Mumbai Local: अ‍ॅपद्वारे लोकलचा पास डाऊनलोड करु शकणार; स्मार्टफोन नसलेल्या नागरिकांनाही दिला पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 08:57 PM2021-08-08T20:57:36+5:302021-08-08T21:28:45+5:30

मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा दोन्ही लस घेतलेल्या नागरिकांसाठी येत्या १५ ऑगस्टपासून सुरू करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला.

यावेळी मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा दोन्ही लस घेतलेल्या नागरिकांसाठी येत्या १५ ऑगस्टपासून सुरू करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना आपण १५ ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करता येईल. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी एका मोबाईल एपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. त्या अॅपबाबत लवकरच माहिती दिली जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. आपणा सर्वास माहीतच आहे की अद्याप आपण दुसऱ्या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे. केंद्र सरकारने देखील आपणास वारंवार याबाबत इशारा दिला आहे. मात्र, तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

गेल्या वर्षी एक वर्षभरामध्ये संकट नाहीसे होईल असं वाटत होतं. पण संकट अजून जाता जात नाही, कमी जास्त प्रमाणामध्ये या लाटा येत जात आहेत. किती लाटा येतील किती वेळा आपल्यावर धडकणार आहेत याचा अजूनही अंदाज देता येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या स्वातंत्र्यदिनाच्या आठ दिवस आधीच मी आपल्याला एक नम्र विनंती करते की तो सगळा संघर्ष त्याच्या नुसत्या आठवणी जागवून उपयोग नाही. कोरोनाची दहशतची टांगती तलवार अजूनही आपल्यावर आहे. तिचा कायमस्वरूपी नायनाट करावाच लागेल” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

काहींनी मंदिरे, हॉटेल, मॉल्स उघडण्याची मागणी केली. याबाबतचा निर्णय येत्या ८ दिवसांत घेण्यात येईल. उद्या टास्क फोर्सची बैठक होत आहे. त्यामध्ये आढावा घेऊन त्यांच्या सल्लामसलतीनंतर मंदिरे, मॉल उघडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. गर्दी टाळा, गर्दी झाल्यानं रुग्णवाढ होते, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला.

लसीकरण काही टप्प्यांपर्यंत पूर्ण होत नाही तोवर कोरोनाचे नियम आपल्याला पाळावे लागणार आहेत. राज्यातील काही भागात कोरोना आटोक्यात आहे. मात्र, काही ठिकाणी अद्याप परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. यामध्ये पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. यंदा सण उत्सव तोंडावर आहेत. ही सारी परिस्थिती पाहून निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.