सोशल मीडियावर वाढतोय विखार, जिहादी विचारांनी भरकटलेले १४३ तरुण-तरुणी पुन्हा मुख्य प्रवाहात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 10:02 AM2023-11-26T10:02:23+5:302023-11-26T10:08:47+5:30

Mumbai News: हल्लीची तरुणाई मोबाइलच्या आहारी गेली आहे. अनेक तरुण दिवसाचे कित्येक तास मोबाइलच्या स्क्रीनला खिळून असतात. त्यातील सोशल मीडियामुळे ते सतत आभासी जगाच्या संपर्कात असतात. त्याचाच फायदा घेत दहशतवादी संघटना तरुणांची माथी भडकवत असतात.

Social media is on the rise, 143 young men and women who have gone astray with Jihadi thoughts are back in the mainstream | सोशल मीडियावर वाढतोय विखार, जिहादी विचारांनी भरकटलेले १४३ तरुण-तरुणी पुन्हा मुख्य प्रवाहात

सोशल मीडियावर वाढतोय विखार, जिहादी विचारांनी भरकटलेले १४३ तरुण-तरुणी पुन्हा मुख्य प्रवाहात

मुंबई - हल्लीची तरुणाई मोबाइलच्या आहारी गेली आहे. अनेक तरुण दिवसाचे कित्येक तास मोबाइलच्या स्क्रीनला खिळून असतात. त्यातील सोशल मीडियामुळे ते सतत आभासी जगाच्या संपर्कात असतात. त्याचाच फायदा घेत दहशतवादी संघटना तरुणांची माथी भडकवत असतात. संवेदनशील मनाचे तरुण सहज या जाळ्यात अडकतात आणि भरकटतात. अशाच भरकटलेल्या १४३ तरुणांना दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गेल्या पाच वर्षांत मुख्य प्रवाहात आणले आहे. 

केवळ सुशिक्षितच नव्हे तर उच्चविद्याविभूषित तरुण-तरुणी दहशतवादी संघटनांनी सोशल मीडियाचा वापर करून उभ्या केलेल्या बागुलबुवाच्या जाळ्यात अडकल्याचे अलीकडे स्पष्ट झाले आहे. मे, २०१४ मध्ये कल्याणमधील चार तरुण आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्यानंतर या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला. त्यानुसार एटीएसने अशा मुलांना हेरून त्यांचे समुपदेशन करत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपड सुरू केली. २०१५-१६ मध्ये आयसिसचा जोर होता, तेव्हा अनेक पालक पुढे येऊन आपल्या मुलांविषयीची अशा प्रकारची माहिती देत होते. त्या माहितीनुसार, अशा मुलांचे ब्रेनवॉशिंग करण्याचा प्रयत्न केले जात होते.

 मुलांची ओळख पटताच, माहिती मिळताच त्यांच्या पालकांशी संपर्क साधला जातो. अनेकदा मुंबईत त्यांचे कोणी नातेवाईक नसतात. 
 मुस्लिम समाजातील धर्मगुरू, नेते तसेच ज्यांना धर्माच्या सर्व बाबींचा अभ्यास आहे, अशा व्यक्तीसह त्या तरुणांच्या कुटुंबातील सदस्य, मानसोपचारतज्ज्ञ आणि आमचे अधिकारी यांच्या मदतीने या तरुण-तरुणींचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न करतात. 

लोन वुल्फचा धोका
अनेक टेक्नोसॅव्ही तरुण मितभाषी असतात. परभणीतील असाच एक मध्यमवर्गातील तरुण आयसिसच्या संपर्कात आला. दिवसभर तो सोशल मीडियावर सक्रिय राहायचा. आयसिसच्या लोकांशी त्याचे इंटरनेटद्वारे बोलणे झाले.
जगभरातील इस्मालिक बांधवांवर अन्याय झाला, असा त्याचा समज झाला होता. तो हे विचार बाहेर येऊन सर्वांसमोर मांडत असेल तर त्याबाबत कळू शकते. 
मात्र, हे न होता तो खोलीत बसून एकटाच विचार करू लागला तर त्याच्या मनात नेमके काय चाललेय? हे कळणे कठीण होते. अशावेळी त्याचे दैनंदिन कामकाजही न बदलणे हा लोन वुल्फचा प्रकार आहे.

१०% मुलींची सक्रियता
 दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होण्यासाठी १८ ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणींचा समावेश आहे.
 बारावी ते इंजिनिअर, डॉक्टर तसेच टेक्नोसॅव्ही उच्चशिक्षित तरुण यामध्ये सॉफ्ट टार्गेट ठरत आहेत.
 यामध्ये मुलींची लगबग वाढत आहे. यात मुलींचे प्रमाण १० टक्के आहे.

विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करा...
सोशल मीडियावर काय बघायला पाहिजे, काय नाही?  आपल्यासाठी काय चांगले, काय वाईट? हे समजायला हवे. कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. सत्यता पडताळून पहा. काही मदत लागल्यास एटीएसशी संपर्क साधा. 
    - अनिल कुंभारे,     विशेष पोलिस महानिरीक्षक, एटीएस

पुढाकाराकडे पाठ
पुण्यातील प्रकरणानंतर आता अशा प्रकारची माहिती पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत आजही जनजागृतीचा अभाव आहे. सामाजिक संस्थांचा तसेच संबंधितांच्या धर्मगुरूंचा पुढाकार कमी पडत असल्याचे एटीएस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Social media is on the rise, 143 young men and women who have gone astray with Jihadi thoughts are back in the mainstream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.