नायर डेंटल कॉलेजची नवीन इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; वैद्यकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 09:59 AM2024-03-01T09:59:30+5:302024-03-01T10:02:56+5:30

सर्वसामान्य मुंबईकरांना दातांचे उपचार अत्याधुनिक यंत्र सामुग्रीद्वारे व्हावे म्हणून नायर दंत रुग्णालयाशेजारी ११ मजल्यांची नवीन इमारत उभारण्यात आली आहे.

new building of nair dental college awaiting inauguration surprised in medical circles | नायर डेंटल कॉलेजची नवीन इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; वैद्यकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त

नायर डेंटल कॉलेजची नवीन इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; वैद्यकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त

मुंबई : सर्वसामान्य मुंबईकरांना दातांचे  उपचार  अत्याधुनिक यंत्र सामुग्रीद्वारे व्हावे म्हणून नायर दंत रुग्णालयाशेजारी ११ मजल्यांची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. त्यात अत्याधुनिक उपचार देणारी यंत्रसामुग्रीसह सज्ज असणारी प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. तेथील डॉक्टरांसाठी त्याठिकाणी उच्च दर्जाचे वर्गही उभारले आहेत. उत्तम सुविधा असलेली ही इमारत अनेक महिन्यांपासून तयार आहे. मात्र, या इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त कधी मिळणार? याबाबत वैद्यकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

ही नवीन इमारत डिसेंबर महिन्यात बांधून पूर्ण झाली आहे. त्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. विशेष म्हणजे पदवी अभ्यासक्रमाची विद्यार्थी संख्या वाढली आहे. जुन्या इमारतीतील क्लासरूमची क्षमता ६० विद्यार्थी बसू शकतील इतकी आहे. त्यामुळे नवीन इमारतीचे उद्घाटन झाल्यास विद्यार्थ्यांना नवीन क्लासरूममध्ये बसण्यास जागा होईल.   वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ही इमारत गेले तीन महिने बांधून तयार आहे. महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी या इमारतीच्या उद्घाटनाचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे जोपर्यंत ते निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत या इमारतीचे उद्घाटन शक्य नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याअगोदर या इमारतीचे उद्घाटन होईल, असे सांगितले जात आहे.  

या आहेत सुविधा...

१)  दंत उपचारातील स्पेशालिटीचे नऊ पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे कोर्सेस - २४ डॉक्टर प्रत्येक वर्षी

२)  पदवी अभ्यासक्रमाचे ७५ विद्यार्थी याठिकाणी दरवर्षी प्रवेश घेत असतात.

३)  दोन विषयांत पीएचडी कोर्सेस  सहा विद्यार्थी प्रवेश घेतात.

४)  ४ ऑपरेशन थिएटर

५)  नऊ स्पेशालिटीचे ओपीडी वॉर्ड

६)  एक आयसीयू

७)  २६५ मुलांसाठी हॉस्टेल रुग्णालय परिसरात

८)  १०० मुले बसतील इतके २ भव्य क्लासरूम

९) कॅड कॅम अत्याधुनिक लॅबोरेटरी (दाताचे रोपण दोन ते तीन सिटिंगमध्ये होतील, पूर्वी पाच ते सहा सिटिंग लागायच्या.

Web Title: new building of nair dental college awaiting inauguration surprised in medical circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.