Tell me how to travel? Passenger question; Rail-rokane stricken, Ola-Uber driver also engaged in the collision | सांगा प्रवास करायचा तरी कसा? प्रवाशांचा सवाल; रेल रोकोने त्रस्त, ओला-उबेर चालकही संपात व्यस्त
सांगा प्रवास करायचा तरी कसा? प्रवाशांचा सवाल; रेल रोकोने त्रस्त, ओला-उबेर चालकही संपात व्यस्त

मुंबई : रेल्वे परीक्षा भरतीतील गोंधळ आणि अन्य मागण्यांसाठी रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासून मध्य रेल्वेच्या दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान रेल रोको केल्याने मुंबईतील लाखो चाकरमान्यांना फटका बसला. पर्यायी व्यवस्था म्हणून कार्यालय, महाविद्यालय, इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी त्यांनी खासगी वाहनांकडे धाव घेतली. मात्र ओला, उबेर चालकांचाही त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप सुरू असल्याने प्रवाशांचे अधिकच हाल झाले. दुसरीकडे याचा फायदा रिक्षा-टॅक्सी चालकांनी घेतला.
सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झालेला रेल रोको सुमारे साडे तीन तास कायम असल्याने ठाणे, मुलुंड, कल्याण, डोंबिवली अशा सर्वच स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. काहींनी पर्यायी वाहनांचा पर्याय निवडला. अनेकांच्या मोबाइलवर ओला, उबेर या खासगी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांचे अ‍ॅप असतात. पण अ‍ॅपवर खासगी गाड्या उपलब्ध नसल्याचे दर्शवत होते. अनेकांना ओला, उबेरच्या संपाची माहिती नसल्याने कार्यालयापर्यंत कसे पोहोचायचे, असा प्रश्न होता. बसेसलाही गर्दी होती. याचा फायदा रिक्षा-टॅक्सीचालकांनी घेतला. त्यांनी प्रवाशांकडून जादा भाडे घेतल्याचे प्रकारही या वेळी घडले.

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
ठाणे-मुलुंड भागातील अनेक चाकरमानी ओला-उबेरमध्ये असलेल्या शेअर सुविधेने दररोज प्रवास करतात. तसेच दादर, भायखळा, सीएसटीएम या रेल्वे स्थानकांवर उतरून आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी ओला, उबेरलाच पसंती देतात. पण सलग दोन दिवस ओला, उबेर चालकांचा संप असल्याने आणि त्यातही रेल रोकोमुळे रेल्वेसेवाही ठप्प झाल्याने ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशीच काहीशी स्थिती त्यांची झाली होती.

संपात सहभागी चालक आमच्याशी संपर्क साधत आहेत. आंदोलनामुळे आमच्या प्रवाशांची गैरसोय होत आहे आणि शहराला सेवा देण्याच्या आमच्या क्षमतांवरही त्याचा परिणाम होत आहे. अ‍ॅपमुळे आठ तास आॅनलाइन राहणारे चालक उबरची २० टक्के सेवा फी कापल्यानंतरही दिवसाला साधारण १,५०० ते २,५०० रोख कमावत आहेत. त्यांच्याकडून नाहक प्रवाशांमध्ये तसेच सरकार स्तरावरही चुकीच्या गोष्टी पसरविण्यात येत आहेत. - प्रवक्ता, उबर


Web Title: Tell me how to travel? Passenger question; Rail-rokane stricken, Ola-Uber driver also engaged in the collision
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.