Mansukh Hiren Case: 'मनसुख हिरेन घरातून निघाले तेव्हा...'; धक्कादायक माहिती समोर, प्रकरण वेगळ्याच वळणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 12:45 PM2021-03-10T12:45:42+5:302021-03-10T12:59:23+5:30

Mansukh Hiren Case: Stolen a Gold Chain, a Ring and a Credit card : विरोधी पक्षांनी केलेल्या मागणीनुसार हा तपास केंद्रीय गृह विभागाने एनआयएच्या मुंबई विभागाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय गृह विभागाने उद्योगपती मुकेश अंबानी Mukesh Ambani यांच्या घराच्या परिसरात आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविला आहे. सोमवारी त्याबाबतचे आदेश मिळाल्यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी फेर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

दहशतवादी संघटनांकडून हे कृत्य करण्यात आल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. २५ फेब्रुवारीला घडलेल्या या प्रकाराबाबत गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला त्याचा तपास मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेकडून, तर मागील तीन दिवसांपासून दहशतवादी विरोधी पथकाकडून (एटीएस) करण्यात येत होता.

दक्षिण मुंबईतील पेडर रोडवरील अभेद्य सुरक्षाव्यवस्था असलेल्या अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यापासून काही मीटर अंतरावर एक निनावी महिंद्रा स्कार्पिओ आढळून आली होती. त्यामध्ये जिलेटीनच्या २५ कांड्या व अंबानी कुटुंबियांसाठी धमकीचे पत्र सापडले होते. त्याचे गूढ उलगडण्यापूर्वीच आरोपींनी वापरलेल्या त्या स्कॉर्पिओचे मूळ मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren Case) यांचा ५ मार्चला मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार एटीएसने अनोळखी इसमावर हत्येचा गुन्हा दाखल केला.

अँटिलिया बंगल्याच्या परिसरातील कॅमेऱ्यातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. परिसरातील नागरिक, तसेच कारमध्ये सापडलेल्या बनावट नंबर प्लेट व अन्य कागदपत्रांचा छडा लावण्यात येत आहे. मात्र, त्यातून कोणतीही ठोस माहिती अद्याप पुढे आलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी केलेल्या मागणीनुसार हा तपास केंद्रीय गृह विभागाने एनआयएच्या मुंबई विभागाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला.

मात्र या प्रकरणाचा तपास सुरु असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनसुख हिरेन Mansukh Hiren जेव्हा घरातून बाहेर पडले होते. तेव्हा त्यांच्या गळ्यात दीड तोळ्याची सोन्याची चैन होती. हातात सोन्याची अंगठी होती, काही रोख रक्कम व पाच ते सहा कंपनीचे डेबिट व क्रेडिट कार्ड होते. जेव्हा त्यांचा मृतदेह सापडला होता तेव्हा घटनास्थळी या सर्व गोष्टी गायब होत्या, त्यामुळे मनसुख यांची हत्या झाली असावी असा संशय वाढत चालला आहे.

दरम्यान, मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात (Mansukh Hiren Case) अडचणीत आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांची गुन्हे शाखेतून उचलबांगडी करण्यात आली आहे. सचिन वाझेंवर Sachin Vaze हिरेन यांच्या पत्नीनं खुनाचा आरोप केला आहे. तरीही ते या पदावर ठेवलं जात असल्यास पुरावे नष्ट केले जाऊ शकतात.

वाझेंना पाठिशी घालण्याचं कारण काय, असा सवाल भारतीय जनता पक्षाकडून उपस्थित करण्यात येत होता. अखेर या प्रकरणी ठाकरे सरकारला बॅकफूटवर जावं लागलं. वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी विधान परिषदेत केली.

व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरून विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या तक्रार अर्जाचा हवाला देत पोलीस अधिकारी सचिन वाझे Sachin Vaze यांच्यावर गंभीर आरोप केले.

मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार मनसुख हिरेन यांचा खून झाला असावा, तसेच तो सचिन वाझे यांनी केला असावा. हिरेन यांना सचिन वाझे आधीपासून ओळखत होते. तसेच हिरेन यांची कार चार महिन्यांपासून सचिन वाझेंकडे होती, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.