मुंबई : भारतीय परंपरेत योग अभ्यासाचे महत्त्व विशद केले आहे. योग ही देशाची प्राचीन कला आहे. याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर व्हावा, यासाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे प्रशासकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात जगातील सर्वांत जुन्या सांताक्रूझच्या योग इन्स्टिट्यूटला पहिले अधिकृत योग स्कूल म्हणून मान्यता मिळाली आहे.
जगभरात दर्जेदार प्रमाणपत्रीय योग शिकवण्यासाठी, भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने, क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियातर्फे (क्यूसीआय) योग प्रमाणपत्रीय योजना आणली आहे. प्रशासकीय प्रमाणपत्रीय अभ्यासक्रम घेणारी अधिकृत संस्था म्हणून योग स्कूलला पहिल्यांदा प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
क्यूसीआय प्रमाणपत्राची गरज विशद करताना सांताक्रूझ योग इन्स्टिट्यूटच्या संचालिका हंसाजी जयदेव योगेंद्र म्हणाल्या की, सध्याच्या जीवनशैलीत योगाचे महत्त्वाचे स्थान आहे. योगाचे फायदे अगदी निश्चित स्वरूपात मिळतातच. २१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे योगाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. दर्जेदार योग सरावाद्वारे आपल्याकडील पारंपरिक ज्ञान जगभरात पोहोचवण्याची पंतप्रधानांची इच्छा आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस जाहीर झाल्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर योगतज्ज्ञांना मागणी वाढत आहे. (प्रतिनिधी)
>योग इस्टिट्यूटचे कौतुक
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयुष मंत्रालयातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत हे प्रमाणपत्र हंसाजी जयदेव योगेंद्र यांना लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वेळी क्यूसीआयचे अध्यक्ष अदिल झैनुल आणि आयुषचे मंत्री श्रीपाद नाईक आदी मान्यवरांचीही उपस्थिती होती. सुमित्रा महाजन यांनी योगप्रसारातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल योग इन्स्टिट्यूटचे कौतुक केले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.