‘ओखी’मुळे मुंबईत दिवसभर संततधार , रोख गुजरातकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 04:38 AM2017-12-06T04:38:57+5:302017-12-06T04:40:56+5:30

चक्रीवादळाचा विपरीत परिणाम म्हणून राज्यासह मुंबईत पाऊस पडेल, अशी शक्यताही भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली होती.

Through 'Okhi' in Mumbai all day long cash and cash in Gujarat | ‘ओखी’मुळे मुंबईत दिवसभर संततधार , रोख गुजरातकडे

‘ओखी’मुळे मुंबईत दिवसभर संततधार , रोख गुजरातकडे

googlenewsNext

मुंबई : चक्रीवादळाचा विपरीत परिणाम म्हणून राज्यासह मुंबईत पाऊस पडेल, अशी शक्यताही भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली होती. त्यानुसार, सोमवारी दिवसभर मुंबईतले वातावरण ढगाळ राहिले, हवेत गारवा कामय होता. सायंकाळी सहानंतर सुरू झालेल्या पावसाने आपला मारा मंगळवारी दिवसभर कायम ठेवला. दरम्यान, चक्रिवादळाच्या अफवा वाढत असून त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने मुंबईकरांना केले आहे.
सोमवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत फोर्ट, नरिमन पॉइंटपासून दहिसर आणि मुलुंडपर्यंतच्या परिसराला अक्षरश: गारद केले. विशेषत: मंगळवारी सकाळीच पावसाने जोर धरला. दुपारचे काही क्षण वगळता तीननंतर पावसाने पुन्हा वेग पकडला. मुळात भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या इशाºयाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी सतर्कता बाळगल्याचे चित्र होते. मंगळवारी सकाळी निर्माण झालेले वातावरण पाहूनच अनेकांनी घराबाहेरचा रस्ता धरण्याचे काही प्रमाणात टाळल्याचे चित्र होते. सकाळच्या पावसाचा वेग दुपारनंतर किंचितसा कमी झाला. त्यानंतर मुंबईकर घराबाहेर पडले. विशेष म्हणजे पावसाचा मारा सुरू असतानादेखील जंक्शन स्पॉट वगळता वाहतूककोंडीच्या फारशा तक्रारी नव्हत्या.
पावसाचा इशारा कायम
वलसाड, सुरत, नवसारी, भरुच, दंग, तापी, अमरेली, गीर-सोमनाथ, भावनगर, दिव, दमण, दादरा-नगर हवेली या परिसरात बुधवारी पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाºयावर बुधवारी ताशी ७० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. सोबतच ठिकठिकाणी पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई
शहर आणि उपनगरातील वातावरण बुधवारी ढगाळ राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.


‘ओखी’नंतर शनिवारी पुन्हा दुसरे चक्रीवादळ
कोल्हापूर : ‘ओखी’ चक्रीवादळ शमते न शमते तोच शनिवार (दि. ९) पासून दुसरे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात घोंगावणार आहे. हे वादळ पूर्व किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकणार असल्याने मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्टÑाला त्याचा फटका बसण्याची शक्यता ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी कोल्हापुरात बोलून दाखविली. प्रसारमाध्यमांशी बोलताना साबळे म्हणाले, ‘ओखी’ने गेले तीन -चार दिवस दक्षिण भारतात धुमाकूळ घातला आहे. ताशी १८ किलोमीटर वेगाने हे वादळ आहे सूरतच्या दिशेला सरकले आहे. त्यामुळे पडत असलल्या अवकाळी पावसामुळे तसेच ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकांना फटका बसणार आहे. वेलवर्गीय दोडका, काकडी, कारली या पिकांना किडीचा प्रादुर्भाव जाणवणार आहे. हरभरा, गहू या रब्बी पिकांनाही त्याची झळ सहन करावी लागणार असून हरभºयावर घाटी अळीचा प्रादूर्भाव होणार आहे.
त्यातच शनिवारपासून आणखी एका चक्रीवादळाचा सामना करावा लागणार आहे. बंगालच्या उपसागरात हवेचा दाब कमी झाल्याने चक्री वारे तयार होऊन वादळ होणार आहे. त्याचा फटका पश्चिम महाराष्टÑात कमी-अधिक प्रमाणात बसू शकतो; पण वादळाची तीव्रता ‘ओखी’पेक्षा कमी असेल, असेही डॉ. साबळे यांनी सांगितले.

ठाणे : जिल्ह्यात ठिकठिकाणी कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले. ठाणे शहर परिसरात १४ मिमी पाऊस पडला, तर कल्याण-नगर महामार्गावर मुरबाडच्या दिशेने जाणारा एक ट्रक पावसादरम्यान स्लीप होऊन कोसळला. यात जीवितहानी झाली नाही. तर समुद्रात अडकलेल्या ठाणे-पालघर जिल्ह्यातील ३५ बोटी सुरक्षित किनाºयावर आल्या आहेत.
ओखी चक्रीवादळाचा परिणाम म्हणून वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. पावसामुळे माळशेज घाटातील मंगूळ गावाजवळ झाड पडले. तर मुरबाडपासून काही अंतरावर एक ट्रक झाडावर आदळून वाहनाचे नुकसान झाले. मासेमारीसाठी गेलेल्या ठाणे-पालघर जिल्ह्यातील १३८४ बोटींपैकी १३४९ बोटी सोमवारपर्यंत प्रशासनाच्या तत्परतेमुळे सुखरूप परतल्या होत्या, तर ३५ बोटी परतीच्या मार्गावर होत्या. त्या मंगळवारी सुरक्षित परतल्या आहेत.

अलिबाग : ‘ओखी’ वादळाच्या प्रभावामुळे रायगड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. समुद्राने रौद्ररूप धारण केल्याने तब्बल ५ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. समुद्रातील लाटांचा थरार पाहण्यासाठी समुद्रकिनारी नागरिकांनी गर्दी केली होती. मासेमारीसाठी गेलेल्या २५० बोटींपैकी आता फक्त ‘जय लक्ष्मी’ ही एकच बोट समुद्रामध्ये अडकली आहे. बोटीवरील खलाशांचा शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत रेस्क्यू आॅपरेशन सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने जलप्रवासी वाहतूक सेवाही बंद ठेवण्यात आली होती.
सोमवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी सकाळपर्यंत बरसतच होता. सोमवारी रात्री समुद्रात आलेल्या भरतीमुळे पाणी उंच कठडे ओलांडून बाहेर पडत असल्याचे अलिबागच्या मुख्य समुद्रकिनारी दिसून आले. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
दिघी येथील चार मच्छीमारी बोटी समुद्रात ३० नोव्हेंबरपासून मच्छीमारीसाठी गेल्या होत्या. त्यामधील तीन बोटी सोमवारी रात्री माघारी परतल्या आहेत, तर श्रीवर्धन दिघी येथील भरडखोल गावातील मच्छीमारीसाठी गेलेल्या ‘जय लक्ष्मी’ या बोटीचा अद्याप संपर्क झालेला नाही. या बोटीचा शोध घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने रेस्क्यू आॅपरेशन सुरू करण्यात आले आहे. तटरक्षक दलाच्या दोन बोटी त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, या बोटीत असलेल्या खलाशांचे फोन बंद आहेत.

Web Title: Through 'Okhi' in Mumbai all day long cash and cash in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.