महिलांनो, असुरक्षित वाटतंय...; ‘खाकीतील सखी’ला करा फोन

By मनीषा म्हात्रे | Published: March 8, 2024 01:04 PM2024-03-08T13:04:26+5:302024-03-08T13:05:09+5:30

अशाच प्रकारे अनेक महिला हक्काने रेल्वे पोलिसांच्या पडद्यामागील १०० खाकीतील सखींकडे त्यांच्या तक्रारी देत आहेत. महिला दिनानिमित्त हा खास वृत्तांत. 

Ladies, feeling insecure Call the 'friend in khaki' | महिलांनो, असुरक्षित वाटतंय...; ‘खाकीतील सखी’ला करा फोन

महिलांनो, असुरक्षित वाटतंय...; ‘खाकीतील सखी’ला करा फोन

मुंबई : पहाटे चार वाजता बोरीवलीतील तरुणीचा फोन आला. प्रियकर इमारतीखाली येऊन त्रास देत असल्याने ती  घाबरली होती.  मात्र, खाकीतील सखीने तिला धीर देत तत्काळ संबंधित पोलिसांशी संपर्क साधला. कुणालाही जास्त न कळता प्रियकराला ताब्यात घेतले. तरुणीनेही सुटकेचा निःश्वास टाकला. अशाच प्रकारे अनेक महिला हक्काने रेल्वे पोलिसांच्या पडद्यामागील १०० खाकीतील सखींकडे त्यांच्या तक्रारी देत आहेत. महिला दिनानिमित्त हा खास वृत्तांत. 

या उपक्रमाच्या प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक रश्मी धोंडीराम पांगशे म्हणाल्या, मुंबई सेंट्रल येथे काम करणाऱ्या सखीला या बुधवारी पहाटे चार वाजता तरुणीचा फोन आला होता. महिला पोलिसांनी तिला समजावून धीर दिला. घरच्यांना, सोसायटीतील लोकांना समजले तर त्रास होईल म्हणून तिने थेट खाकीतील सखीला कॉल करून याबाबत सांगितले. सखीने तत्काळ संबंधितांशी संपर्क करत प्रियकरावर कारवाई केली. अशाच प्रकारे प्रवासादरम्यान जाणवलेल्या सुरक्षेच्या समस्या महिलांनी अधिकारी तसेच महिला अंमलदारांना आपल्याच मैत्रिणी असल्याचे समजून कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

 सुरुवातीच्या टप्प्यात या सखींनी नेहमी प्रवास करणाऱ्या महिलांच्या विविध व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये त्यांचे संपर्क क्रमांक शेअर केले. महिला प्रवाशांसोबत मैत्रीचे संबंध निर्माण करत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. हजारो महिलांच्या ग्रुपमध्ये या सखींचे क्रमांक शेअर करण्यात येत आहे. 

रेल्वेतील महिला प्रवाशांना मिळतेय अनोखी साथ; १०० पोलिस ऑन ड्यूटी २४ तास

लोकल, प्लॅटफॉर्मवर खाकीतील सखींची माहिती आणि त्यांच्या क्रमांकाचे पत्रक महिलांना देण्यात येत आहेत. आतापर्यंत शेकडो तक्रारींचा निपटारा या सखींनी केला आहे.

सर्व महिलांचा प्रवास सुखद व सुरक्षित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या प्रवासात महिला प्रवाशांना आधार वाटावा. खटकणारी कोणतीही गोष्ट मन मोकळेपणाने कोणाशी तरी सांगता यावी यासाठी ‘खाकीतील सखी’ची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात ६ महिला पोलिस कार्यरत आहेत. १०० महिलांची टीम पहिल्या टप्प्यात खाकीतील सखी म्हणून मदतीसाठी सज्ज आहेत.
- डॉ. रवींद्र शिसवे, आयुक्त, मुंबई रेल्वे पोलिस

कोटो ॲपची जोड...
कोटो ॲप आता मुंबई रेल्वे पोलिसांबरोबर संयुक्तरीत्या काम करणार आहे. महिला प्रवासी त्यांच्या लोकल प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्यांची तक्रार करण्यासाठी कोटो समुदाय ॲप वापरू शकतात. ते त्यांच्या समस्यांबद्दल फोटो, व्हिडीओ आणि संदेश पोस्ट करू शकतात आणि रेल्वे पोलिस त्याप्रमाणे तत्काळ कारवाई करतील. कोटो म्हणजे ‘एकत्र’. केवळ महिलांसाठी असलेले सामाजिक समुदाय ॲप आहे.   

Web Title: Ladies, feeling insecure Call the 'friend in khaki'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.