मुंबई : फेरीवाल्यांच्या प्रश्नावर आम्ही सरकारला निवेदन दिले, वस्तुस्थिती समजावून सांगितली, तरीही काही घडले नाही, म्हणून आम्ही हात उचलला, असे म्हणत महाराष्ट्र नवर्निमाण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पाठीशी घातले. काही दिवसांत मनसेचे कार्यकर्ते फेरीवाल्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत, माझे पत्र प्रत्येक पोलीस ठाण्यासह महापालिकेला देणार. हे पत्र दिल्यावर जर पुन्हा फेरीवाले दिसले, तर मात्र आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू, असा इशारा राज यांनी दिला. वांद्रे पश्चिमेकडील रंगशारदा सभागृहात शनिवारी सायंकाळी ७ वाजता आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. नाना पाटेकरांना फेरीवाल्यांचा पुळका आला. तुम्ही उत्तम अभिनेते आहात, पण ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाहीत, त्यात बोलू नका, असे म्हणत, राज यांनी चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांचाही समाचार घेतला
रस्त्यावर फेरीवाला म्हणून बसण्याचा अधिकार अगोदर मराठी फेरीवाल्यांना आहे. त्यांच्याबद्दल कुणी बोलत नाही, असा सवालही राज यांनी या वेळी केला. अनधिकृत फेरीवाल्यांच्या आंदोलनात केसेस अंगावर घेणाºया महाराष्ट्र सैनिकांचे मी अभिनंदन करतो, असे म्हणत राज यांनी कार्यकर्त्यांना पाठीशी घातले. राज म्हणाले, मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी कितीही केसेस अंगावर आल्या, तरी हरकत नाही. सत्ता आल्यावर केसेस काढून घेऊ. पुण्यात फेरीवाल्यांना हटवताना महाराष्ट्र सैनिकांवर दरोड्याच्या केसेस टाकल्या. मात्र, आपण काय कलमे टाकतोय, याचा तरी आपण विचार करता का? असा सवालही त्यांनी केला. राज ठाकरे आधीही पोलिसांच्या पाठीशी होते आणि पुढेही राहतील, पण पोलिसांनीसुद्धा थोडी आपुलकी दाखवावी. कारण आंदोलन हे महाराष्ट्राच्या हितासाठी सुरू आहे, असेही ते म्हणाले. फेरीवाल्यांचे हातावरचे पोट आहे, हे मला मान्य आहे. तो गरीब आहे, म्हणून सर्वांना पुळका येतो आहे, पण मग रेल्वे प्रवासी गरीब नाहीत का? त्यांना कुटुंब नाहीत का? असा सवालही त्यांनी केला. फेरीवाल्यांच्या प्रश्नावर आम्ही सरकारला निवेदन दिले, वस्तुस्थिती समजावून सांगितली, तरीही काही घडले नाही, म्हणून आम्ही हात उचलला. फेरीवाला रोज शंभर रुपये हप्ता भरतो, तसा नोकरीवाला भरू शकत नाही. मग गरीब कोण आणि श्रीमंत कोण? असेही ते म्हणाले. बसण्याचा अधिकार अगोदर मराठी फेरीवाल्यांना, त्यांच्याबद्दल कुणी बोलत नाही? असे म्हणत, राज यांनी विरोधकांना चपराक लगावली.
मुंबईत येणारी माणसे कोण आहेत, ते काय करतात, याचा आपल्याला पत्ता नाही, त्यातून गुन्हेगार पुढे येत आहेत, माझी अधिकाºयांना विनंती आहे, हे विष पोसू नका. आपल्याला बाहेरच्या शत्रूंची येथे गरजच नाही. येथे जे विष पोसतोय, त्यांच्याशीच आपल्याला लढाईची वेळ येणार आहे. वॉर्ड आॅफिसर, तहसील अधिकारी असो किंवा मंत्रालयातले अधिकारी, यांना अंदाज नाहीये की, ते कोणते विष पोसत आहेत, जे एक दिवस महाराष्ट्राच्या मुळावर उठेल. कोण कुठून येते, कुठे राहाते, माहिती नाही, बॉम्बस्फोटसारख्या घटना घडल्यावर चार दिवसांसाठी जाग येते. येथील झोपडंपट्ट्या पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांचे मोहल्ले आहेत. हेच आपल्या अंगावर येतील. त्या वेळी माझ्यासकट माझा महाराष्ट्र सैनिक उभा असेल. सरकार नपुंसक होऊन, जर या मोहल्ल्यांवर कारवाई करणार नसेल, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पद्धतीने कारवाई करेल, असा इशाराही राज यांनी दिला. बेहरामपाड्यातील आग लागली नव्हती, लावली गेली होती. अनधिकृत झोपड्यांना आगी लावून, तिथे पक्की घरे बांधण्याचा डाव आहे, असाही आरोप राज यांनी केला.
मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत आहे का?
कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात, कर्नाटकात यायचे तर कानडी शिकावी लागेल, अशी हिंमत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे का? माझ्या माळवदेवरचा हल्ला मी विसरणार नाही. प्रत्येक गोष्टीची प्रतिक्रिया बोलून द्यायची नसते. कृतीतून द्यायची असते, असे म्हणत, मालाड येथे फेरीवाला हल्ल्यात जखमी झालेला मनसेचा आंदोलक सुशांत माळवदे याला राज यांनी दिलासा दिला.
उच्च न्यायालयाचे अभिनंदन
उच्च न्यायालयाचे मी अभिनंदन करतो. कारण त्यांनी फेरीवाल्यांच्या प्रश्नावर उत्तम निर्णय दिला. काही दिवसांत महाराष्ट्र सैनिक फेरीवाल्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत, माझे पत्र प्रत्येक पोलीस ठाण्यासह महापालिकेला देणार. हे पत्र दिल्यावर जर पुन्हा फेरीवाले दिसले, तर आम्ही संबंधित अधिकाºयांवर न्यायालयाच्या अवमानाची केस टाकणार, असा इशाराही राज यांनी दिला.

नाना पाटेकरांनी आम्हाला शिकवू नये - राज ठाकरे
ज्या गोष्टी सरकारला जमत नाहीत, त्या आम्ही करून दाखवतो. ते करताना आम्ही कसे करायचे, हे नाना पाटेकरांनी आम्हाला शिकवू नये. नाना पाटेकरांनी महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी उभे राहावे. दक्षिणेतले कलाकार बघा, कसे तिथल्या प्रश्नांसाठी एकत्र येतात. मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नव्हती, तेव्हा नाना पाटेकर बोलले नाहीत, तेव्हा मनसेने लढा दिला, असे म्हणत, राज यांनी नाना पाटेकर यांचा खरपूस समाचार घेतला.

फेरीवाल्यांना मारहाण करणे चुकीचे आहे - नाना पाटेकर
प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे. यासाठी अन्न मिळविणे महत्त्वाचे असते. त्याकरिता काम करावे लागते. रस्त्यांवरील फेरीवाले हे अशांपैकीच आहेत. मोलमजुरी करून ते आपली रोजीरोटी मिळवितात. त्यांना मारहाण करणे चुकीचे आहे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले होते. माटुंग्याच्या व्हीजेटीआय कॉलेजच्या ‘टेक्नोवन्झा’ फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी नाना पाटेकर बोलत होते.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.