हिंदूंच्या राज्यात गणरायावरही अत्याचार; उद्धव ठाकरेंचा भाजपा सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 07:40 AM2018-08-08T07:40:43+5:302018-08-08T07:43:06+5:30

मोदी, फडणवीस सरकारसह प्रशासन, न्यायव्यवस्थेचा समाचार

shivsena slams state and central government over Restrictions on hindu festivals | हिंदूंच्या राज्यात गणरायावरही अत्याचार; उद्धव ठाकरेंचा भाजपा सरकारवर निशाणा

हिंदूंच्या राज्यात गणरायावरही अत्याचार; उद्धव ठाकरेंचा भाजपा सरकारवर निशाणा

Next

मुंबई: महाराष्ट्रात फडणवीसांचं आणि केंद्रात मोदींचं राज्य येताच हिंदुत्ववाद्यांना त्यातल्या त्यात बरे दिवस येतील असे वाटलं होतं. पण आजही बंधनं फक्त हिंदूंच्या सण-उत्सवांवरच येत आहेत, अशा शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. हिंदूंच्या सण-उत्सवांबाबत काँग्रेस राजवटीत मुस्कटदाबी व्हायची असे आरोप आधी झाले. पण आता भाजप राज्यात ती जरा जास्तच होताना दिसत आहे. हिंदूंच्या राज्यात गणरायांना मुकाटपणे अत्याचार सहन करत आहेत, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे भाजपा सरकारवर बरसले आहेत. 

गिरगावात पालिकेच्या एका अधिकाऱ्यानं गणेशोत्सवाचा मंडप उखडला. त्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी 'सामना'मधून फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. 'सांगली, जळगाव महापालिका विजयाची धुंदी उतरली असेल तर गणपती उत्सवाच्या बाबतीत सुरू असलेल्या मोगलाईची दखल राज्याच्या लाडक्या, लोकप्रिय मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल. महापालिकेच्या एका टिनपाट वॉर्ड ऑफिसरनं गिरगावातील गणेशोत्सवाचा मंडप उखडताच त्याच्या कार्यालयात घुसून शिवसैनिकांनी दणका दिला आहे. थोडी ठोकाठोक झाली, पण श्री गणरायाचे आगमन सुकर व्हावं व हिंदुत्वाचा मान राहावा म्हणून शिवसैनिकांनी याप्रकरणी नवे खटले अंगावर घेतले आहेत. गणेशोत्सवात, विशेषतः खास हिंदूंच्याच सण-उत्सवात न्यायालय, प्रशासन आणि राज्यकर्त्यांचे असे अडथळे येत असतील तर या देशाचे भविष्य काय?' असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये हिंदूंच्या सणांवर कायदेशीर निर्बंध आणणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर भाजपानं केलेल्या टीकेची आठवणदेखील उद्धव ठाकरेंनी करुन दिली आहे. 'प. बंगालात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुर्गापूजा आणि दुर्गा मिरवणुकीत कायदेशीर अडथळे आणले म्हणून ज्यांनी शिमगा केला त्यांचं राज्य आज महाराष्ट्रात आहे. ममता बॅनर्जींना तेव्हा देशद्रोही, हिंदुद्रोही ठरवून राजकीय तांडव करणाऱ्यांनी राज्यातील गणेशोत्सवात अडथळे आणणाऱ्या नोकरशाहीचे कान उपटू नयेत याचं आश्चर्य वाटतं,' अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपाचा समाचार घेतला आहे. 

उद्धव ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारसोबतच न्यायालयांकडून आणल्या जाणाऱ्या निर्बंधांवरही भाष्य केलं आहे. 'गणेशोत्सव, नवरात्रीसारखे सण आले की नवी फर्मानं सुटत असतात. देवादिकांच्या मूर्तींना फुटपट्टय़ा लावल्या जातात. उत्सवांचे मंडप घालायचे की नाहीत, घातले तर किती आकाराचे घालायचे वगैरे कायदेकानू बनवले जातात व गणरायांच्या आगमनाच्या आनंदावर विरजण टाकलं जातं. हे सर्व प्रकरण कुणीतरी न्यायालयाच्या दारात घेऊन जातं व न्यायालयेदेखील आपणच राज्यकर्ते असल्याच्या थाटात सण-उत्सवांच्या विरोधात फर्मानं जारी करतात. जणू न्यायालयांच्या टेबलावरील सर्व प्रकरणं संपली आहेत व हिंदूंचे, सण-उत्सव साजरे करणाऱ्या आयोजकांचे कान उपटणं व त्यांना फर्मानं सोडणं इतकंच काम उरलं आहे. जे न्यायालय हिंदूंच्या राममंदिराबाबत गेल्या पंचवीस वर्षांत निर्णय देऊ शकलं नाही, जे न्यायालय महाराष्ट्राच्या सीमा प्रश्नाबाबत निर्णय देऊन कानडी जोखडाखालील मराठी बांधवांना न्याय देऊ शकत नाही ते न्यायालय हिंदू सण-उत्सवाबाबत मार्गदर्शक नियमावली तयार करतं व त्या नियमावलीची भेंडोळी नाचवत नोकरशाही गणेशोत्सवाला आडवी जाते. हा एक प्रकारे ‘ऍट्रॉसिटी’चाच प्रकार आहे, पण हिंदूंच्या सण- उत्सवांवरील अत्याचार तुमच्या त्या ऍट्रॉसिटी कायद्यात मोडत नाहीत. त्यामुळे देवाधिराज गणरायही मुकाटपणे हे अत्याचार सहन करतात,' अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे न्यायव्यवस्था, राज्य सरकार आणि प्रशासनावर बरसले आहेत.      
 

Web Title: shivsena slams state and central government over Restrictions on hindu festivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.