काश्मीरमध्ये पुन्हा ‘इसिस’,जबाबदारीची जाणीव होणार का?, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 07:44 AM2018-08-23T07:44:41+5:302018-08-23T07:46:41+5:30

जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी (23 ऑगस्ट) पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकवण्यात आल्याच्या घटनेवरुन सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

Uddhav Thackeray questions Prime Minister Narendra Modi over pakistan and isis flags raised in srinagar | काश्मीरमध्ये पुन्हा ‘इसिस’,जबाबदारीची जाणीव होणार का?, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

काश्मीरमध्ये पुन्हा ‘इसिस’,जबाबदारीची जाणीव होणार का?, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

मुंबई - जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी (23 ऑगस्ट) पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकवण्यात आल्याच्या घटनेवरुन सामना संपादकीयमधून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  
''सध्या जम्मू–कश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट म्हणजे केंद्र सरकारचाच अप्रत्यक्ष अंमल आहे. तरीही परिस्थितीत बदल झालेला नाही. आता तर पाकिस्तानच्या चाँदताऱ्यासह इसिसचे झेंडे पुन्हा फडकले. मग आधी ‘पीडीपी’सोबत सत्ता भोगून आणि नंतर सत्तेबाहेर पडून काय मिळाले, जम्मू–कश्मीर आणि देशाच्या पदरात नेमके काय पडले, हे प्रश्न उरतातच. या प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी जम्मू–कश्मीरमध्ये चार वर्षे ज्यांनी सत्तेचा खेळ केला त्यांचीच आहे. श्रीनगरमध्ये पाकिस्तानी आणि इसिसचे झेंडे फडकल्यानंतर तरी या जबाबदारीची जाणीव होणार आहे का?'', असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. 

काय आहे आजचे सामना संपादकीय?
जम्मू-कश्मीरमध्ये बकरी ईदच्या दिवशी पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकविले गेले. ते रोखणाऱ्या सुरक्षा दलांवर दगडफेक केली गेली. पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांनी कश्मीरप्रश्नी चर्चा व्हावी असे ट्विट केल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये या घटना घडाव्यात हा फक्त योगायोग म्हणता येणार नाही. इम्रान खान यांच्या तोंडी चर्चेची भाषा असली तरी प्रत्यक्षात जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले, राजकीय नेत्यांच्या हत्या, सुरक्षा दलांवर दगडफेक आणि सीमेवर पाकडय़ांचा गोळीबार मागील पानावरून पुढे तसाच सुरू आहे. इम्रान खान पंतप्रधान झाले म्हणून या परिस्थितीत बदल होईल अशी अपेक्षा कोणाचीही नव्हतीच, पण निदान नव्याचे नऊ दिवस म्हणून तरी पाकिस्तानातील नवे सरकार काही काळ ‘शांत’ बसल्याचे ‘नाटक’ करेल असे वाटत होते. मात्र पाकडेच ते. त्यांचे शेपूट इम्रान खानच्या ‘तेहरिक-ए-इन्साफ’ पक्षाची ‘नळी’ सत्तेत आली म्हणून सरळ थोडेच होणार आहे? उलट ते जास्तच वाकडे होण्याची भीती आहे. सीमेपलीकडे ‘आपले’ सरकार आता आले आहे, असा विश्वास कश्मिरी फुटीरतावादी आणि पाकिस्तानच्या इशाऱ्यावर नाचणारे दहशतवादी यांना वाटत असावा. 

त्यातूनच बकरी ईदच्या दिवशी नमाज पठण झाल्यावर श्रीनगरमध्ये पाकिस्तानचा चाँदतारा आणि इसिसचे ‘काळे फडके’ फडकविण्याचा प्रकार घडला आहे. जम्मू-कश्मीरमध्ये यापूर्वीही पाकिस्तानी झेंडे फडकविले गेले आहेत. हिंदुस्थानी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच जाणीवपूर्वक हे प्रकार केले जात असतात. मधल्या काळात त्यात इसिसच्या झेंडय़ाची भर पडली. तीन वर्षांपूर्वी जेव्हा तेथे पहिल्यांदा इसिसचे झेंडे फडकले तेव्हा इसिसने हिंदुस्थानला ‘दस्तक’ दिली असा धोक्याचा इशारा देण्यात आला होता. हिंदुस्थानसह जम्मू-कश्मीरमध्ये हातपाय पसरण्याचा इसिसचा प्रयत्न लपून राहिलेला नाही. आपल्या देशातील अनेक तरुण इसिसमध्ये सहभागी झाल्याचे उघड झाले आहेच. आता इसिसचे झेंडे पुन्हा फडकल्याने हा धोका जम्मू-कश्मीरमध्ये डोके वर काढण्याची भीती आहे. जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती किती घातक वळणावर आहे हेच यातून दिसून येते. त्यात सीमेपलीकडे इम्रान खानसारखा हिंदुस्थानद्वेष्टा आणि पाकिस्तानी लष्कराचा ‘होयबा’ पंतप्रधान झाला असल्याने आज फक्त श्रीनगरमध्ये फडकलेले पाकिस्तानचे आणि इसिसचे झेंडे इतर भागांतही फडकू शकतात. मागील चार वर्षांपासून जम्मू-कश्मीरसारख्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील राज्याचा फक्त ‘राजकीय’ वापर झाला.

मेहबुबा मुफ्तींच्या ‘पीडीपी’सारख्या फुटीरतावादाचे उघड उघड समर्थन करणाऱ्या पक्षाबरोबर भाजपने सत्तासोयरीक केली. ही आघाडी भ्रष्ट असल्याने टिकणारी नव्हतीच. त्यामुळे पीडीपी-भाजप यांच्यात ‘घटस्फोट’ झालाच; मात्र त्याचवेळी जम्मू-कश्मीरमधील शांतता, कायदा-सुव्यवस्था यांचाही विस्कोट झाला. पुन्हा त्याचे खापर पीडीपीवर फोडून भाजपने जबाबदारी झटकली आणि राज्य सरकारमधून काढता पाय घेतला. त्यामुळे सध्या जम्मू-कश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट आहे. म्हणजे केंद्र सरकारचाच अप्रत्यक्ष अंमल आहे. तरीही परिस्थितीत बदल झालेला नाही. दहशतवादी खुलेआम पोलीस आणि राजकीय नेते-कार्यकर्त्यांना गोळय़ा घालत आहेत. सुरक्षा दलांवरील दगडफेकीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. आता तर पाकिस्तानच्या चाँदताऱ्यासह इसिसचे झेंडे पुन्हा फडकले. मग आधी ‘पीडीपी’सोबत सत्ता भोगून आणि नंतर सत्तेबाहेर पडून काय मिळाले, जम्मू-कश्मीर आणि देशाच्या पदरात नेमके काय पडले, हे प्रश्न उरतातच. या प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी जम्मू-कश्मीरमध्ये चार वर्षे ज्यांनी सत्तेचा खेळ केला त्यांचीच आहे. श्रीनगरमध्ये पाकिस्तानी आणि इसिसचे झेंडे फडकल्यानंतर तरी या जबाबदारीची जाणीव होणार आहे का?

Web Title: Uddhav Thackeray questions Prime Minister Narendra Modi over pakistan and isis flags raised in srinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.