आयआयटीमधील ‘ती’ खानावळ सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 06:13 AM2019-04-08T06:13:26+5:302019-04-08T06:13:33+5:30

मुंबई : आयआयटी बॉम्बे येथील हॉस्टेल १० मधील विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली होती़ त्यामुळे येथील खानावळ बंद ठेवण्यात आली ...

mess will be started in IIT | आयआयटीमधील ‘ती’ खानावळ सुरू होणार

आयआयटीमधील ‘ती’ खानावळ सुरू होणार

googlenewsNext

मुंबई : आयआयटी बॉम्बे येथील हॉस्टेल १० मधील विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली होती़ त्यामुळे येथील खानावळ बंद ठेवण्यात आली होती़ आता ही खानावळ डागडुजीच्या कामानंतर येत्या दोन ते तीन दिवसांत पुन्हा सुरू होणार आहे़ आधीचाच कंत्राटदार पुढील सत्र संपेपर्यंत खानावळ चालवणार आहे़ त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये नाराजी आहे़


विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार, ९ मार्च रोजी रात्रीच्या जेवणानंतर ४५ मिनिटांच्या आतच विद्यार्थिनींना पोटदुखी आणि उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर, ५७ विद्यार्थिनींना तातडीने संस्थेच्या आवारातील रुग्णालयात नेऊन उपचार देण्यात आले़ त्यामुळे अनर्थ टळला. या घटनेनंतर स्वच्छतेसाठी म्हणून होस्टेलची खानावळ बंद ठेवण्यात आली होती.


या संदर्भात आयआयटी इनसाइटने सहायक उपकुलसचिव जोगळेकर याना माहिती विचारली असता, अद्याप या प्रकरणाची चौकशी सुरू असून, यापुढे या कंत्राटदाराविषयी तक्रार आढळल्यास त्याला ब्लॅकलिस्ट केले जाऊन नवीन कंत्राटदाराची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे ही खानावळ हे सत्र संपेपर्यंत संपूर्ण स्वच्छतेसह सुरू राहणार असल्याची माहिती इनसाइट रिपोर्टद्वारे मिळत आहे.


भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, याची काळजी प्रशासन घेईल. त्याचप्रमाणे, डिसेंबर, जानेवारीमध्ये करण्यात आलेले फूड आॅडिट्स येत्या सत्रातही केले जातील. त्यानुसार, सगळ्या हॉस्टेलमधील वॉर्डन्सना सूचना दिल्या जातील, अशी माहिती जोगळेकर यांनी दिली. याशिवाय आयआयटीमधील फूड इटरिजसाठी हायजिन कमिटी नेमण्यात आली असून, साधा उंदीर जरी दिसला, तरी ५ हजारांपासून दंड आकारण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

हॉस्टेलच्या निधी स्वरूपात दंड जमा
हॉस्टेल १०ला अन्न पुरविणाऱ्या कंत्राटदाराविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलने केली आहे़त या आधीही त्यांच्यावर अन्नसुरक्षा आणि स्वच्छता यांच्या नियमनाचे उल्लंघन केल्याने दंड ठोठावण्यात आला आहे. हॉस्टेल १०ने तयार केलेल्या अहवालाप्रमाणे या आधीही जेवणात अळ्या, प्लॅस्टिक, नखे आढळून आल्याचे नमूद केले आहे. हा दंड हॉस्टेलच्या निधी स्वरूपात जमा केला आहे.

Web Title: mess will be started in IIT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.