स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईत विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 03:05 AM2018-08-16T03:05:21+5:302018-08-16T03:05:36+5:30

भारतीय स्वातंत्र्याच्या ७१व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुणे विधानभवनाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

 Various enterprises in Mumbai for the independence day | स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईत विविध उपक्रम

स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईत विविध उपक्रम

Next

मुंबई - भारतीय स्वातंत्र्याच्या ७१व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुणे विधानभवनाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. ध्वजारोहणानंतर राज्यपालांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली, तसेच ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, निवृत्त अधिकारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते, तर मुंबई उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्जन व्हाइस अ‍ॅडमिरल पवार यांना अतिविशिष्ट सेवा पदक मिळाल्याबद्दल तावडे यांच्या हस्ते एक लाखाचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. तर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात ध्वजारोहण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजाला मानवंदना दिली. या प्रसंगी मुख्य सचिव डी. के. जैन, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल, वरिष्ठ न्यायाधीश एस. सी. धर्माधिकारी, आर. एम. बोरडे, बी.आर. गवई, अमृता फडणवीस, यांच्यासमवेत निवृत्त न्यायाधीश, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विधान भवन प्रांगणात विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या वेळी मानवंदना दिली.
रेल्वे आणि एसटी महामंडळात स्वातंत्र्य दिन उत्साहात
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झेंडावंदन केले. मध्य रेल्वेने २०१८-१९ या काळात २२४ एटीव्हीएम, ४४ सरकते जिने, २५ लिफ्ट अशा प्रवासी सुविधांचे लोकार्पण केले आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी १४ बॅटरीवर चालणारी कार आणि ९ स्थानकांत एकूण १४ सॅनिटरी नॅपकिन वेंडिग मशीन बसविण्यात आल्या असल्याचे डी.के. शर्मा यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता यांनी चर्चगेट येथे झेंडावंदन केले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या उपस्थितीत मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन समारंभ संपन्न झाला.

स्वातंत्र्याचे मोल जपता आले आहे का? - अहिर

शूरवीर तसेच देशभक्तांच्या निस्सीम त्याग आणि बलिदानातून या देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण त्याचे मोल जपता आले आहे का? याचे अवलोकन करण्याची आज वेळ आली आहे, असे विचार राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी परळ येथील मजदूर मंझील प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रमात केले.
हजारो कामगार बेकारीचे जीवन जगत आहेत, तर असंख्य कामगारांवर बेकारीची टांगती तलवार आहे; असे सर्वत्र अशास्वत जीवन वाट्याला आले आहे, अशा वेळी शूरवीरांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले खरे, पण त्याचे मोल राखले का ? असा सामान्यांना प्रश्न पडतो, असे ते म्हणाले,.

विजयी विश्व तिरंगा प्यारा...


मुंबई : शहरात बुधवारी स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळाला. दादर येथील शिवाजी पार्क मैदान ते चैत्यभूमी या ठिकाणी ‘तिरंगा उठाव, भाजपा हटाव’ रॅली बुधवारी काढण्यात आली होती. लोकांचे दोस्त आणि समविचारी संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या या रॅलीत गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवानी यांच्यासह विविध संघटनांचे नेते उपस्थित होते.
‘संविधान बचाव, देश बचाव’, ‘जातीयतेमधून आझादी पाहिजे’ अशा घोषणा देत शिवाजी पार्क ते चैत्यभूमी परिसर दणाणून गेला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या वेळी उपस्थितांनी अभिवादन केले. मेवानी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने केलेल्या भाषणात कोणतेच वेगळेपण नव्हते. भाषणात बेरोजगारी, जातीयता, बलात्कार या विषयांवर बोलले गेले नाही.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गूगलकडून हटके डूडल साकारण्यात आले.आपला देश हत्तीसारखा बलाढ्य असल्याने डूडलवर हत्तीही दाखविण्यात आला होता. तिरंगा फडकविताना दाखविला होता. स्वातंत्र्य दिनानिमित्त सोशल मीडियावर डूडल शेअर करण्यात येत होते.
सोशल मीडियावर #स्वातंत्र्यदिन, #आजादी, #इंडिया इनडिपेडेन्ट डे, #इनडिपेडेन्ट डे असे हॅशटॅग वापरून मेसेज व्हायरल होत होते. स्वातंत्र्य दिनी बाळगण्यात आलेले झेंडे नीट ठेवण्याचे आवाहन युजर्सनी केले.
फोर्ट येथील पालिका मुख्यालयात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, महापालिका आयुक्त अजय मेहता, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा अर्चना भालेराव, विधि समिती अध्यक्षा सुवर्णा करंजे, अतिरिक्त महापालिका आयुक्त संजय मुखर्जी आदी यावेळी उपस्थित होते. पवई येथील मोरारजी नगर येथील तरुणांनी मिळून रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या वेळी १००पेक्षा जास्त नागरिकांनी रक्तदान करून स्वातंत्र्य दिन साजरा केला.

Web Title:  Various enterprises in Mumbai for the independence day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.