'माझ्या मुलाला बिघडवणं बंद कर', संजय दत्तवर ऋषी कपूर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 10:04 IST2018-06-20T09:33:58+5:302018-06-20T10:04:42+5:30
संजय दत्त आणि रणबीर कपूर यांचं बॉन्डिंग फार जूनं असल्याची माहिती खूपच कमी जणांना माहीत आहे.

'माझ्या मुलाला बिघडवणं बंद कर', संजय दत्तवर ऋषी कपूर संतापले
मुंबई - बॉलिवूडचा रॉकस्टार रणबीर कपूर याचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित आगामी 'संजू' सिनेमाच्या रिलीजची रसिक प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. संजय दत्तच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिका साकारत आहे. दरम्यान, संजय दत्त आणि रणबीर कपूर यांचं बॉन्डिंग फार जूनं असल्याची माहिती खूपच कमी जणांना माहीत आहे. रणबीर लहानपणापासूनच संजय दत्तला आदर्श मानत आला आहे.
एका खासगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रणबीरनं सांगितले की, संजय दत्त यांना मी काश्मीरमध्ये पहिल्यांदा पाहिले होते. ते वडिलांसोबत 'साहिबां' (1993) सिनेमाचे शुटिंग करत होते. यावेळेस त्यांचे व्यक्तिमत्त्व पाहून मी प्रभावित झालो होतो. रणबीर कपूर यांनी असेही सांगितले की, ''लहानपणी माझी बहीण रिद्धिमा आपल्या कपाटामध्ये सलमान खानचं पोस्टर लावायची आणि माझ्या कपाटामध्ये संजय दत्त यांचे पोस्टर असायचे. संजय दत्त यांचे माझ्या कुटुंबीयांसोबत फार जवळचे संबंध आहेत. ते मला छोटा भाऊ मानतात.''
(माधुरीच्या सांगण्यावरुन संजय दत्तच्या बायोपिकमधून हटवला 'हा' सीन)
माझ्या वाढदिवसाला त्यांनी हार्ले डेव्हिडसन बाईक मला भेट म्हणून दिली होती. शिवाय, ते रात्रभर मला फरारीमधून फिरवायलादेखील घेऊन जायचे. मोठ्या पडद्यावर संजय दत्त यांची भूमिका साकारुन आयुष्याचा एक अनुक्रम पूर्ण केल्यासारखं वाटत असल्याचं भावनाही रणबीरनं यावेळी बोलून दाखवली. दरम्यान, संजय दत्त यांनी मला हार्ले डेव्हिडसन भेट दिल्याचं वडिलांना समजलं, तेव्हा ते फारच संतापले होते, असेही रणबीरनं मुलाखतीदरम्यान सांगितले. त्यावेळेस वडिलांनी संजय दत्त यांना बोलवले आणि म्हटले, माझ्या मुलाला बिघडवणं बंद कर. त्याला तुझ्यासारखं बनवू नकोस, अशा शब्दांत वडिलांनी संजय दत्त यांना खडेबोल सुनावले होते.