आरे, सीप्झ, मरोळ नाका स्थानके अशी बदलणार ,‘मल्टी मॉडल इंटिग्रेशन’द्वारे सुविधा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 09:58 AM2024-04-04T09:58:50+5:302024-04-04T10:00:45+5:30

कुलाबा ते सीप्झ मेट्रो-३ मार्गिकेचा पहिला टप्पा येत्या काही महिन्यांत सुरू होणार आहे.

mumbai aarey seepz and marol naka metro stations to be changed facilities through multi modal integration | आरे, सीप्झ, मरोळ नाका स्थानके अशी बदलणार ,‘मल्टी मॉडल इंटिग्रेशन’द्वारे सुविधा 

आरे, सीप्झ, मरोळ नाका स्थानके अशी बदलणार ,‘मल्टी मॉडल इंटिग्रेशन’द्वारे सुविधा 

मुंबई : कुलाबा ते सीप्झ मेट्रो-३ मार्गिकेचा पहिला टप्पा येत्या काही महिन्यांत सुरू होणार आहे. या मेट्रो मार्गिकेवरील स्थानकांच्या परिसरातील कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांना सहजरीत्या पोहोचता यावे, याकरिता मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. यानुसार, आरे, सीप्झ, मरोळ नाका आणि एमआयडीसी या चार स्थानकांच्या परिसरात मल्टी मॉडल इंटिग्रेशन पद्धतीने सुविधांची निर्मिती केली जाणार आहे. एमएमआरसीकडून या स्थानकांच्या परिसरात सुविधा निर्माण करण्यासाठी सात कोटी ७४ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. 

मेट्रो स्थानकात प्रवासी बस, ऑटो रिक्षा, दुचाकी, खासगी वाहनाने किंवा पायी येतात. एकाच वेळी मोठ्या संख्येने आलेले प्रवासी आणि विविध प्रकारांतील वाहनांमुळे मेट्रो स्थानकांच्या परिसरात कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे, तसेच मेट्रो स्थानकाकडे पोहोचण्याचे पादचारी मार्ग, रस्त्यांना अतिक्रमणांचा वेढा पडलेला असतो. पदपथांची दुरवस्था झालेली असते. 

रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी केली जातात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते. यावर मार्ग काढण्यासाठी हा परिसर मल्टी मॉडेल इंटिग्रेशन पद्धतीने विकसित केला जाणार आहे. यातून स्थानकांच्या परिसरातील वाहतुकीचे नियोजन केले जाणार आहे. 

येत्या काही महिन्यांत कंत्राटदाराची नियुक्ती -

‘एमएमआरसी’ने मल्टी मॉडेल इंटिग्रेशन पद्धतीने सुविधा निर्माण करण्यासाठी कंत्राटदार नियुक्तीकरिता निविदा काढल्या आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यांत कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. 

अशा असतील सोयी-

१) चालणे सुलभ व्हावे, यासाठी मोठे पदपथ उभारणार

२) बस, रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहने आदींसाठी नियोजित जागा 

३) मेट्रो स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना गाडीतून उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी सुविधा

४) स्थानकांच्या परिसरात लेन मार्किंग, चिन्हे, बलार्ड, बाके, ई-टॉयलेट आदींचा विकास

५) जंक्शन सुधारणा आणि सिग्नल यंत्रणा उभारणे

६) माहिती फलकांची उभारणी

७) स्थानकांच्या परिसरातील सेवा वाहिन्यांची जागा बदलणे

८) बसण्यासाठी बाके, पथदिव्यांची उभारणी

Web Title: mumbai aarey seepz and marol naka metro stations to be changed facilities through multi modal integration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.