मुख्यमंत्री शिंदेंची संघ मुख्यालयास भेट, संजय राऊतांनी शिकवला धडा, डागली तोफ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 12:06 PM2022-12-29T12:06:23+5:302022-12-29T12:39:22+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज रेशीमबागेत भेट दिली. यावेळी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सोबत होते.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संपूर्ण राज्य सरकार नागपूर मुक्कामी आहे. हा मुहूर्त साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपाच्या सर्व मंत्री व आमदारांना ‘बौद्धिक’ मेजवानी देण्यात येते.

मंगळवारी रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात हा उद्बोधन वर्ग झाला. या वर्गाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही येतील, असे गिरीश महाजन यांनी म्हटले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज रेशीमबागेत भेट दिली. यावेळी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सोबत होते.

एकनाथ शिंदे हे जुने स्वयंसेवक आहेत, असे गिरीश महाजन यांनी म्हटलं होते. आता, मुख्यमंत्र्यांनीही येथील भेटीनंतर बोलताना माध्यमांना ही माहिती दिली.

आज मी संघाचे मुख्य कार्यालयाला भेट दिली, तसेच हेडगेवार स्मृतीस्थळालाही भेट दिली. येथे भेट दिल्यानंतर खूप छान वाटलं, एक वेगळीच उर्जा याठिकाणी मिळते.मी लहान असताना संघाच्या शाखेत आलेलो.

त्यामुळे, यात काही राजकिय हेतू नाही. आम्ही दोघं एकत्र आहोत, राजकारणात शिवसेना-भाजप युती आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेशीमबागेतील आपल्या भेटीनंतर दिले.

एकनाथ शिंदेंच्या नागपूर संघ मुख्यालयातील भेटीनंतर संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला. ट्विटरवरुन फोटो शेअर करत राऊत यांनी शिंदेंना निष्ठेचा पाठ शिकवला आहे.

रेशिमबागेत जाऊन आलात आनंद आहे! या वास्तू सोबत लाखो स्वयंसेवक वर्षानुवर्षे एकनिष्ठ आहेत. त्यांनी कधीही संघ किंवा मुख्यालय हडप करण्याचा नीच प्रयत्न केला नाही, असे म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर तोफ डागली.

शिंदेंनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडखोरीवरुन संजय राऊत यांनी भाजप आणि संघा परिवारातील स्वयंसेवकाचे उदाहरण दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संघटनेप्रती निष्ठा काय असते हे ही शिकून घेतले असते तर अजून बरे वाटले असते. जय महाराष्ट्र!, असेही राऊत यांनी म्हटले.

दरम्यान, २०१४ सालापासून संघाकडून भाजप आमदारांसाठी अधिवेशनकाळात नागपूर येथे उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात अधिवेशनच न झाल्याने हा वर्ग झाला नव्हता.