मोबाइलचा ‘आयएमईआय’ बदलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:02 AM2019-03-01T01:02:50+5:302019-03-01T01:02:57+5:30

७४ मोबाइल हस्तगत : गुन्हे शाखेने केली दुकलीस अटक

Mobile's 'IMEI' changed party exposed | मोबाइलचा ‘आयएमईआय’ बदलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मोबाइलचा ‘आयएमईआय’ बदलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Next

मुंबई : आपला मोबाइल चोरीला गेला की ‘इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी (आयएमईआय) क्रमांकावरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करतात. मात्र हा युनिक नंबरच मोबाइलमधून उडवून टाकणाऱ्या एका टोळीचा गुन्हे शाखेने गुरुवारी पर्दाफाश केला. गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ९ ने ही कारवाई केली असून, या प्रकरणी अटक केलेल्या दुकलीकडून ७४ मोबाइल हस्तगत केले आहेत.

शाहिमार खान आणि आमीर खान अशी अटक आरोपींची नावे आहेत. ते मुंबईत डंकन रोड येथील रहिवासी आहेत. जे. जे. मार्ग पोलिसांच्या हद्दीत मिर्झा गालिब मार्केटसमोर ए. एस. टेलिकॉम शॉपमध्ये आयएमईआय क्रमांक बदलण्याचे काम सुरू असल्याची माहिती कक्ष ९ चे प्रमुख महेश देसाई यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक कोरे तसेच पथकाने गुरुवारी या दुकानात छापा टाकला. या वेळी शाहिमार आणि आमीरला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून ७४ मोबाइलसह दोन लॅपटॉप, मोबाइल लॉक उघडणारी व आयएमईआय क्रमांक बदलणारी मशीनही हस्तगत केली आहे. हे सर्व मोबाइल चोरीचे असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


दोघांना करण्यात आलेल्या या अटकेमुळे मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात मदत मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले़

पाचशे आणि हजार रुपयांत उघडायचे ‘लॉक’
मोबाइलमधील काही खासगी आणि गुप्त माहिती लपविण्यासाठी त्यात विशिष्ट लॉक घातले जाते. मात्र हे दोघे अवघ्या पाचशे ते हजार रुपयांमध्ये चोरीच्या मोबाइलमधील हे लॉक उघडून अथवा आयएमईआय क्रमांक डीलीट करून द्यायचे. त्यामुळे अनेक चोर त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

Web Title: Mobile's 'IMEI' changed party exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल