तंदुरीच्या दोनशे रुपयांसाठी मुख्यमंत्री कार्यालयातील शिपायाची हत्या, एक गंभीर जखमी
By मनीषा म्हात्रे | Published: April 29, 2024 11:39 PM2024-04-29T23:39:22+5:302024-04-29T23:40:52+5:30
या हल्ल्यात ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात अक्षय नार्वेकर (३०) या तरुणाची हत्या झाली आहे. तो मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत होता.
मुंबई : तंदुरीच्या दोनशे रुपयांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील शिपायाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुलुंड मध्ये घडली आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत ५ जणांना अटक केली आहे.
या हल्ल्यात ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात अक्षय नार्वेकर (३०) या तरुणाची हत्या झाली आहे. तो मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत होता. रविवारी अक्षय हा इम्रान खानच्या चिकन सेंटरमध्ये तंदुरी घेण्यासाठी गेला. अक्षयकडे दोनशे रुपयांची कॅश नसल्याने
त्याने पैसे नंतर देतो असे सांगितले. मात्र इम्रानने वाद घातला. अखेर, त्याने दुसऱ्याला सांगून पैसे ऑनलाईन ट्रान्सफर केले. मात्र त्यावरून दोघांमध्ये वाद झाले. रात्री याच वादातून आरोपींनी अक्षय आणि त्याच मित्र आकाश साबळे (३०) वर चाकूने व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. यामध्ये नार्वेकरला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी हत्या, हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवत पोलिसांनी तपास सुरू केला.
चौकशी दरम्यान इम्रान खान व सलीम खान यांच्याच सांगण्यावरुन अक्षय आणि आकाशवर हल्ला केल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी इम्रान महमुद खान (२७), सलीम महमुद खान (२९), फारुख गफार बागवान (३८), नौशाद अली गफार बागवान (३५) आणि अब्दुल गफार बागवान (४०) या पाच जणांना अटक केली आहे. मुलुंड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.