युतीत लढलो तर १५० अन् महाविकास आघाडीत लढलो तर; आंबेडकरांनी सांगितला आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 06:48 PM2023-01-28T18:48:58+5:302023-01-28T19:16:50+5:30

दिवंगत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर करण्यात आली आहे.

दिवंगत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर करण्यात आली आहे.

यावरून राजकीय वर्तुळात बरेच तर्क-वितर्क लावले जात आहेत. युतीच्या घोषणेनंतर दोनच दिवसांत संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात वाकयूद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले.

वंचितसोबतच्या युतीमुळे शिवसैनिक नाराज असल्याचा दावाही केला जात आहे. यातच शरद पवार (Sharad Pawar) यांनीही ठाकरे गट आणि वंचितच्या युतीवर भाष्य केले. यावर प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

युती केल्यापासून मागील काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीत काही खटके उडताना दिसत आहेत, काही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याकडे आपण कसे पाहता? असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांना विचारण्यात आला.

यावर, प्रश्न तो नाही, प्रश्न असा आहे की माझी युती शिवसेनेबरोबरची आहे आणि ती कायम आहे. त्यामुळे मी तिथपर्यंतच मर्यादित आहे आणि मला इतराचे काही देणेघेणे नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली.

महाविकास आघाडीसोबच जाण्याचा मुद्दा आमचा नाही, तो निर्णय उद्धव ठाकरे घेतील, त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आम्ही सध्या शिवसेनेसोबत युतीत आहोत. आम्ही युतीत लढलो तर १५० पेक्षा जास्त जागा जिंकू, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.

आम्ही महाविकास आघाडीत गेलो आणि महाविकास आघाडी म्हणून चौघे एकत्र लढल्यास २०० पेक्षा अधिक जागा जिंकू असं भाकितच प्रकाश आंबेडकरांनी मांडलं आहे.

अद्यापही वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत स्थान मिळणार का, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या निर्णयाला सहमती देणार का, यासांरखे अनेक प्रश्न आहेत. मात्र, सध्या वंचित आणि शिवसेना युती झाली आहे.

शरद पवार यांनी मीडियाशी बोलताना ठाकरे गट आणि वंचित युतीवर प्रतिक्रिया दिली. ठाकरे गट आणि वंचित यांच्या चर्चेत आम्ही कुठे नव्हतो. आमच्या ज्या चर्चा झाल्या त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या सर्वांनी एकत्र निवडणुकीला सामोरे जावं अशी आमची मानसिकता आहे.

वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासोबत आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही, त्यामुळे आम्ही त्याची चर्चा करणार नाही. त्यांच्यासोबतच्या आघाडीचा प्रस्ताव आमच्यासमोर नसल्यामुळे कुणाला किती जागा वाटप होणार, यावर चर्चाच होऊ शकत नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.