बाबाभाईसारख्यांमुळेच माणूसकीवरचा विश्वास अढळ, IPS अधिकाऱ्यांनं केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 01:21 PM2020-08-24T13:21:55+5:302020-08-24T13:28:52+5:30

अहमदनगर जिल्ह्याती बाबाभाई पठाण यांनी आपल्या कृतीतून माणूसकी व हिंदू -मुस्लीम एकतेचा संदेश जगाला दिलाय. मानलेल्या हिंदू बहिणीच्या दोन मुलींच्या पालनपोषणास मदत करणारा तिचा मानलेला भाऊ मुलींच्या लग्नातही मामा म्हणून धावून आला आणि विधीही पार पाडले.

बोधेगाव येथे जुनून ए इंसानियत सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबाभाई पठाण यांच्या घरासमोर भुसारी कुटूंब राहते. पतीशी पटत नसल्याने त्यांची मुलगी सविता दोन मुली आणि एक मुलासह माहेरी निघून आली होती.

धुणी भांडी करून सविताने मुलांना वाढविले, शिकविले. घरासमोरच राहणारा बाबाभाई यांना सविता भाऊ मानते. सविता यांना सख्खा भाऊ नाही. अनेक वर्षांपासून हे मानलेले नाते आहे. रक्षाबंधन, भाऊबीज हे सण सख्या नात्याप्रमाणे साजरे करतात.

मुलांच्या शिक्षणासाठीही बाबाभाईंनी हातभार लावला. सविता यांची मुलगी गौरी बी.ए. झाली तर धाकटी सावरी हिची बारावी झाली. दोघींच्या लग्नाचे वय झाल्यावर स्थळासाठी शोधाशोध केली.

तालुक्यातील मुंगी येथील स्थळ आले. तेथही दोन सख्ये भाऊ लग्नाळू होते. त्यामुळे बाबाभाई यांनीच पुढाकार घेत ते दोघे भाऊ आणि या दोघी बहीणी यांचे लग्न एकत्रच करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याला दोन्ही घरांतून मान्यता मिळाली.

अलीकडेच बोधेगावमध्ये हे लग्न झाले. करोनाचे नियम पाळून झालेल्या या सोहळ्यात अर्थातच मामा म्हणून बाबाभाईच होते. आपल्या भाच्यांचे लग्न लावावे, तशाच पद्धतीने त्यांनी यात भाग घेतला.

लग्नात तरी आपले वडील असावेत, ही मुलींची इच्छासुद्धा त्यांनी पूर्ण केली. मुलींच्या वडिलांची समजूत काढून त्यांना लग्नापुरते बोलावून आणले. पाठवणीपर्यंतचे सर्व विधी बाबाभाईंनी मामा या नात्याने पार पाडले.

सासरी निघालेल्या दोन्ही मुलींनी शेवटी या दिलदार मामाच्या गळ्यात पडूनच आपल्या भावानांना वाट मोकळी करून दिली. सोशल मीडियावर या पाठवणीचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर, बाबाभाई यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला.

आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन बाबाभाई पठाण यांचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, आपल्यासारख्यांमुळेच माणूसकीवरील श्रद्धा व विश्वास अढळ असल्याचं काबरा यांनी म्हटलंय.

माणूसकी हाच धर्म माणणाऱ्या बाबाभाई यांची आषाढी एकादशीतली वेशभुषाही चर्चेचा विषय ठरली होती.

जि. प. प्राथमिक शाळा बोधेगाव शेगाव अहमदनगर यांच्यावतीने आषाढी निमित्त आयोजित केलेल्या प्रदक्षिणा दिंडीत रेहान बाबाभाई पठाण याची वेशभुषा अनेकांच्या नजरा आकर्षित करणारी ठरली.

Read in English