Chembur Landslide News and Photos: मुंबईत पावसाचं थैमान! कुठं लॅंडस्लाईड, कुठं भिंत कोसळली, तर कुठं झाडांची पडझड; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 12:05 PM2021-07-18T12:05:52+5:302021-07-18T12:15:41+5:30

Chembur Landslide News and Photos: चेंबूर भागात मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळच्या सुमारास काही घरांवर दरड कोसळल्याची घठना घडली आहे.

मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागांत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. (Chembur Landslide News and Photos)

चेंबूर भागात मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळच्या सुमारास काही घरांवर दरड कोसळल्याची घठना घडली आहे. यात १४ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत पाच घरे पडली आहेत. दोन घरांतून मलबा काढण्यात आला आहे. तर तीन घरांतील मलबा काढणे अद्याप बाकी आहे.

विक्रोळी भागात एक इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू झल्याचे आणि भांडूप भागातही एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय, फोर्ट परिसर, कल्याण, भांडूप, अंधेरी, बोरिवली, कांदिवली या परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले.

तसेच, भांडूप पंपिंग स्टेशनच्या भिंतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू आणि काही जण जखमी झाल्याचे समजते. तसेच, मुसळधार पावसाचा भांडुप पंपिंग स्टेशनच्या वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.

ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील भिंत खचल्यामुळे जवळ उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले आहे.

तसेच ठाणे राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे आगार क्रमांक २ खोपट येथील बस आगारात मोठ्या प्रमाणात पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

पालघर जिल्ह्यातही पावसाने धुमाकूळ घातला असून, रेल्वे सेवा, बस सेवा बाधित झाल्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाल्याचे सांगितले जात आहे.

मध्यरात्री पडलेल्या पावसाचा परिणाम वाहतुकीवरही झाला असून, अनेक भागांतील रस्ते जलमय झाल्यामुळे प्रवासात अडथळे येत आहेत.

सायनचे गांधीमार्केट परिसरातही पाणी साचले आहे. सायनमध्ये पाणी साचल्याने या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

जोरदार पावसामुळे मुंबईतील हिंदमाता आणि इतर सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.

बोरिवली पूर्वेकडील शांतीवन भागात दहिसर नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे या भागात पूरसदृश्य परिस्थिती झाल्याचे पाहायला मिळाले.

दुसरीकडे कांदिवली पूर्व भागातही जोरदार पाऊस पडल्यामुळे रहिवासी भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. यामुळे नागरिकांची झोपमोड तर झालीच शिवाय त्यांना संसार वाचवण्यासाठी धावपळही करावी लागल्याची माहिती मिळाली आहे.