शालेय क्रिकेटला बसला ‘महाराष्ट्र बंद’चा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 06:56 AM2018-01-04T06:56:19+5:302018-01-04T11:00:12+5:30

बुधवारी झालेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला असतानाच याचा काहीसा परिणाम मुंबई शालेय क्रिकेटवरही झाला. मुंबई शालेय क्रिकेटमधील प्रतिष्ठेची असलेल्या १४ वर्षांखालील गाइल्स क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्याच्या दुस-या दिवशी बोरीवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलने (एसव्हीआयएस) सुरक्षिततेच्या कारणास्तव आपल्या संघाला पाठवले नाही.

 'Maharashtra Bandh' hit school cricket | शालेय क्रिकेटला बसला ‘महाराष्ट्र बंद’चा फटका

शालेय क्रिकेटला बसला ‘महाराष्ट्र बंद’चा फटका

Next

मुंबई  - बुधवारी झालेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला असतानाच याचा काहीसा परिणाम मुंबई शालेय क्रिकेटवरही झाला. मुंबई शालेय क्रिकेटमधील प्रतिष्ठेची असलेल्या १४ वर्षांखालील गाइल्स क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्याच्या दुस-या दिवशी बोरीवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलने (एसव्हीआयएस) सुरक्षिततेच्या कारणास्तव आपल्या संघाला पाठवले नाही. अशा परिस्थितीत मुंबई शालेय क्रीडा संघटनेने (एमएसएसए) प्रतिस्पर्धी संघ रिझवी स्प्रिंगफिल्डला विजयी घोषित केले.
पोलीस जिमखानाच्या मैदानावर सुरू असलेल्या दोन दिवसीय उपांत्य सामन्यात रिझवी स्प्रिंगफिल्डने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसअखेर ८१ षटकांत ३ बाद ३५२ धावांची भक्कम मजल मारली होती. मात्र, कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनामुळे ‘एसव्हीआयएस’ व्यवस्थापनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेत या सामन्यासाठी सुरक्षिततेच्या कारणास्तव संघ न पाठविण्याचा निर्णयही घेतला. ‘एसव्हीआयएस’चे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी स्पर्धा आयोजकांना शाळेचा निर्णय कळवताना सामना एक दिवस पुढे ढकलण्याची विनंती केली. मात्र, आपली विनंती अमान्य करत आयोजकांनी प्रतिस्पर्धी संघाला विजयी घोषित केल्याचा आरोप लाड यांनी केला.
याविषयी ‘एमएसएसए’चे क्रिकेट सचिव नदिम मेमन यांना विचारले असता त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘बुधवारी दोन उपांत्य सामने होणार होते. पहिला सामना आयईएस सुळे गुरुजी विरुद्ध डॉन बॉस्को हायस्कूल असा होता. ‘एसव्हीआयएस’ संघ वगळता इतर तिन्ही संघ वेळेत आपआपल्या मैदानावर पोहोचले होते. खेळाडूंसाठी मैदानावर पोहोचण्याची वेळ सकाळी आठची होती. या वेळी आंदोलनाचा कोणताही परिणाम झालेला नव्हता.’

‘एसव्हीआयएस’ शालेय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देत शाळेचा संघ न पाठविण्याचा घेतलेला निर्णय आम्ही आयोजकांना कळवला होता. मात्र, तरीही त्यांनी सामना वेळेत सुरू होणार असल्याचे सांगितले. आम्हाला यासाठी एक दिवस वाढवून मिळण्याची अपेक्षा होती. आम्ही सामना खेळण्यास तयार होतो. परंतु, आम्हाला ती संधी मिळाली नाही.
- दिनेश लाड,
प्रशिक्षक, एसव्हीआयएस

आम्ही ‘एसव्हीआयएस’साठी पोलीस सुरक्षा पुरविण्यासही तयार होतो. परंतु, त्यांची मनस्थिती न खेळण्याची होती. इतर खेळाडू आणि कर्मचारी वेळेत मैदानावर पोहोचले होते. शिवाय आम्ही हा सामना एका दिवसाने पुढे ढकलण्याबाबतही पूर्ण प्रयत्न केले. परंतु मैदान उपलब्ध होणार नसल्याने नियमानुसार उपस्थित संघाला विजयी घोषित करण्यात आले.
- नदिम मेमन,
क्रिकेट सचिव, एमएसएसए

Web Title:  'Maharashtra Bandh' hit school cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.