कमला मिल आग : नाराज अग्निशमन अधिकारी देणार सामूहिक राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 04:27 AM2018-01-23T04:27:37+5:302018-01-23T04:28:11+5:30

कमला मिल कम्पाउंडमध्ये लागलेल्या भीषण आगीत जळून खाक झालेल्या ‘वन अबव्ह’ व ‘मोजोस बिस्ट्रो’ या रेस्टो पबमध्ये आग प्रतिबंधक नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचे चौकशीतून उजेडात आले आहे.

 Kamla Mill Fire: An angry firefighting officer resigns the collective resignation | कमला मिल आग : नाराज अग्निशमन अधिकारी देणार सामूहिक राजीनामे

कमला मिल आग : नाराज अग्निशमन अधिकारी देणार सामूहिक राजीनामे

googlenewsNext

मुंबई : कमला मिल कम्पाउंडमध्ये लागलेल्या भीषण आगीत जळून खाक झालेल्या ‘वन अबव्ह’ व ‘मोजोस बिस्ट्रो’ या रेस्टो पबमध्ये आग प्रतिबंधक नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचे चौकशीतून उजेडात आले आहे. या प्रकरणात विभागीय अग्निशमन अधिका-याचे निलंबन तर केंद्र अधिका-याला अटक करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईमुळे अग्निशमन दलात असंतोष पसरला असून, १४० अग्निशमन अधिकारी पदाचा सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. यामुळे अग्निशमन दलात खळबळ उडाली आहे.
गेल्या वर्षी २९ डिसेंबर रोजी या दोन रेस्टो पबला आग लागून १४ जणांचा मृत्यू झाला होता़ या दुर्घटनेचे तीव्र पडसाद उमटताच पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पाच अधिका-यांना तडकाफडकी निलंबित केले़ यामध्ये विभागीय अग्निशमन अधिकारी एस़ शिंदे यांचा समावेश होता़ दरम्यान, या दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल आयुक्तांनी नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला़ या चौकशीत अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी राजेंद्र पाटील यांना शनिवारी अटक करण्यात आल्याने अग्निशमन दलात खळबळ उडाली आहे़
पबची तपासणी करून आग प्रतिबंधक नियमांवर अंमल होत असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती़ मात्र, दुर्घटनेच्या एक आठवड्याआधी २३ डिसेंबर रोजी पाटील यांनी पबला ना हरकत प्रमाणपत्र देताना त्या ठिकाणी गच्चीवरील या पबवर शेड नसून नियमांनुसार काम सुरू असल्याचा अहवाल दिला होता़ पाटील यांनी स्वत: पबची पाहणी न करता पबच्या मालकाने दिलेल्या छायाचित्रावर विश्वास ठेवून हा अहवाल तयार केला असल्याचा संशय व्यक्त करीत आयुक्तांनी त्यांची खातेनिहाय चौकशी प्रस्तावित केली आहे.
आज निर्णय-
अधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत़ कारवाईमुळे त्यांच्यात असंतोष आहे़ मात्र, याबाबत चर्चा करून उद्या निर्णय जाहीर करू, असे मुंबई महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी प्रकाश देवदास यांनी सांगितले़ मात्र, अग्निशमन दल प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी अशा कोणत्याही घडामोडी घडल्या नसल्याचे म्हटले आहे.
यामुळे अग्निशमन अधिकारी झाले नाराज-
मुंबईतील सव्वा कोटी जनतेच्या सुरक्षेसाठी केवळ ३ हजार अग्निशमन जवान व अधिकारी आहेत़ मुंबईत दरवर्षी सरासरी साडेचार हजार आगीच्या घटना घडतात़ त्यात आग विझविण्याव्यतिरिक्त चौपाटीवर गस्त, तारांमध्ये अडकलेल्या पक्ष्यांची सुटका करणे, इमारत कोसळणे-दरड पडणे अशा आपत्तींतही मदतकार्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांना करावे लागते़
यात भरीस भर म्हणून इमारतींची तपासणी करण्याचे अतिरिक्त काम टाकण्यात आले़ आमचे काम केवळ आग विझविणे आहे, ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर त्या आस्थापनाकडून आग प्रतिबंधक नियमांचे पालन होते का? याची शहानिशा करण्याची जबाबदारी त्या वॉर्डची आहे़ त्यामुळे यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकाºयांना जबाबदार धरणे योग्य नाही, असे मत अधिकारी व्यक्त करीत आहेत.

Web Title:  Kamla Mill Fire: An angry firefighting officer resigns the collective resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.