महामुंबईतील जागांचा घोळ का मिटत नाही...? 

By अतुल कुलकर्णी | Published: April 15, 2024 08:14 AM2024-04-15T08:14:04+5:302024-04-15T08:15:31+5:30

भाजप आणि शिंदे सेनेमध्ये महामुंबईतील जागांचा घोळ अजूनही मिटत नाही.

lok sabha elections 2024 Why the mess of seats in Mahamumbai is not resolved | महामुंबईतील जागांचा घोळ का मिटत नाही...? 

महामुंबईतील जागांचा घोळ का मिटत नाही...? 

अतुल कुलकर्णी, संपादक मुंबई
भाजप आणि शिंदे सेनेमध्ये महामुंबईतील जागांचा घोळ अजूनही मिटत नाही. भाजपला हा घोळ जाणीवपूर्वक घालायचा आहे का? की शिंदे गटाला हव्या त्या जागा भाजपला देण्याची इच्छाच नाही, यामागे नेमकी कोणती कारणे दडली आहेत यावर प्रचंड राजकीय चर्चा सुरू आहेत, पण खरे उत्तर कोणीही द्यायला तयार नाही. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे शहरात भाजपच्या भव्य कार्यालयाचे उद्घाटन केले. त्या कार्यक्रमात त्यांनी ठाण्यात आपला पसारा वाढत आहे, त्यामुळे आपल्याला चांगल्या कार्यालयाची गरज असल्याचे सूचक विधान केले होते. 

अजूनही दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी- सिंधुदुर्ग या जागांचे उमेदवार महायुतीला ठरवता आलेले नाहीत. कोणता मतदारसंघ कोण लढवणार याविषयी अजून कोणतीही स्पष्टता नाही. पालघर घ्या आणि ठाणे सोडा, असे भाजपने शिंदे सेनेला सांगितले आहे. 

ठाणे जिल्ह्यात ठाणे, भिवंडी आणि कल्याण हे तीन लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यातील ठाणे लोकसभेत ४, भिवंडी लोकसभेत २, तर कल्याण लोकसभेत ३ असे ९ विधानसभेचे सदस्य भाजपचे आहेत, शिवाय भिवंडीचे विद्यमान खा. कपिल पाटील भाजपचे आहेत. शिवाय शिक्षक आमदार तसेच कोकण पदवीधर मतदार संघ देखील भाजपकडे आहे. ठाणे लोकसभेचे विद्यमान खा. राजन विचारे हे उद्धव ठाकरे गटाचे आहेत, तर कल्याणचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे हे शिंदे गटाचे आहेत. ठाणे जिल्ह्यात भाजपचे ११ तर शिंदे गटाचे ६ आमदार आहेत. मनसे, अजित पवार गट, शरद पवार गट आणि समाजवादी पक्षाचे प्रत्येकी एक आमदार आहेत. ठाणे जिल्ह्यात भाजपची ही वाढलेली ताकद आहे. 

शिवाय ६ महानगरपालिकांपैकी २ महानगरपालिका भाजपकडे तर ३ शिंदे गटाकडे होत्या. बदलत्या राजकीय समीकरणानंतर जेव्हा या ठिकाणी निवडणुका होतील, तेव्हा या सर्व महापालिका आणि अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका आपल्या ताब्यात आली पाहिजे यासाठी भाजपने आत्तापासून फिल्डिंग लावली आहे. 

पालघर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजेंद्र गावित आज जरी शिंदे गटाकडे असले तरी भाजपकडून उभे राहण्यात त्यांची कसलीही अडकाठी नसेल. पालघरमधील हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी जो पक्ष सत्तेत असेल त्यांच्यासोबत जाण्याला आजपर्यंत प्राधान्य देत आली आहे. रायगडमध्ये देखील भाजपने आत्तापासून नियोजन करणे सुरू केले आहे. त्यामुळेच त्या ठिकाणी वाटाघाटी करताना शिंदे गटापेक्षा अजित पवार गट जास्त सोपा ठरू शकतो, हे लक्षात आल्यामुळे सुनील तटकरे यांच्या उमेदवारीला भाजपने हिरवा कंदील दिला आहे. रायगड आणि पालघरमध्ये विधानसभेच्या १२ जागा आहेत. मुंबईच्या ६ लोकसभा मतदारसंघातल्या ३६ तर ठाणे जिल्ह्यातील ३ लोकसभा मतदारसंघातल्या १८ अशा ६६ विधानसभा मतदारसंघांवर भाजपने पूर्ण ताकदीने फिल्डिंग लावायचे नियोजन केले आहे. त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीत भाजपला ठाणे मतदारसंघ स्वतःकडे हवा आहे. 

महाराष्ट्राच्या विधानसभेत सध्या भाजपचे १०३, काँग्रेस ४३ अशी सदस्यसंख्या आहे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पडण्याआधी शिवसेनेचे ५५ आणि राष्ट्रवादीचे ५३ सदस्य होते. ही संख्या जर लक्षात घेतली तर भाजपला मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमधील ६६ विधानसभा मतदारसंघ किती महत्त्वाचे आहेत, हे लक्षात येईल. या एकाच बेल्टमधून किमान ५० जागा जिंकता आल्या तर विधानसभेचा मार्ग स्वबळावर सुकर होऊ शकतो, हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आले आहे. (सध्याच मुंबई आणि ठाण्यातील २५ आमदार भाजपचे आहेत.) त्यासाठी लोकसभेत पक्षाचे चिन्ह आणि कार्यकर्त्यांचे नेटवर्क गावागावात गेले पाहिजे म्हणून भाजपने लोकसभेच्या जागांचे उमेदवार जाहीर करण्यासाठी एवढे ताणून धरले आहे. 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे १३ खासदार गेले होते, त्यापैकी फक्त ७ जणांना उमेदवारी जाहीर झाली, तर ६ जणांना उमेदवारी मिळाली नाही. यापुढे महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भूमिका घेणारा एकच पक्ष म्हणजे भाजप, असे चित्र भाजपचे नेत्यांना हवे आहे. 

त्यामुळे हिंदुत्वाची भूमिका घेणारे अन्य कोणतेही पक्ष वाढू द्यायचे नाहीत, ही त्यामागची रणनीती असू शकते. अजित पवारांचा गट सत्तेत असला तरी त्या गटाने प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा कधीही लावून धरलेला नाही. एका ठाकरेंच्या पक्षाला कमी केल्यानंतर दुसरे ठाकरे किती वाढू द्यायचे, हे देखील भाजपने ठरवलेले दिसते. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी पाठिंबा दिल्याचे जाहीर केले असले तरी त्यांनाही मोजक्या जागा देऊन विशिष्ट मर्यादेत ठेवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच सुरुवातीला उल्लेख केलेल्या ७ लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार अजूनही जाहीर झालेले नाहीत. शेवटच्या क्षणापर्यंत जेवढे खेचता येईल, तेवढे खेचण्याचा हा प्रयत्न विधानसभेसाठी आहे हे नक्की.

Web Title: lok sabha elections 2024 Why the mess of seats in Mahamumbai is not resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.