घुसखोरांच्या विरोधात मनसेचा भगवा एल्गार; राज ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 03:52 PM2020-02-09T15:52:52+5:302020-02-09T16:11:44+5:30

पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेने महामोर्चा आयोजित केला आहे. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा हा मोर्चा काढण्यात आला. राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात लाखो मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मनसेच्या मोर्चासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्थेची खबरदारी घेतली आहे. मेट्रो सिनेमा चौकातून मनसेच्या मोर्चा विभागण्यात आला. महापालिका मार्गाहून राज ठाकरे आणि अन्य व्हीआयपी नेत्यांना प्रवेश देण्यात आला तर कार्यकर्त्यांना फॅशन स्ट्रीटच्या मार्गाने पुढे जाण्यास सांगितले.

मनसेच्या महामोर्च्याआधी राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. या मोर्चाला राज ठाकरेंचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले आहे.

मनसेच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी हिंदुत्ववादी वकील संघटनाही सहभागी झाली होती.

तत्पूर्वी मनसेच्या महामोर्चाआधी मनसे पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकामध्ये जाऊन दर्शन घेतले.

दरम्यान, मनसेच्या मोर्चाचा शिवसेनेला फटका बसणार नाही, बाळासाहेब ठाकरे यांचेच मुद्दे मनसे पुढे घेऊन जात आहे, पाकिस्तानी, बांग्लादेशी हे मुद्दे आत्ताच का आठवले? गेली १४ वर्ष मनसे कुठे होती? मनसेची भूमिका सतत बदलणारी आहे अशी टीका शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी केली होती.

तर उद्धव ठाकरेंकडे पाहून शिवसेनेला मतदान करत नव्हते तर बाळासाहेबांना मानणारे, त्यांच्या हिंदुत्वाकडे पाहून शिवसेनेला मतदान करत होते. मात्र उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे अनेक शिवसैनिक नाराज आहेत. शाखाप्रमुख ते सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे दुखावला गेला आहे असा टोला मनसे नेते अविनाश जाधव यांनी शिवसेनेला लगावला.

मनसेच्या या मोर्चासाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. यामध्ये काही चिमुरड्यांचाही समावेश होता.