बुलेट ट्रेन द्यायला निघालेत,पण लोकांना गाड्यांत पेट्रोल भरणं कठीण झालंय-उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 08:59 AM2017-09-20T08:59:41+5:302017-09-20T09:00:21+5:30

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरावरुन, महागाईवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Uddhav Thackarey Slams PM Narendra Modi over petrol price hike | बुलेट ट्रेन द्यायला निघालेत,पण लोकांना गाड्यांत पेट्रोल भरणं कठीण झालंय-उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांवर निशाणा 

बुलेट ट्रेन द्यायला निघालेत,पण लोकांना गाड्यांत पेट्रोल भरणं कठीण झालंय-उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांवर निशाणा 

Next

मुंबई, दि. 20 - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरावरुन, महागाईवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ''पंतप्रधान देशाला बुलेट ट्रेन द्यायला निघाले आहेत. हे त्यांचे स्वप्न आहे. पण लोकांना त्यांच्या स्कूटर्स व गाड्यांत दोन लिटर पेट्रोल भरणे कठीण झाले आहे. एका बाजूला श्रीमंतांसाठी बुलेट ट्रेन धावेल व दुस-या बाजूला पेट्रोल-डिझेल परवडत नाही म्हणून लोक बैलगाडय़ांतून प्रवास करतील. हे सर्व मूकपणे व उघड्या डोळ्यांनी पाहणारेच राष्ट्राचे शत्रू व जनतेचे बेइमान आहेत'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सामना संपादकीयमधून हल्लाबोल केला आहे.  दरम्यान, ''महागाईविरोधात लढा हा ‘एनडीए’चाच आजन्म कार्यक्रम आहे. आम्ही ‘एनडीए’चाच कार्यक्रम जनहितासाठी राबवला तर आमचे काय चुकले?'', असा प्रश्नदेखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

काय आहे आजचे सामना संपादकीय ?
‘एनडीए’चा लढा!
सरकार पक्षाचे लोक महागाईवर बोलायला तयार नाहीत व इतरांनीही महागाईवर बोलू नये अशी त्यांची इच्छा दिसते. पेट्रोल आणि डिझेलचे भाव भयंकर पद्धतीने भडकले आहेत व त्याचे परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागत आहेत. मुंबईत पेट्रोल सगळय़ात जास्त महाग म्हणजे ८० रुपये लिटर आहे. गेल्या चारेक महिन्यांत पेट्रोलच्या किमती किमान वीसेक वेळा वाढल्या व त्याचे समर्थन सरकार पक्षाचे लोक करीत असतील तर ते योग्य नाही. पुन्हा आधीची राजवट त्या तुलनेत बरी होती व आता वादा केलेले ‘अच्छे दिन’ देता येत नसतील तर आमचे आधीचे ‘बुरे दिन’ परत आणा, ते बरे होते, असे सांगणारे गुन्हेगार ठरवले जातात. काँग्रेसच्या म्हणजे यूपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत १३० अमेरिकी डॉलर प्रति बॅरल होती, तरीही देशात पेट्रोलची किंमत ७० रुपये प्रति लिटरच्या वर कधी गेली नव्हती व डिझेल रुपये ५३ प्रति लिटरच्या वर गेले नाही. तरीही आम्ही सगळय़ांनीच ‘महागाई’च्या विरोधात रस्त्यावर उतरून बोंबा मारल्या होत्या व संसदही अनेकदा चालू दिली नव्हती. आजचे चित्र नेमके काय आहे? आज आंतरराष्ट्रीय बाजारात

कच्च्या तेलाच्या किमती

जमिनीवर कोसळून पडल्या आहेत. काँग्रेस राजवटीत याच किमती आकाशाला भिडल्या होत्या. याचा अर्थ इतकाच की, कच्च्या तेलाच्या किमती कोसळूनही सामान्यांना पेट्रोल, डिझेलचे भाव कमी झाल्याचे सुख काही लाभत नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल ४९.८९ अमेरिकी डॉलर प्रति बॅरल आहे. यूपीएच्या काळातील १३० डॉलर्सच्या तुलनेत हे खूपच कमी आहे. पण आम्हाला पेट्रोल ८० रुपये व डिझेल ६३ रुपये प्रति लिटर मिळत असेल तर ती जनतेची सरळ सरळ लूट आहे. बुलेट ट्रेनसाठी जपान सरकारने जे सवा लाख कोटीचे कर्ज दिले आहे त्याचे व्याज (१ टक्का) फेडण्यासाठी हा भुर्दंड जनतेच्या माथी मारला जात आहे काय? जगातील अनेक देशांत पेट्रोल स्वस्त झाले आहे. आमच्या ८० रुपयांच्या तुलनेत तर खूपच स्वस्त आहे. मलेशियात पेट्रोल ३२ रुपये तर इंडोनेशियात ४१ रुपये आहे. इतर अनेक लहान देशांतही ते आमच्यापेक्षा कमालीचे स्वस्त असताना येथील जनतेनेच हा महागाईचा मार सहन का करावा? व या महागाईवर

सरकार पक्षातील लढवय्या महिला

नेतृत्वाने चिडीचूप का बसावे? गेल्या वर्षभरात स्वयंपाकाचा गॅस १५ वेळा महागला आहे. आता पुन्हा येथे जुन्या राजवटीत काय घडत होते हे सांगणे अनिवार्य झाले आहे. काँग्रेस राजवटीत घरगुती गॅसचे सिलिंडर ३२० रुपयांच्या वर गेले नव्हते. आज ते ७८५ रुपयांच्या जवळपास गेले आहे. पंतप्रधान देशाला बुलेट ट्रेन द्यायला निघाले आहेत. हे त्यांचे स्वप्न आहे. पण लोकांना त्यांच्या स्कूटर्स व गाडय़ांत दोन लिटर पेट्रोल भरणे कठीण झाले आहे. घरात गाडी-घोडा असणे हे एक प्रकारे अच्छे दिनच असतात. पण आज पेट्रोल-डिझेलच्या भडकत्या भावामुळे जनतेला स्कूटर्स, गाडय़ा परवडणार नाहीत व पुन्हा सायकल किंवा बैलगाडी या वाहनांकडे वळावे लागेल. एका बाजूला श्रीमंतांसाठी बुलेट ट्रेन धावेल व दुसऱया बाजूला पेट्रोल-डिझेल परवडत नाही म्हणून लोक बैलगाडय़ांतून प्रवास करतील. हे सर्व मूकपणे व उघडय़ा डोळय़ांनी पाहणारेच राष्ट्राचे शत्रू व जनतेचे बेइमान आहेत. महागाईविरोधात लढा हा ‘एनडीए’चाच आजन्म कार्यक्रम आहे. आम्ही ‘एनडीए’चाच कार्यक्रम जनहितासाठी राबवला तर आमचे काय चुकले?
 

Web Title: Uddhav Thackarey Slams PM Narendra Modi over petrol price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.