Sandeep Deshpande and eight others in Arthur Road Jail | संदीप देशपांडेंसह आठही जण आर्थर रोड कारागृहात

मुंबई : काँग्रेस कार्यालय तोडफोडप्रकरणी अटकेत असलेले मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंसह आठही कार्यकर्त्यांना आणखी दोन दिवस कोठडीची हवा खावी लागणार आहे. सोमवारी आठही जणांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, त्यांच्या जामीन अर्जावर ६ तारखेला सुनावणी होणार असल्याने त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली.
आझाद मैदान परिसरात असलेल्या मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात १ डिसेंबर रोजी मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या गुन्ह्यात पोलिसांनी देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश चिल्ले, विशाल कोकणे, हरीश सोळुंकी आणि दिवाकर पडवळ यांना अटक केली. गुन्ह्यात वापरलेल्या ३ मोटारसायकल, बांबू पोलिसांनी हस्तगत केले
आहे. सोमवारी आठही जणांच्या वाढीव कोठडीसाठी त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. त्यांनी गुन्ह्याच्या दरम्यान घातलेले कपडे हस्तगत करणे बाकी असल्याचे सांगत पोलिसांनी वाढीव कोठडीची मागणी केली. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळत आठही जणांना १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
त्यांचा जामीन अर्ज न्यायालयात सादर करण्यात आला असून ६ डिसेंबरला त्यावर सुनावणी होईल, असे देशपांडे यांचे वकील राजेंद्र तिरोडकर यांनी सांगितले. सर्व आरोपींची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.