'पीएम मोदींची जागा घेण्याचे फडणवीसांचे स्वप्न, म्हणूनच त्यांचे पंख कापले'; संजय राऊतांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 12:43 PM2024-04-21T12:43:38+5:302024-04-21T12:49:40+5:30

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

lok sabha election 2024 MP Sanjay Raut criticized on Devendra Fadnavis | 'पीएम मोदींची जागा घेण्याचे फडणवीसांचे स्वप्न, म्हणूनच त्यांचे पंख कापले'; संजय राऊतांचा पलटवार

'पीएम मोदींची जागा घेण्याचे फडणवीसांचे स्वप्न, म्हणूनच त्यांचे पंख कापले'; संजय राऊतांचा पलटवार

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ साली अडीच वर्षांनंतर दिल्लीत जाऊन काम करायचे होते, त्यांना अर्थ विभागात रस होता, असा दावा उद्धव ठाकरे यांनी काल केला. यानंतर फडणवीस यांनीही जोरदार पलटवार केला, यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

'शरद पवारांनीच शेतकऱ्यांवर सर्वाधिक अन्याय केला, उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती ढासळली'; चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र

"देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री बनले त्यावेळी त्यांच पंतप्रधान बनण्याच स्वप्न होतं, मोदींच्या जागेवर जाण्याच त्यांच स्पप्न होतं. त्यांना पहिलं गृहमंत्री बनायचं होतं, त्यामुळेच त्यांचे पंख कापले आहेत, असा पलटवार संजय राऊत यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं खर आहे, ठाकरे कधीच खोटं बोलत नाहीत, असंही राऊत म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

"दररोज एकेक कपोलकल्पित कथानक तयार करुन कुणाची दिशाभूल करता? स्वत:चीच ना?" असा सवाल देखील विचारला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही आदर केला, करतो आणि करीत राहू. पण, ज्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यागले, त्यांचा आदर आम्ही करु शकत नाही."

"हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख शब्दांचे पक्के होते आणि कधीच मागे हटत नव्हते. दिलेला प्रत्येक शब्द ते पाळायचे. संकुचित वृत्तीने त्यांनी कधीही स्वार्थाचा विचार केला नाही आणि त्यांच्या हयातभर खोटारडेपणा तर कधीच केला नाही. म्हणूनच ते आजही आमच्यासाठी वंदनीय आहेत.", 

"दररोज एकेक कपोलकल्पित कथानक तयार करुन कुणाची दिशाभूल करता? स्वत:चीच ना? महाराष्ट्राचे समाजकारण आणि महाराष्ट्राचा विकास ही काही सलिम-जावेदची स्क्रिप्ट नाही. समाजकारणाचा आणि विकासाचा तुम्हाला गंध नसला तरी उगाच अशा स्क्रीप्ट तयार करण्याच्या भानगडीत पडू नका. जशास तसे उत्तर दिले जाईल!" असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे

"उद्धव ठाकरे देशाचं नेतृ्त्वासाठी पर्याय असू शकतात, त्यांनी राज्याच मुख्यमंत्रीपद साभाळले आहे. इंडिया आघाडीत अनेक चेहरे आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये एकच चेहरा आहे, आता देशातील लोक त्यांना पाठिंबा देत नाहीत, असंही संजय राऊत म्हणाले. 

Web Title: lok sabha election 2024 MP Sanjay Raut criticized on Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.