पक्षाच्या ‘यू-टर्न’मुळे मनसैनिक संभ्रमात; ईडीच्या कार्यालयाकडे फिरकू नका - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 04:24 AM2019-08-21T04:24:58+5:302019-08-21T04:25:15+5:30

नोटिसीचे वृत्त झळकताच मनसे नेत्यांनी ठाणे बंदची हाक दिली, मात्र तासाभरात बंद मागे घेण्यात आला.

MNS activists confusion caused by the party's 'U-turn' | पक्षाच्या ‘यू-टर्न’मुळे मनसैनिक संभ्रमात; ईडीच्या कार्यालयाकडे फिरकू नका - राज ठाकरे

पक्षाच्या ‘यू-टर्न’मुळे मनसैनिक संभ्रमात; ईडीच्या कार्यालयाकडे फिरकू नका - राज ठाकरे

Next

मुंबई : कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने राज ठाकरे यांना पाठविलेल्या नोटिसीनंतर मनसेतील गोंधळ पुन्हा एकदा समोर आला. नोटिसीचे वृत्त झळकताच मनसे नेत्यांनी ठाणे बंदची हाक दिली, मात्र तासाभरात बंद मागे घेण्यात आला. मंगळवारीही ईडीच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर अवघ्या तासाभरातच ईडीच्या कार्यालयावर फिरकूही नका असे ट्विट स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. सतत बदलणाऱ्या या भूमिकेमुळे कार्यकर्ते मात्र बुचकाळ्यात पडले आहेत.
ईडीने राज ठाकरे यांना नोटीस बजावून २२ आॅगस्टला चौकशीसाठी हजर होण्याचे फर्मान सोडले आहे. त्यानंतर बंद, मोर्चाबाबत मनसे नेत्यांकडून वेगवेगळी विधाने येत होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी ‘राजगड’ पक्ष कार्यालयात मनसे नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर यांनी शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती दिली. पक्षाची भूमिका असल्याने कार्यकर्ते आक्रमक होणार नाहीत. पोलिसांना सहकार्य करतील. उलट, सत्ताधारीच या आंदोलनात घुसून गोंधळ निर्माण करण्याची शक्यताही नांदगावरकर यांनी वर्तवली.
नांदगावर यांच्या पत्रकार परिषदेनंतर तासाभरातच राज ठाकरे यांनी टिष्ट्वटरवर ईडीकडे फिरकूसुद्धा नका, असा मेसेज केला. अंमलबजावणी संचालनालयाच्या नोटीसीचाही आदर करू. नोटीस आणि खटल्यांची आपल्याला आता सवय झाली आहे. मात्र, २२ तारखेला शांतता राखा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नका. कुणीही 'ईडी'च्या कार्यालयाबाहेर जमू नका. तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न झाला तरी शांत राहा. बाकी या विषयावर मला जे बोलायचं आहे ते योग्य वेळी बोलेनच,' असे राज यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये स्पष्ट केले.

मनसेने का घेतली माघार?
अचानक मोर्चा रद्द करण्याच्या निर्णय घेतल्याने उलटसुलट चर्चा रंगली. निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा आंदोलन, केसेसचा प्रकार परवडणारा नाही. ईडीची चौकशी कितीवेळ चालेल, याबाबत काहीही कल्पना नाही. त्यामुळे चौकशी दरम्यान आंदोलक कार्यकर्त्यांना शांत ठेवणे मोठे आवाहन बनेल.
शिवाय, एखाद्यानेही गडबड केली तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाय, ईडी कितीवेळा चौकशीला बोलावेल याचीही कल्पना नाही.
पुन्हा चौकशीला बोलावल्यानंतर तितकेच आंदोलक न आल्यास त्याच्याही उलट बातम्या होतील. हा सारा प्रकार टाळण्यासाठी मोर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मनसेतील सुत्रांनी दिली.

Web Title: MNS activists confusion caused by the party's 'U-turn'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.