विलेपार्ले येथील मुकेश पटेल सभागृहाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 03:18 AM2017-09-25T03:18:29+5:302017-09-25T03:18:34+5:30

विलेपार्ले पश्चिमेकडील शिक्षण क्षेत्रातील अग्रणी श्री विलेपार्ले केलवणी मंडळाच्या नरसी मोनजी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये उभारण्यात आलेल्या मुकेश पटेल सभागृहाचा लोकार्पण सोहळा रविवारी

Mukesh Patel's Hall of Worship at Vile Parle | विलेपार्ले येथील मुकेश पटेल सभागृहाचे लोकार्पण

विलेपार्ले येथील मुकेश पटेल सभागृहाचे लोकार्पण

googlenewsNext

मुंबई : विलेपार्ले पश्चिमेकडील शिक्षण क्षेत्रातील अग्रणी श्री विलेपार्ले केलवणी मंडळाच्या नरसी मोनजी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये उभारण्यात आलेल्या मुकेश पटेल सभागृहाचा लोकार्पण सोहळा रविवारी सायंकाळी मुकेश पटेल यांच्या सर्व जुन्या स्नेहींच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला. या वेळी झी समूहाचे चेअरमन आणि खासदार सुभाष चंद्रा, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, श्री विलेपार्ले केलवणी मंडळ संस्थेचे चेअरमन आणि कुलपती तसेच माजी शिक्षणमंत्री अमरिश पटेल यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर यांनी दिवंगत उद्योगपती मुकेश पटेल यांच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमा वेळी पटेल यांच्या कुटुंबीयांसह अनेक स्नेहींना अश्रू अनावर झाले होते.
मुकेश पटेल यांच्या संवेदनशीलतेचा ‘झी समूहा’चे चेअरमन आणि खासदार सुभाष चंद्रा यांनी अत्यंत भावूक शब्दांत उल्लेख केला. त्यांचा मृत्यू पाहावणार नसल्यानेच दीड ते दोन महिने आपण परदेशात गेल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांना त्यांचा उग्रपणा दिसायचा. मात्र त्यांच्यातील संवेदनशील व्यक्ती खूप जवळून पाहिली आहे. प्रत्येक कामात अव्वल स्थानावर राहणे त्यांना आवडायचेच, मात्र जे ठरवले ते पार पाडल्याशिवाय ते स्वस्थ बसायचे नाहीत. आज ते हयात असते, तर सर्व दोस्तांनी त्यांचा ६३वा वाढदिवस साजरा केला असता, असे चंद्रा म्हणाले.
राज्यसभेच्या निवडणुकीत मला मोलाची मदत करणाºया दोन व्यक्तींमधील मुकेश पटेल हे अत्यंत महत्त्वाचे होते, अशा शब्दांत ‘लोकमत’ मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी पटेल यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, की प्रफुल्ल पटेल आणि मुकेश पटेल यांनी माझ्या निवडणुकीची सूत्रे हाती घेतल्याने मला जिंकणे शक्य झाले. शत्रुत्त्वातही प्रेम करणारे मुकेश यांचे व्यक्तिमत्त्व होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असो वा उद्योगपती धीरूभाई अंबानी या सर्वांशी त्यांनी अतूट नाते निर्माण केले होते. आमचे बंगले वेगवेगळे असले, तरी आम्ही एकत्रित राहायचो. मात्र अल्पशा आजाराने त्यांना हिरावून नेले. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे दोन्ही भाऊ अमरिश आणि भूपेश करत असलेले प्रयत्न महत्त्वाचे आहेत. या सर्वांनी उभी केलेली ही संस्था आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विद्यापीठांनाही लाजवेल, अशी आहे. त्या जिंदादिल माणसाची स्मृती सभागृहाच्या रूपात जिवंत ठेवून त्याच्या लोकार्पणाचा मान आम्हा मित्रांना दिला हा आमचाच गौरव आहे. त्यामुळे भाऊ असावेत तर असे, अशा शब्दांत विजय दर्डा यांनी पटेल भावंडांचे आभार मानले.
‘एसव्हीकेएम’ संस्थेचे चेअरमन आणि कुलपती अमरिश पटेल यांनी मुकेश यांच्या नरसी मोनजी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीजच्या रूपात केलेल्या शैक्षणिक कार्याला उजाळा दिला. अमरिश पटेल म्हणाले, की लाखो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे ‘व्हीजन’ समोर ठेवून या संस्थेची सुरुवात झाली. आज जगभर ही संस्था नावारूपाला आलेली आहे. जगाचा निरोप घेताना मुकेश आम्हाला ‘व्हीजन’ देऊन गेले. तेच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मुकेश यांच्यासारखा पती, पिता, भाऊ होणे नाही, असे म्हणताना अमरिश पटेल यांना अश्रू अनावर झाले.

