उत्तरपत्रिका तपासणीसाठी सुट्टी वाढविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 04:45 AM2017-07-28T04:45:16+5:302017-07-28T04:45:29+5:30

परीक्षांचे रखडलेले निकाल लावण्यासाठी मुंबई विद्यापीठ आता हातघाईवर आले आहे. ३१ जुलैपर्यंत निकाल लावण्यासाठी यापूर्वी चार दिवस मुंबईतील महाविद्यालयांना सुट्टी दिली असताना आता पुन्हा एकदा सुट्टीत वाढ करण्यात आली आहे.

Mumbai university ,Answer sheet, news | उत्तरपत्रिका तपासणीसाठी सुट्टी वाढविली

उत्तरपत्रिका तपासणीसाठी सुट्टी वाढविली

Next

मुंबई : परीक्षांचे रखडलेले निकाल लावण्यासाठी मुंबई विद्यापीठ आता हातघाईवर आले आहे. ३१ जुलैपर्यंत निकाल लावण्यासाठी यापूर्वी चार दिवस मुंबईतील महाविद्यालयांना सुट्टी दिली असताना आता पुन्हा एकदा सुट्टीत वाढ करण्यात आली आहे. मुंबई शहर-उपनगरातील कला, विधी आणि विज्ञान शाखांच्या महाविद्यालयांना ३१ जुलैपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठात गुरुवारी सायंकाळी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून याविषयी महाविद्यालयांना सूचना देण्यास सांगितले आहे.
मुंबई विद्यापीठाने गुरुवारी जारी केलेल्या पत्रकात विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेच्या ९५ टक्के उत्तरपत्रिका तपासून झाल्याचे म्हटले आहे. शिवाय, मॅनेजमेंट व कला शाखेच्याही अनुक्रमे ९० आणि ८० टक्के उत्तरपत्रिका तपासून झाल्याचा दावा केला आहे. मात्र विधी आणि वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिकांचे तपासणी काम आणखी जलद गतीने होणे अपेक्षित असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. तसेच, विज्ञान, तंत्रज्ञान आणि मॅनेजमेंट शाखांच्या प्राध्यापक वर्गाने उत्तरपत्रिका तपासणीसाठी मुदतवाढ मिळावी, अशी विद्यापीठाला विनंती केल्याचेही म्हटले आहे.
लाखोंच्या संख्येने असलेल्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी अक्षरश: महाविद्यालयांना टाळे ठोकून प्राध्यापकांना तपासणीसाठी जुंपण्याची नामुष्की ओढावली आहे. २४ ते २७ जुलै या कालावधीसाठी महाविद्यालये बंद करण्यात आली होती, आता त्यात वाढ करण्यात आली असून ३१ जुलैपर्यंत महाविद्यालयांनीच ‘मास बंक’ पुकारला आहे.
बुधवारी तब्बल १ लाख १८ हजार ४६१ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झाले असून ४९ हजार ४७० उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन झाल्याची माहिती मुंबई विद्यापीठाकडून मिळाली. तर ५ हजार १८९ प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासणीचे काम केले. अजूनही साडेतीन ते चार लाख उत्तरपत्रिका तपासणी बाकी आहे. या गोंधळामुळे बºयाच विद्यार्थ्यांनी करिअर निवडीपासून पुढील शिक्षणासाठीचे प्रवेश, गुणपत्रिका हातात मिळणे, निकाल अचूक लागणे या मुद्द्यांविषयी मनात धास्ती घेतली आहे. शिवाय, निकालाच्या या प्रश्नावर विद्यार्थी संघटनाही आक्रमक झालेल्या दिसून येत आहेत.

विद्यार्थी संघटना आक्रमक
स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया मुंबईतर्फे ३१ जुलैपर्यंत
निकाल न लावल्यास कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीला घेऊन फोर्ट येथे विद्यापीठात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तसेच, अभाविपनेही गुरुवारी विद्यापीठाच्या आवारात कुलगुरू आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात निदर्शने केली. त्याचप्रमाणे मनसेच्या शिष्टमंडळानेही कुलगुरूंची भेट घेत निकाल लागल्यावरही विद्यार्थ्यांना साहाय्य करण्याची मागणी केली.

मुंबई विद्यापीठात गुरुवारी रात्री ९ वाजेपर्यंत १ लाख ४ हजार १२८ उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या. शुक्रवारी सर्व विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेचे निकाल लागतील असे परीक्षा विभागाने सांगितले. ११ अभ्यासक्रमांचे निकाल लागले आहेत. जवळपास ४ लाख उत्तरपत्रिका तपासायच्या असून आणखी चार दिवस बाकी असल्याचे विद्यापीठाने सांगितले.

Web Title: Mumbai university ,Answer sheet, news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.