Maharashtra Unlock: राज्यात निर्बंध शिथिल होणार; लोकल प्रवासाबाबतही उद्धव ठाकरे यांनी दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 02:37 PM2021-08-02T14:37:27+5:302021-08-02T17:21:45+5:30

Maharashtra Unlock: कोरोनाबाधितांची संख्या कमी असलेल्या झोनमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज अध्यादेश काढला जाईल, असं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असताना कोरोनाचे निर्बंध शिथिल होणार का? असा प्रश्न आता प्रत्येकजण विचारत आहे. या संदर्भात आता महत्वाची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

कोरोनाबाधितांची संख्या कमी असलेल्या झोनमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज अध्यादेश काढला जाईल, असं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीमधील पत्रकारपरिषदेत बोलताना सांगितलं आहे. तसेच लोकल ट्रेनच्या प्रवासाबाबतही उद्धव ठाकरे यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या वाढल्यानंतर पुन्हा एकदा राज्यांत निर्बंध लावण्यात आले. यावेळी सर्वसामान्य नागरिकांनाही लोकल ट्रेनने प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली होती.

यानंतर आता दुसरी लाट बहुतांश प्रमाणात ओसरताना दिसत असली, तरी राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीत. दुसरीकडे कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तरी मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र लोकलमध्ये तूर्तास सर्वांना प्रवेश देणं शक्य नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, राज्यात शनिवारी ७ हजार ४७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ६० लाख ९० हजार ७८६ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात शनिवारी ६ हजार ९५९ रुग्णांचे निदान झाले असून, २२५ मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ७९ लाख ६७ हजार ६०९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.१४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात ४ लाख ७६ हजार ६०९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत, तर ३ हजार १६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात रुग्ण बरे हण्याचे प्रमाण ९६.६२ टक्के झाले असून, मृत्यूदर २.१ एवढा आहे. सध्या राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६३ लाख ३ हजार ७१५ झाली असून, १ लाख ३२ हजार ७९१ आहे.

दिवसभरात नोंद झालेल्या २२५ मृत्यूंमध्ये मुंबई ९, ठाणे मनपा २, नवी मुंबई मनपा ५, वसई विरार मनपा ३, रायगड ३, नाशिक ५, नाशिक मनपा ५, मालेगाव २, अहमदनगर १९, अहमदनगर मनपा १, जळगाव २, जळगाव मनपा १, पुणे ४, पुणे मनपा ४, पिंपरी चिंचवड मनपा २, सोलापूर ४, सातारा १३, कोल्हापूर ९, सांगली २२, सिंधुदुर्ग ५, रत्नागिरी २५, औरंगाबाद ५९, औरंगाबाद मनपा २, उस्मानाबाद १, बीड ५, यवतमाळ ४, बुलडाणा २, नागपूर १, नागपूर मनपा ६ इ. रुग्णांचा समावेश आहे.