पटेल कुटुंबीयही
झाले भावूक
मुकेश पटेल यांचा मुलगा तपन आणि मुलगी मेहा यांच्यासह त्यांचे व्याही पंकज पटेल यांनी आपल्या भावना मांडल्या. त्या ऐकून पटेल यांची पत्नी केतकीबेन यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
पंकज पटेल म्हणाले, की विजय दर्डा यांनीच अहमदाबाद येथे मुकेश पटेल यांच्याशी माझी पहिली भेट घडविली. त्यानंतर आम्ही व्याही झालो. मुकेश हे स्वभावाने अत्यंत निर्भीड होते.

पुन्हा शिकण्याची इच्छा
मुकेशचे स्वप्न प्रत्यक्षात साकारताना पाहतोय. प्रत्येक ठिकाणी भावा-भावांना लढताना पाहिले आहे, मात्र येथे दोन भाऊ आपल्या दिवंगत भावाच्या स्वप्नासाठी जगाशी लढत आहेत. त्यांना मनापासून सलाम करतो. शिरपूर आणि मुंबईत त्यांनी उभारलेल्या संस्था पाहून पुन्हा शिकावेसे वाटते.
- ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र
झोकून देण्याची वृत्ती
मित्र परिवाराला जोडण्याचे मोलाचे काम त्यांनी केले. हाती घेतलेला अजेंडा पूर्ण करण्यासाठी ते इरेला पेटायचे. संस्था वाढवण्याच्या ध्येयाने त्यांना झपाटले होते. केवळ पैशांनी संस्था मोठी होत नाही, तर त्यांनी त्यांची झोकून देण्याची वृत्ती आणि बांधिलकीने संस्थेला ‘चारचाँद’ लावले.
-प्रफुल्ल पटेल,
माजी केंद्रीय मंत्री
जे करू ते जगात मोठे
शिक्षणसारख्या महत्त्वाच्या विषयावर त्यांनी काम केले. जे काही करू, ते जगात मोठे असेल, अशी त्यांची वृत्ती होती. मुकेश यांनी उभारलेल्या संस्थेत मेरीटवर प्रवेश दिला जातो. कोणत्याही बड्या नेत्याला ते संस्थेच्या कामात व्यत्यय आणू देत नसत, याचा अभिमान वाटतो. त्यामुळेच ही एक उत्तम संस्था म्हणून नावारूपाला आली आहे.
- सुशीलकुमार शिंदे,
माजी मुख्यमंत्री
मित्रांसाठी
जीव देण्याची तयारी
मुकेशजी जे ठरवतील, ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नव्हते. हट्टाला पेटले, की ते माघार घ्यायचे नाहीत. सर्व पक्षांशी चांगले संबंध त्यांनी जोपासले. दोस्तांसाठी जीवही देण्याची तयारी ते दाखवायचे. या सभागृहाच्या रूपात त्यांच्या आठवणी सदैव जागृत राहतील.
- सुरेशदादा जैन,
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते

Web Title: Mukesh Patel's Hall of Worship at Vile Parle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.