“टोलनाक्यांवर सुविधा नाहीत, रोड टॅक्स घेता मग टोल कशाला?”; राज ठाकरेंचा CM शिंदेंना थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 05:59 PM2023-10-12T17:59:18+5:302023-10-12T18:03:11+5:30

Raj Thackeray And CM Eknath Shinde Meet: टोलनाक्यांवरील सुविधांच्या अभावाचा मुद्दाही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीत उपस्थित केल्याचे सांगितले जात आहे.

mns raj thackeray meets cm eknath shinde over toll naka plaza issue | “टोलनाक्यांवर सुविधा नाहीत, रोड टॅक्स घेता मग टोल कशाला?”; राज ठाकरेंचा CM शिंदेंना थेट सवाल

“टोलनाक्यांवर सुविधा नाहीत, रोड टॅक्स घेता मग टोल कशाला?”; राज ठाकरेंचा CM शिंदेंना थेट सवाल

Raj Thackeray And CM Eknath Shinde Meet: राज्यातील टोल आणि टोलनाक्यांच्या मुद्द्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्यातील टोलप्रश्नी अनेक मुद्दे मांडले. तसेच जनता जर रोड टॅक्स भरत असेल तर टोल कशासाठी घेता, असा सवाल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. 

राज्यातील टोलचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यातील विविध ठिकाणच्या टोलच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. टोलची दरवाढ करण्यात आली आहे ती करू नये, अशी मागणी करण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक निवेदन दिल्याचे म्हटले जात आहे.

टोल नाक्यांवर सुविधांचा अभाव का?

टोल नाक्यांवर सुविधांचा अभाव का, महिलांसाठी शौचालये का नाहीत, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. रस्त्यांची अवस्था चांगली नसल्याचा मुद्दा राज ठाकरे यांनी या बैठकीत उपस्थित केला. टोल वसुलीच्या माध्यमातून युती सरकारच्या काळातील उड्डाणपूल आणि रस्ते बांधणीचा खर्च वसूल करण्यात येत आहे. मात्र, आता २०२७ नंतर एमएमआरडीए टोल वसूल करणार असल्याचा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केला.  

सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ

आरटीओ विभागाचे ठाणे पासिंग असलेल्या MH 04 क्रमांकाच्या वाहनांना टोल माफ करायचा विचार सुरू आहे, यासंदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना दिले. १५ दिवस टोलनाक्यावर MSRDC कडून टोलवर व्हिडीओग्राफी केली जाणार आहे. त्यात MH 04 क्रमांकाची किती वाहने ये-जा करत आहेत, याचा आढावा घेऊन एक अहवाल सादर केला जाईल. त्याआधारे टोल माफीचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे सांगितले जाते. 

दरम्यान, वाशी टोलनाक्यासह इतर टोलनाक्यांवर सोयीसुविधांसाठी लवकरच एक समिती गठीत केली जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले. टोल नाक्यांवर पिवळी रेषा नसल्याची कबुली MSRDC च्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिल्याचे समजते.

 

Web Title: mns raj thackeray meets cm eknath shinde over toll naka plaza issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.