मुंबईकरांची सुरक्षा ऐरणीवर! महापालिकेचे दुर्लक्ष : दाटीवाटीने पसरलेल्या झोपड्या, गाळ्यांमधील नागरिकांचा जातोय बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 02:21 AM2017-12-19T02:21:54+5:302017-12-19T02:22:23+5:30

कुर्ला पश्चिमेकडील मुंबई महापालिकेच्या हद्दीतील ‘एल’ वॉर्डच्या खैरानी रोडवरील भानू फरसाणच्या दुकानाला सोमवारी लागलेल्या आगीत, तब्बल बारा कामगारांना आपला जीव गमवावा लागला. खैरानी रोडवरील ही पहिली दुर्घटना नाही. अशा अनेक दुर्घटना मुंबई शहर आणि उपनगरांत घडल्या असून, यात अनेकांचा नाहक बळी गेला आहे.

Mumbaikars security alarm! Neglect of Municipal: People living in slums, cottages spread by dhatiwati, are the victims | मुंबईकरांची सुरक्षा ऐरणीवर! महापालिकेचे दुर्लक्ष : दाटीवाटीने पसरलेल्या झोपड्या, गाळ्यांमधील नागरिकांचा जातोय बळी

मुंबईकरांची सुरक्षा ऐरणीवर! महापालिकेचे दुर्लक्ष : दाटीवाटीने पसरलेल्या झोपड्या, गाळ्यांमधील नागरिकांचा जातोय बळी

