मुंबई : नागपूर येथे होणा-या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या वाढदिवस दिनी, १२ डिसेंबर रोजी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बैठक मुंबईत झाली. बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, माणिकराव ठाकरे, अजित पवार, जयंत पाटील, शरद रणपिसे आदी उपस्थित होते. कर्जमाफीतील घोळ, हमीभावाची बंद पडलेली खरेदी केंद्रे, विदर्भात कापसावर आलेली बोंडअळी, यामुळे राज्यात भाजपा सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही काँग्रेसने दोन वेगळ्या चुली मांडणे योग्य नाही, त्यातून चांगला संदेश जाणार नाही अशी चर्चा झाल्यामुळे दोघांनीही आपापले कार्यक्रम बदलले.
काँग्रेस १३ डिसेंबरला आक्रोश मोर्चा काढणार होती, तर राष्टÑवादीतर्फे ११ डिसेंबर रोजी हल्लाबोल आंदोलन केले जाणार होते. आता दोघांनीही आपापल्या तारखा मागेपुढे केल्या आणि १२ डिसेंबर रोजी राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसा दिनी नागपुरात मोठा एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. या मोर्चात स्वत: शरद पवारही सहभागी होणार आहेत. काँग्रेसतर्फे दिल्लीतून कोण या मोर्चाला येणार हे लवकरच ठरवले जाईल, असे खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले. तर गुलाम नबी आझाद अथवा अन्य नेत्यांना त्या दिवशी बोलावले जाईल, असे विखे पाटील यांनी सांगितले.
>गप्प राहू नका..!
मंगळवारी खा. अशोक चव्हाण यांनी विधान भवनात पक्ष कार्यालयात अधिवेशनाच्या निमित्ताने बैठक घेतली. अधिवेशन दोनच आठवड्याचे असले तरी आक्रमक विरोधी पक्ष म्हणून आपली प्रतिमा राज्यभर गेली पाहिजे, सरकारच्या धोरणावर टीका करा, गप्प राहू नका, असे खा. चव्हाण म्हणाले. त्या वेळी विखे पाटील यांनी फारसे भाष्य केले नाही.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.