राज ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या साथीनं शिवसेनेला टक्कर; 'असं' आहे भाजपाचं मिशन मुंबई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 04:06 PM2022-08-31T16:06:12+5:302022-08-31T16:10:39+5:30

महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंच्या हातून सत्ता हिसकावून घेतल्यानंतर भाजपा राज ठाकरेंच्या साथीनं मुंबई महानगरपालिका (BMC) काबीज करण्याकडे लक्ष देत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने बीएमसीवर तब्बल साडेतीन दशके वर्चस्व राखून ठेवले आहे.

अशा परिस्थितीत बदललेल्या राजकीय वातावरणात भाजपा राज ठाकरेंचा पक्ष मनसेशी हातमिळवणी करून शिवसेनेला BMC तून हद्दपार करण्याचा प्रयत्न करत आहे. बीएमसीवर कब्जा करणे हे मुंबईवर राज्य करून राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याचे भाजपाचा मनसुबा आहे. शिवसेनेची सुरुवात मुंबईतूनच झाली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी मुंबईतील स्थानिक भूमिपुत्रांच्या बाजूने आवाज उठवला. शिवसेनेची स्थापना १९६६ मध्ये झाली आणि केवळ पाच वर्षांनंतर १९७१ मध्ये, पक्षाला बीएमसीमध्ये डॉ. एस एस गुप्ता यांना महापौर बनवता आले. यानंतर शिवसेनेने मागे वळून पाहिले नाही.

१९८५ मध्ये शिवसेनेने बीएमसीवर आपले वर्चस्व इतके मजबूत केले की ते पुन्हा कोणीही मोडू शकले नाही. राज्यातील बदललेल्या राजकीय वातावरणात शिवसेनेच्या या भक्कम बालेकिल्ल्याला खीळ घालण्याचा डाव भाजपने आखला असून, त्यासाठी राज ठाकरेंना सोबत घेण्याचा प्रयत्नही सुरु केला आहे. वारंवार होणाऱ्या उच्चस्तरीय बैठका याचे संकेत देत आहेत.

महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. त्याच्या एक दिवस आधी, सोमवारी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली. त्याचदिवशी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे मलबार येथील निवासस्थानी पोहोचले होते. भाजप नेत्यांची राज ठाकरेंसोबतची वाढती मैत्री बीएमसी निवडणुकीशी जोडली जात आहे.

२०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने एकट्याने BMC ची निवडणूक लढवली होती आणि २२७ जागांपैकी त्यांना ८४ जागा मिळाल्या होत्या, तर भाजपाचे ८२ नगरसेवक विजयी झाले होते. त्यावेळी भाजपानं सत्ता स्थापनेसाठी कुठलेही प्रयत्न न केल्यानं शिवसेनेला महापौर बसवणं सोप्पे गेले. परंतु यावेळी महाराष्ट्राप्रमाणे मुंबईतही शिवसेनेच्या हातून सत्ता हिसकावून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

या परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि राज ठाकरे यांच्या साथीनं शिवसेनेची मराठी व्होटबँक काबीज करण्याची भाजपची रणनीती आहे. सध्या बीएमसी निवडणुकीबाबत भाजपा आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे.

उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडला आक्रमक टक्कर देऊ शकणारा तगडा वक्ता राज ठाकरेंमध्ये भाजपला दिसतो. अशा स्थितीत राज ठाकरे जागा जिंकणार नसले तरी भाजपासाठी संजीवनी ठरू शकतात हे भाजपलाही ठाऊक आहे. राज ठाकरेंच्या सभांमुळे महाविकास आघाडीच्या विरोधात वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.

भाजपाला राज ठाकरे यांच्या मनसेला महाराष्ट्राच्या शिंदे मंत्रिमंडळात स्थान द्यायचे आहे जेणेकरून बीएमसीच्या निवडणूक युतीसाठी ते मजबूत भूमिका बनू शकतील. राज ठाकरे यांनी एकट्याने निवडणूक लढवून आपले राजकीय भवितव्य पाहिले आहे आणि आता त्यांना भाजपासोबत जात मजबूत होण्याची संधी दिसत आहे,

या स्थितीत भाजपा बीएमसी निवडणुकीत ३०-३५ जागा देऊन मनसेसोबत युतीची तयारी करू शकते, कारण शिंदे गटालाही जागा दिल्या जाणार आहेत. सर्वात मोठा पक्ष म्हणून जिंकून मुंबईत आपला महापौर बनवता यावा यासाठी भाजपला १५० जागा स्वत:साठी ठेवायच्या आहेत.

परंतु मनसेच्या एका नेत्यानं सांगितले की, “मनसेला बीएमसी निवडणूक लढवायची आहे. पण भाजपा आणि शिंदे गटाची युती वाजवी असावी. पक्षाचा दुसरा नेता म्हणाला, “राजसाहेब भाजपाला शरण जाणार नाहीत. हे त्याच्या अटी आणि शर्तींवर असेल असं म्हटलं आहे. त्यामुळे मनसे-भाजपा युती होईल की नाही यावर अद्याप कुणीही अधिकृत भाष्य करत नाही.