मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकाल प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेण्यात आला. मात्र यात गोंधळ उडाला. तरीही द्वितीय सत्र परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन होणार आहे. पण, या वेळी अडथळे येऊ नयेत म्हणून समितीच्या शिफारशीनुसार, विद्यापीठाने ‘मास्टर प्लॅन’ तयार केला आहे. १० नोव्हेंबरपासून प्राचार्य, प्राध्यापकांना आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
परीक्षा पद्धतीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या राजेश अग्रवाल समितीच्या शिफारशीनुसार, परीक्षा पद्धतीमध्ये आयसीटी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या द्वितीय सत्र २०१७च्या ४८१ परीक्षांचे निकाल आॅनलाइन पद्धतीने लावण्यात येणार आहेत. २६ आॅक्टोबरला फोर्ट कॅम्पसमध्ये अधिष्ठाता, अभ्यास मंडळ, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, विद्यापीठातील कर्मचारी आणि अधिकारी वर्गाची बैठक घेण्यात आली होती.
गेल्या परीक्षांवेळी पूर्ण प्रशिक्षण न मिळाल्याची तक्रार प्राध्यापकांनी केली होती. त्यामुळे आता विद्यापीठाने तक्रारीला वाव राहू नये म्हणून कंबर कसली आहे. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीसाठी खास व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका तपासणीबाबत माहिती देण्यात येणार आहे.
प्रथम सत्र २०१७च्या परीक्षांमध्ये गोंधळ झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले. पण, आताच्या परीक्षांचा निकाल गोंधळाविना लावण्यासाठी मूल्यांकन पद्धतीत आवश्यक ते बदल केले आहेत. द्वितीय सत्राच्या सर्व ४८१ परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी विद्यापीठाने अनेक उपाययोजना केल्या असून, संभाव्य तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी विद्यापीठाकडून खास खबरदारी घेण्यात येत असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी सांगितले.

कुठे, कधी मिळणार प्रशिक्षण?
१० नोव्हेंबर - गोगटे जोगळेकर महाविद्यालयात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राचार्य, कॅप सेंटरचे कर्मचारी, शिक्षक यांच्यासाठी कार्यशाळा
११ नोव्हेंबर - पनवेल - सीकेटी महाविद्यालयात रायगड, ठाण्यातील शिक्षक-कर्मचाºयांसाठी कार्यशाळा
१४ नोव्हेंबर - मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये
मुंबई शहर, उपनगरासाठी कार्यशाळा
१८ नोव्हेंबर - पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात वाडा, पालघर आणि जव्हारसाठी कार्यशाळा


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.