Next

मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील मुंबई महापालिकेच्या हद्दीतील ‘एल’ वॉर्डच्या खैरानी रोडवरील भानू फरसाणच्या दुकानाला सोमवारी लागलेल्या आगीत, तब्बल बारा कामगारांना आपला जीव गमवावा लागला. खैरानी रोडवरील ही पहिली दुर्घटना नाही. अशा अनेक दुर्घटना मुंबई शहर आणि उपनगरांत घडल्या असून, यात अनेकांचा नाहक बळी गेला आहे. मात्र, अशा घटनांनंतरही महापालिका प्रशासन जागे होत नसल्याचे चित्र आहे. महत्त्वाचे म्हणजे, अत्यंत दाटीवाटीने वसलेल्या झोपड्या, गाळे आणि यामध्ये काम करणारे कामगार अथवा नागरिकांचा अशा दुर्घटनांत बळी जात असून, त्यांच्या सुरक्षेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ‘ये आग कब बुझेगी...’ हा प्रश्न निरुत्तरितच आहे.
कुर्ला पश्चिमेकडील खैरानी रोडसह लगतचा परिसर हा मुंबई महापालिकेच्या हद्दीत येतो. या परिसरात अनेक झोपड्या असून, मोठ्या प्रमाणावर भंगारसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे गाळे आहेत. ते साधारण दहा बाय दहासह पन्नास बाय पन्नासचे आहेत. फरसाणसारखे अनेक उद्योगधंदे या परिसरात चालविले जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे, मुंबईत सर्वाधिक अनधिकृत बांधकामे ही ‘एल’ वॉर्डच्या हद्दीत आहेत. येथील गाळ्यांमध्ये काम करणारे बहुतांश कामगार हे गाळ्यातच राहतात, यापैकी अनेक कामगार हे उत्तर भारतीय आहेत. येथे राबत असलेल्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे.
गाळ्यातच वास्तव्य करत असलेल्या कामगारांना पुरेशा सोईसुविधा देण्याचे काम हे संबंधित गाळेधारकाचे किंवा व्यवसाय करत असलेल्या मालकाचे आहे, परंतु कामगारांच्या सेवा-सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते. सेवा-सुविधांचा बोजवारा असतानाच, कामगारांच्या सुरक्षेबाबत तर काहीच उपाययोजना नाहीत. आगीसारख्या मोठ्या दुर्घटना घडल्यानंतर त्यावर उपाययोजना करण्यासाठीची यंत्रणा येथील एकाही गाळ्यात नाही, ही वस्तुस्थिती आहे. मुंबई महापालिकेने याकडे पूर्णत: दुर्लक्ष असून, सोमवारच्या दुर्घटनेत बळी गेलेल्या कामगारांच्या जिवांची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न निरुत्तरित आहे.
फायर आॅडिटवर प्रश्नचिन्ह :
मुंबईच्या झवेरी बाजार येथील एका म्हाडाच्या सेझ इमारतीचा काही भाग कोसळून चार नागरिकांचा नाहक बळी गेला होता. तसेच सोमवारी पहाटे साकीनाका येथे भानू फरसाणच्या दुकानाला लागलेल्या आगीत १२ जणांचा मृत्यू झाला. या दोन्ही दुर्घटनेमधील मृतांना पालिका सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर कोणतेही कामकाज न करता सभागृह तहकूब करण्यात आले. या दुर्घटनेवर बोलचाना नगरसेवकांनी फायर आॅडिटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच फायर आॅडिटचा अहवाल सभागृहात सादर करण्याची सुचनाही त्यांनी केली आहे.
फायर हायड्रंट-
मुंबई शहर आणि उपनगरांत लागणाºया आगीच्या दुर्घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठिकठिकाणी बसवलेले फायर हायड्रंट तसे पाहिले तर मदतनीसच. येथे दाटीवाटीने वसलेल्या इमारतींच्या परिसरात आग लागल्यास, ती विझविण्यास अग्निशमन यंत्रणा फायर हायड्रंटची मदत घेते.
शहरासह उपनगरांत ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या सुमारे १० हजार ४९७ ब्रिटिशकालीन फायर हायड्रंटपैकी ९ हजार ४०५ फायर हायड्रंट बंद अवस्थेत आहेत. म्हणजे केवळ सुमारे ९२ फायर हायड्रंट सुरू असल्याची वस्तुस्थिती काही महिन्यांपूर्वी समोर आली होती.
महापालिका फायर हायड्रंटच्या आकडेवारीबाबत कायमच वस्तुस्थिती लपविण्याचा प्रयत्न करते. प्रशासन नागरिकांना ठोस माहिती देत नाही आणि माहिती दिली, तर ती अर्धवट देते. परिणामी, वस्तुस्थिती समोर येत नाही.
आग भडकल्यानंतर आग विझविणाºया गाडीचा पाइप या हायड्रंटला जोडल्यास, आग विझविण्यासाठी आवश्यक पाण्याचा मारा करणे शक्य होते, परंतु आजघडीला या फायर हायड्रंटची दुरवस्था झाली आहे.
काही फायर हायड्रंट तर जमिनीखाली गाडले गेले आहेत, तर काहींलगत अतिक्रमणे झाली आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाने याकडे कानाडोळा केला आहे.
गेल्या पाच वर्षांत आगीच्या दुर्घटनांमध्ये आठ जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यात ३ जवान आणि ५ अधिकाºयांचा समावेश आहे. अग्निशमन दलाचा वार्षिक अर्थसंकल्प २५० कोटी रुपये आहे.
मागील तीन वर्षांपासून अग्निशमन दल कात टाकतोय, असे म्हटले जात आहे. प्रत्यक्षात बदल काहीच होत नसल्याचे चित्र आहे.
