वृक्ष संवर्धनासाठी प्रोत्साहन देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 02:15 AM2018-02-09T02:15:21+5:302018-02-09T02:15:54+5:30

महापालिकेचे वृक्ष प्रदर्शन मुंबईकरांना वृक्ष संवर्धनासाठी प्रोत्साहन देईल. वृक्षांबाबत मुंबईकर जागरूक होतील. सोसायटी, गच्ची, गॅलरीमध्ये तसेच शक्य असेल त्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यासाठी नागरिक प्रशिक्षित होतील, असे मत मुंबई महापालिकेचे उद्यान अधीक्षक आणि वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान मांडले.

Promote tree conservation | वृक्ष संवर्धनासाठी प्रोत्साहन देणार

वृक्ष संवर्धनासाठी प्रोत्साहन देणार

Next

- अक्षय चोरगे
मुंबई : महापालिकेचे वृक्ष प्रदर्शन मुंबईकरांना वृक्ष संवर्धनासाठी प्रोत्साहन देईल. वृक्षांबाबत मुंबईकर जागरूक होतील. सोसायटी, गच्ची, गॅलरीमध्ये तसेच शक्य असेल त्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यासाठी नागरिक प्रशिक्षित होतील, असे मत मुंबई महापालिकेचे उद्यान अधीक्षक आणि वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान मांडले. मुंबई महापालिका व वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने २३व्या झाडे, फुले व भाज्यांचे प्रदर्शन तसेच उद्यान कलेच्या १५ विविध विषयांवरील प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत भायखळा पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात सर्वांना पाहता येणार आहे. यानिमित्ताने परदेशी यांच्याशी साधलेला हा संवाद ‘लोकमत’च्या वाचकांसाठी.
प्रदर्शनामागचा हेतू काय? तो सफल होईल का?
- महाराष्टÑ नागरी क्षेत्र वृक्षसंरक्षण व संवर्धन अधिनियम १९७५मधील प्रकरण ४ कलम ७ (क)मधील तरतुदीनुसार वृक्ष प्राधिकरणातर्फे वर्षातून किमान एकदा तरी फुले, फळे, भाज्या व झाडे यांचे प्रदर्शन व कार्यशाळा आयोजित करण्यात येते. त्यानुसार पालिकेने १९९६पासून २२ वेळा प्रदर्शनांचे आयोजन केले आहे. यंदाचे २३वे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनामुळे लोकांना झाडे आणि निसर्गाचे महत्त्व पटवून देण्यात पालिका यशस्वी झाली आहे. लाखो मुंबईकरांना यानिमित्ताने मुंबईत कमीतकमी जागेत झाडे कशी लावावी, त्यांचे संवर्धन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले आहे.
नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतो?
- दरवर्षी एक ते दीड लाख मुंबईकर या प्रदर्शनाला भेट देतात. तसेच दरवर्षी आदल्या वर्षाच्या तुलनेने दहा ते पंधरा टक्के मुंबईकरांची गर्दी वाढते. या वर्षी १ लाख ७५ हजार मुंबईकर प्रदर्शनाला भेट देतील, अशी अपेक्षा आहे. तसेच काही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारही या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. पालिकेच्या शाळा, खाजगी शाळा आणि विविध महाविद्यालयांतील वनस्पतीशास्त्राचे विद्यार्थी व शिक्षक या प्रदर्शनाला भेट देतात.
प्रदर्शनात कोणती व किती झाडे पाहायला मिळतील?
- प्रदर्शनात तब्बल २५० ते ३०० प्रजातींची ५ हजार झाडे पाहायला मिळतील. त्यामध्ये प्रामुख्याने औषधी झाडे, फूल झाडे, फळ झाडे, ठरावीक ऋतूमध्ये येणारी फुले, रोडसाईड ट्रीज्, परदेशी पालेभाज्या, शोभेची झाडे, हँगिंग ट्रीज् पाहायला मिळतील.
५ हजारांहून अधिक वृक्ष कोठून आणले जाणार?
- ५ हजारांहून अधिक झाडे पालिकेची आहेत. पालिकेच्या २४ वॉर्डमधून प्रत्येकी २५० ते ३०० झाडे प्रदर्शनासाठी आणली जातील. प्रत्येक विभागासाठी झाडांच्या विविध प्रजातींंची वर्गवारी करून देण्यात आली आहे. प्रत्येक वॉर्डमधील उद्यान विभागाने या झाडांची निर्मिती केली आहे. मागील तीन महिन्यांपासून वृक्ष लागवडीचे काम सुरू आहे.
प्रदर्शनात काय खास असेल?
- यंदा पुष्पप्रदर्शनात खास आकर्षण म्हणून फुलांची/हिरवळीची सजावट करून विविध जलचर (मगर, खेकडा, डॉल्फिन, स्टार फिश, आॅक्टोपस, कासव, बदक, जलपरी, अ‍ॅनाकोंडा, फुलझाडांची नाव) तयार करण्यात आले आहेत.
गृहनिर्माण संस्था व आस्थापनांसाठीची स्पर्धा कशी असते?
- ज्या गृहनिर्माण संस्था, आस्थापना, खाजगी इमारतींच्या आवारात जास्तीतजास्त वृक्ष लावलेले असतील, सोसायटीच्या परिसरात हिरवळ निर्माण केलेली असेल. ग्रीन वेस्टचे उत्तम व्यवस्थापन केलेले असेल अशा संस्थेचा पालिकेतर्फे गौरव करण्यात येतो. या स्पर्धेमुळे अधिकाधिक सोसायट्या त्यांच्या आवारात झाडे लावण्यासाठी व ती टिकवण्यासाठी प्रवृत्त झाल्या आहेत. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाºया सोसायट्यांना पालिकेच्या उद्यान विभागातर्फे मोफत मार्गदर्शन करण्यात येते. दरवर्षी या सोसायट्यांची संख्या वाढत आहे.
प्रशिक्षण शिबिर कशा प्रकारचे असेल?
पालिकेतर्फे उद्यान कलेल्या १५ वेगवेगळ्या विषयांवरील प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, प्राध्यापक मुंबईकरांना मार्गदर्शन करतील. यामध्ये इनडोअर गार्डनिंग, किचन गार्डन, लँडस्केप आणि व्हर्टिकल गार्डन, किचन अ‍ॅण्ड
गार्डन व्हेस्ट इनटू एनर्जी,
आयुर्वेद, वृक्ष संवर्धन अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रशिक्षण शिबिरासाठी पालिका शुल्क आकारणी का करते?
- पालिकेचे प्रदर्शन आणि प्रशिक्षण शिबिर एकाच वेळी आयोजित करण्यात येते. प्रदर्शन मोफत असते, त्यामुळे प्रदर्शनाला लाखाहून अधिक लोक येतात. तितक्या संख्येत लोक प्रशिक्षणात आले तर शिस्त सांभाळणे कठीण होते. तसेच अनेकदा प्रशिक्षण शिबिराशी काहीही संबंध नसला तरीही शिबिराच्या ठिकाणी मोठ्या
संख्येने लोक जमतात. त्यामुळे गरजूंसाठीच हे प्रशिक्षण शिबिर आहे. या प्रशिक्षण शिबिराचे शुल्क आकारून पैसे कमाविण्याचा पालिकेचा हेतू नाही.

Web Title: Promote tree conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.