शिंदे गटाच्या सत्तार, भुसे, राठोडांचं एकेक खातं बदललं; पाहा कुणाचं कोणतं खातं कुणाकडे गेलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 05:19 PM2023-07-14T17:19:39+5:302023-07-14T17:25:38+5:30

Maharashtra Cabinet Department Allocation: अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आले असून, शिवसेना शिंदे गटाची कोणती खाती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. पाहा, डिटेल्स...

maharashtra cabinet portfolio allocation know about which department of shiv sena shinde group give to ncp ministers | शिंदे गटाच्या सत्तार, भुसे, राठोडांचं एकेक खातं बदललं; पाहा कुणाचं कोणतं खातं कुणाकडे गेलं!

शिंदे गटाच्या सत्तार, भुसे, राठोडांचं एकेक खातं बदललं; पाहा कुणाचं कोणतं खातं कुणाकडे गेलं!

googlenewsNext

Maharashtra Cabinet Department Allocation: गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बैठका, शिंदे गटातील अस्वस्थता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दिल्लीवारी यांसारख्या घडामोडींनंतर अखेर शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. या खातेवाटपात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे असलेली काही खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना देण्यात आली. शिवसेना शिंदे गटातील स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, दादा भुसे आणि संजय राठोड यांच्याकडील एकेक खाते कमी करण्यात आले असून, ते खाते राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले आहे. 

शिवसेना शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी खाते होते. मात्र, यावरून आरोप-प्रत्यारोप झाले होते. यानंतर आता अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले असून, या खात्याचा कार्यभार आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आला आहे. यानंतर अब्दुल सत्तार यांच्याकडे आता अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन ही खाती आहेत. दुसरीकडे, दादा भुसे यांच्याकडे असलेला बंदरे हा विभाग आता राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे यांना देण्यात आला आहे. नवीन खातेवाटपानंतर आता दादा भुसे यांच्याकडे  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाते आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील कोणती खाती राष्ट्रवादीला?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील काही खाती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहेत. यामध्ये विशेष सहाय्य विभाग हा हसन मुश्रीफ यांना देण्यात आला आहे. तसेच मदत पुनर्वसन खाते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल पाटील यांना देण्यात आले आहे. नवीन खातेवाटपानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय ही खाती राहिली आहेत. तसेच संजय राठोड यांच्याकडे असलेले अन्न व औषधी खाते राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मराव अत्राम यांना देण्यात आले आहे. यानंतर संजय राठोड यांच्याकडे आता, मृद व जलसंधारण खाते राहिले आहे. 

भाजपकडे असलेली खातीही राष्ट्रवादी काँग्रेसला दिली

उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले अर्थ  व नियोजन खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती आहेत. तर, रवींद्र चव्हाण यांच्याकडे असलेले अन्न नागरी पुरवठा खाते छगन भुजबळ यांना देण्यात आले आहे. यानंतर आता रवींद्र चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खाते आहे. 

दरम्यान, अतुल सावे यांच्याकडे असलेले सहकार खाते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आले आहे. यानंतर आता अतुल सावे यांच्याकडे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण ही खाती आहेत. तर, मंगलप्रभात लोढा यांच्याकडे असलेले महिला व बाल कल्याण खाते हे अदिती तटकरे यांना देण्यात आले आहे. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे आता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता अशी खाती आहेत. विशेष म्हणजे गिरीश महाजन यांच्याकडे असलेली दोन खाती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहेत. क्रीडा आणि वैद्यकीय शिक्षण ही खाती अनुक्रमे संजय बनसोडे आणि हसन मुश्रीफ यांना देण्यात आली आहेत. आता गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन ही खाती आहेत. 

 

Web Title: maharashtra cabinet portfolio allocation know about which department of shiv sena shinde group give to ncp ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.