंत्रालय व विधानभवन परिसरात लावावे अशी मागणी उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे.

कांदिवली पश्चिम येथील पोयसर जिमखान्यात दि,23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती संयुक्तपणे आपण स्वतः साजरी करतो असे देखिल त्यांनी पत्रात नमूद केले.

भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या 96 व्या जयंतीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली नसल्याने सोशल मीडियावर टीकास्त्र करण्यात आले होते. या श्रेणीत आपण स्वतःला जोडून घेत नाही हे त्यांनी स्पष्ट केले.

वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपाचे राष्ट्रीय नेते मुंबईत आल्यावर मातोश्रीवर येऊन शिवसेनाप्रमुखांना भेटत असत. या दोन महान नेत्यांची भेट म्हणजे राष्ट्रीय विचारांचे मिलन असे कोट्यावधी राष्ट्रप्रेमींना वाटायचे

हिंदुत्व म्हणजे या गौरवशाली देशाची केवळ ओळखच नाही,तर या महान देशाचा श्वास,नाडी व आत्माच आहे. भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांनी आपल्या पद व प्रतिष्ठेचा न करता ,हिंदुत्व बळकट करण्यासाठी गेली 25 वर्षे प्रयत्नशील राहिले.

अटलबिहारी वाजपेयी हे हिंदुत्वाचे प्रतिकच होते तसेच ते प्रखर राष्ट्रप्रेमींचे अग्रणी मानले जातात. या नेत्यांचा सन्मान आज आपण सर्वांनी केला तर उद्याची पिढी या नेत्यांचा मान सन्मान राखतील असे खासदार शेट्टी यांनी पत्रात शेवटी नमूद केले.

भाजपाकडून शिवसेनेला सातत्याने हिंदुत्वाचे धडे देण्यात येताता, त्यातच भाजपा खासदाराने आता बाळासाहेबांच्या तैलचित्राचा मुद्दा उपस्थित केला आहे.

भाजपा खासदार शेट्टी यांच्या पत्रावर राज्य सरकारकडून काय प्रतिक्रिया येते हेच पाहणे औत्सुक्याचे ठरेल