मुंबईमधील फायर हायड्रंटचा सातत्याने वापर झाला पाहिजे, शिवाय फायर हायड्रंटची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती झाली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, येथील फायर हायड्रंटच्या वापराबाबतचे प्रशिक्षण मुंबईकरांना दिले पाहिजे आणि असे झाले, तर वारंवार घडणाºया आगीच्या दुर्घटनांच्या वेळी संपूर्णत: अग्निशमन दलावर अवलंबून राहावे लागणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मुंबईतील आगीच्या घटना
चर्चगेट, बी. रोडवरील सिडनहॅम महाविद्यालयाच्या तिसºया मजल्यावरील लायब्ररीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली होती. यात जुनी पुस्तके, लायब्ररीमधील कोरीव व दुर्मीळ फर्निचर आणि अन्य ग्रंथ संपदा आगीत जळून खाक झाली होती.
गोरेगाव पूर्वेकडील हब मॉलमध्ये आग लागली होती. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी वित्तहानी मात्र मोठी झाली होती.
लोअर परळ पश्चिमेकडील फिनिक्स मॉलसमोरील किमजी नामजी चाळीला लागलेल्या आगीत वित्तहानी झाली होती.
चेंबूरच्या सिंधी कॉलनी परिसरात लिबर्टी शू मार्टला लागलेल्या आगीत मोठी वित्तहानी झाली होती.
कुर्ल्यातील कपाडियानगरच्या कुरैय्या कंपाउंडमधील कपड्यांसह भंगारच्या गोदामांना लागलेली आग, गर्दुल्ल्यांकडून लावण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता.
मानखुर्द मंडाळा येथील ४०० बैठ्या शेडला लागलेली आग येथील रसायनांच्या साठ्यामुळे भडकली होती. या आगीत दोन जण जखमी झाले होते.
मुलुंडहून अंधेरीकडे जाणाºया बेस्ट बस क्रमांक ३९६ ने चकाला येथे पेट घेतल्याची घटना घडली होती. पेटलेली बस पूर्णत: जळून खाक झाली होती.
कुर्ला पश्चिमेकडील मोहम्मद कम्पाउंडमधल्या गोदामाला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले होते.
अंधेरी पूर्वेकडील चकाला येथील सहा माळ्यांच्या हॉटेल समराजच्या पहिल्या आणि दुसºया मजल्यावर लागलेल्या आगीदरम्यान, जखमी झालेल्या १२ नागरिकांवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.
विद्याविहार पश्चिमेकडील ओएसिस स्कायलाइन सोसायटीच्या तळघरात लागलेल्या आगीत १२ चारचाकी गाड्या जळून खाक झाल्या होत्या.
गोवंडी रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या एका फूड गोदामाला लागलेल्या आगीत मोठी आर्थिक हानी झाली होती.
कांदिवलीच्या समतानगर परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर उभ्या असलेल्या एका खासगी बसने पेट घेतला होता. बस रिकामी असल्याने जीवितहानी झाली नव्हती.
मुंबईपासून काही अंतरावर समुद्रातील जवाहर दीप बेटावरील डिझेल टँकच्या परिसरात वीज कोसळून येथील इंधनाच्या टँकना आग लागल्याची दुर्घटना घटना घडली होती. सुदैवाने दुर्घटनेत जीवितहानी झाली नव्हती.
वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाडा, गरीबनगर झोपडपट्टीतील अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेतर्फे कारवाई सुरू असतानाच लागलेल्या आगीत शेकडो झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले होते.
वडाळा ते चेंबूर या मार्गावर धावणाºया मोनोरेलच्या एका डब्याला मैसूर स्थानकावर आग लागली होती. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नव्हती.
विक्रोळी पश्चिमेकडील गांधीनगर येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ११व्या मजल्यावर आग लागली होती. आगीमुळे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील वाहतुकीवर परिणाम झाला होता.
अग्निशमन दलाच्या अहवालात...
मुंबईला ‘हादसो का शहर’ म्हटले जाते. दररोज येथे छोटे-मोठे अपघात होत असतात. मात्र, जुन्या चाळी आणि इमारतींमधील ४० वर्षे जुन्या सदोष वायरिंगने अपघातांचा धोका वाढविला आहे. ही धक्कादायक बाब अग्निशमन दलाच्या अहवालातून समोर आली होती.
सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ५५० दुर्घटना घडल्या. यामध्ये आठ जण मृत्युमुखी, तर ३९ जखमी झाले. प्रत्येक महिन्यात दोनशे ते अडीचशे दुर्घटना घडतात. गेल्या काही वर्षांमध्ये दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. २०१६ मध्ये दरमहा सरासरी ३००-३५० दुर्घटना घडल्या. ही बाब शहरासाठी धोक्याची घंटा आहे.
या अहवालानुसार सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात २९६ दुर्घटना घडल्या. बहुतांश आगींमागचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घर पडणे, झाड कोसळणे, नाल्यासह समुद्रात बुडणे अशा दीडशे घटना, असे अपघात दर महिन्याला घडत असतात.

Web Title: Mumbaikars security alarm! Neglect of Municipal: People living in slums, cottages spread by dhatiwati, are the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.