अंधेरीत पाणीबाणीमुळे पाण्याचा प्रश्न कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 02:21 AM2017-11-14T02:21:25+5:302017-11-14T02:21:35+5:30

अंधेरी पश्चिमेकडील भागात काही महिन्यांपासून पाणीटंचाईने रहिवासी त्रस्त झाले आहेत. पाणी समस्येबाबत महापालिका विभाग कार्यालयासह स्थानिक लोकप्रतिनिधींना अनेक निवेदने सादर करण्यात आली आहेत.

 The problem of water in the dark due to waterlogging continues forever | अंधेरीत पाणीबाणीमुळे पाण्याचा प्रश्न कायम

अंधेरीत पाणीबाणीमुळे पाण्याचा प्रश्न कायम

Next

मुंबई : अंधेरी पश्चिमेकडील भागात काही महिन्यांपासून पाणीटंचाईने रहिवासी त्रस्त झाले आहेत. पाणी समस्येबाबत महापालिका विभाग कार्यालयासह स्थानिक लोकप्रतिनिधींना अनेक निवेदने सादर करण्यात आली आहेत. मात्र, तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही. पाणी समस्येबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्या वेळी लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात आले होते की, बैठक घेऊन पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपाचा तोडगा काढला जाईल. परंतु आजतागायत महापालिका तोडगा काढण्यात अपयशी ठरली आहे. परिणामी, काही दिवसांत पालिकेच्या के/पश्चिम विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारादेखील रहिवाशांनी दिला आहे.
वीरा देसाई मार्ग, जीवननगर, सहकारनगर, टेप दर्गा, रामवाडी, आझादनगर इत्यादी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. परिसरात सकाळी ५.३० ते ११.३० या वेळेत पाणीपुरवठा केला जात होता. परंतु त्यात बदल करून सकाळी ७.४५ ते १०.३० या वेळेत पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी कमी मिळत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रहिवाशांना पाण्यासाठी खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागते. एका सोसायटीमागे महिन्याला तब्बल ५० ते ६० हजार रुपये पाण्यासाठी खर्च करावा लागतो. जवळपास १६ ते १७ हजार नागरिकांना पाण्याच्या समस्येला दररोज सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधींनी पाणी समस्येवर बैठक लावली. मात्र, त्यावर ठोस अशी उपाययोजना करायला महापालिका कमी पडत आहे. पाण्याची वेळ कमी केली. तसेच पाण्याची पाइपलाइन छोटी असल्याने पाणी जास्त दाबाने येत नाही. त्यामुळे महापालिकेने पाण्याचा दाब वाढवला तरी कमी वेळात पुरेसे पाणी मिळणे कठीण झाले आहे. पाण्याचा दाब वाढवण्यापेक्षा वेळ वाढवावा, असे नागरिकांनी महापालिकेला सांगितले. मात्र महानगरपालिका नागरिकांच्या मागणीकडे कानाडोळा करत आहे, अशी माहिती शिवसेना उपशाखाप्रमुख सुबोध चिटणीस यांनी दिली.

Web Title:  The problem of water in the dark due to waterlogging continues forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी