#KamalaMillsFire: कमला मिलमधील आग प्रकरणामुळे थर्टीफर्स्ट अडचणीत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 04:52 AM2017-12-30T04:52:20+5:302017-12-30T04:52:36+5:30

मुंबई : कमला मिलमधील आग प्रकरणानंतर गच्चीवरील रेस्टॉरंट आणि पबमध्ये थर्टीफर्स्टनिमित्ताने रंगणा-या पार्ट्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

#KamalaMillsFire: Thirtyfirst in Kamala Mill fire problem? | #KamalaMillsFire: कमला मिलमधील आग प्रकरणामुळे थर्टीफर्स्ट अडचणीत ?

#KamalaMillsFire: कमला मिलमधील आग प्रकरणामुळे थर्टीफर्स्ट अडचणीत ?

Next

मुंबई : कमला मिलमधील आग प्रकरणानंतर गच्चीवरील रेस्टॉरंट आणि पबमध्ये थर्टीफर्स्टनिमित्ताने रंगणा-या पार्ट्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील अशा बड्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि पबची झाडाझडती सुरू केली आहे. त्यामुळे मुंबईतील अन्य हॉटेल्स मालकांचे धाबे दणाणले आहे.
थर्टीफर्स्टनिमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईतील गच्चीवरील रेस्टॉरंट आणि हॉटेलसहित, बड्या हॉटेल्स आणि पबमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे. मात्र कुठे तरी कमला मिलमधील अग्नितांडवामुळे जागे झालेल्या प्रशासनाने अशा हॉटेलकडे धाव घेतलेली दिसते. मुंबईतील स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या हॉटेलमालकांना अशा पार्ट्या न करण्याबाबत सल्ला देण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वत: या मालकांची भेट घेत आहेत. याचा कितपत प्रभाव पडेल हे थर्टीफर्स्टच्या दिवशीच पाहावयास मिळेल. मात्र या घटनेमुळे मुंबईकरांनी धसका घेतला आहे हे तितकेच खरे.
मुंबईत आजही हजारो हॉटेल्समध्ये अग्नी सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच नियमावलींना पायदळी तुडवत पोलीस, पालिका, अग्निशमन दल, संबंधित परवाने देणाºया यंत्रणांना हाताशी धरून यातील काही मंडळींचे फावते. त्यामुळे या कारवाईनंतर तरी प्रशासन ठोस पावले उचलणार का, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. यापूर्वी आॅक्टोबर २०१५ मध्ये कुर्ला येथील सिटी किनारा हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत ७ विद्यार्थ्यांसह ८ जणांचा बळी गेला होता. तेव्हाही हॉटेलमधील अग्नी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. सुरुवातीचे काही दिवस गाजावाजा झाला. मात्र प्रकरण थंडावल्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याचे पुन्हा उघड झाले आहे.
>वन अबव्हवर यापूर्वी ८ वेळा कारवाई
दोन दिवसांपूर्वीच वन अबव्हवर नियमीत वेळेपेक्षा जास्त वेळ पब सुरू ठेवणे, हुक्का पार्लर चालवणे आणि ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करत १२ हजारांचा दंड आकरण्यात आला होता. तसेच यापूर्वीही अशा स्वरूपाच्या ८ कारवाई झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
>परिसरात शुकशुकाट
कमला मिल कम्पाउंडमधील पब, रेस्टॉरंट रोज सायंकाळनंतर तरुणाईच्या गर्दीने गजबजून गेलेले असतात. रात्री उशिरापर्यंत परिसरात रीघ असते. आगीच्या दुर्घटनेमुळे शुक्रवारी सायंकाळी मात्र या परिसरात शुकशुकाट होता. उपस्थितांमध्ये दुर्घटनेबाबतच चर्चा सुरू होती. परिसरातील साऊ थ कॅफे, दिल्ली हाईट्स ही हॉटेल्स सुरू होती; मात्र त्यामध्ये फारसे ग्राहक नव्हते.
>तीन संचालकांसह चौघांविरुद्ध गुन्हा
कमला मिल आग प्रकरणात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत १४ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वन अबव्हच्या तीन संचालकांसह तेथील व्यवस्थापकावर एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, तिघेही संचालक पसार झाले असून त्यांच्याविरुद्ध लूक आऊट नोटीसही जारी केली आहे. क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजित मानकर अशी या संचालकांची नावे असून ते मे. सी. ग्रेड हॉस्पिटॅलिटी व एंटरटेनमेंट एलएलपी या कंपनींतर्गत तिन्ही संचालक वन अबव्ह हे पब अ‍ॅण्ड रेस्टॉरंट चालवत होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पबमधील हुक्क्यामुळे लाकडी छताने पेट घतला आणि आग लागल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी याला दुजोरा दिला नाही. आतमध्ये हुक्का ओढतच नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. प्राथमिक तपासात या रेस्टॉरंटचा निष्काळजीपणा समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी आतापर्यंत २० हून अधिक जणांचे जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास रायकर यांनी दिली. घटनेची वर्दी लागताच तिन्ही संचालक पसार झाल्याची माहिती समोर येत आहे. तिघेही भायखळा येथील रहिवासी आहेत. घरच्यांनाही त्यांच्याबाबत काहीही माहिती नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी संघवी कुटुंबीयांच्या दोघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी दिली.
>राज्यपालांनी व्यक्त केले दु:ख
लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमध्ये गुरुवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या निरपराध व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत. आगीत जखमी झालेल्या व्यक्तींना लवकर आराम पडो, अशी प्रार्थना करीत आहे, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
>कमला मिलमधील बांधकामांचे होणार आॅडिट
कमला मिल कम्पाउंडमधील ‘वन-अबव्ह’ आणि ‘मोजोस बिस्ट्रो’ या पबना लागलेल्या आगीप्रकरणी पब मालकांवर कारवाई करण्यात येत असून दुर्घटनेला जबाबदार असणाºयांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. शिवाय, कम्पाउंडमधील बांधकामे आणि पबना परवानग्या देण्याबाबत महापालिका अधिकाºयांनी जाणूनबुजून निष्काळजीपणा दाखवला असेल, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. कमला मिल कम्पाउंडमधील बांधकामे आणि त्यांना देण्यात आलेल्या परवानग्यांबाबत चौकशी करण्यात येणार आहे. येथील बांधकामांचे युद्धपातळीवर आॅडिट करण्यात येणार असून या पाहणीत जर अनधिकृत बांधकामे आढळल्यास ती तत्काळ पाडली जातील. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
>हा तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा-तावडे
या घटनेतील दोषींविरुध्द फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून यामध्ये दोषी असलेल्या व्यक्तिंविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि या दुर्घटनेत जीव गमाविलेल्या निष्पापांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
>सीबीआयमार्फत चौकशी करा-विखे पाटील
कमला मिल कंपाऊंडमधील हॉटेल्सला आग लागून झालेला १४ जणांचा मृत्यू हे मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे बळी आहेत. अशा घटनांची पालिका आयुक्तांमार्फत नको, तर सीबीआयमार्फतच चौकशी करा अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
>कडक कारवाई करा- अशोक चव्हाण
कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीची उच्चस्तरीय चौकशी करून या घटनेला जबाबदार असणाºयांवर कडक कारवाई करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. मुंबई शहरात विविध दुर्घटनांमध्ये किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत. घटना घडल्यावर सरकार फक्त चौकशीचे आदेश देते, पंरतु ठोस कारवाई होत नाही. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नाहीत.
>मुंबई महापालिकाच जबाबदार
कमला मिल आगीच्या दुर्घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. या भागातील रेस्टॉरंट, हॉटेल व पबला कोणतीही चौकशी न करता परवानगी देणारे आयुक्त कार्यालयातील अधिकारी जबाबदार आहेत. संबंधित दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. मुंबई महापालिका या घटनेला जबाबदार आहे. या ठिकाणच्या बांधकामांना किंवा अन्य परवानग्या देताना वेगळा न्याय दिला जातो. याबाबत प्रशासनाला विचारल्यावर नियमानुसार परवानग्या देण्यात आल्याचे उत्तर अधिकाºयांकडून दिले जाते. या अधिकाºयांवर कारवाई व्हायला हवी. केवळ छोट्या अधिकाºयांचा बळी देऊन विषय संपवता कामा नये. आयुक्तांपर्यंत या विषयाचे धागेदोरे पोहोचतात. - सुनील शिंदे, आमदार, शिवसेना
>ही स्थानिक लोकप्रतिनिधींचीही जबाबदारी
कमला मिल येथील अग्नितांडवाला हॉटेल मालक, जमीन मालक आणि प्रशासन जबाबदार असून या सर्वांवर कठोर कारवाई व्हायला हवी. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. या चौकशीअंती दोषी आढळलेल्या सर्वांवर कठोर कारवाई होईलच. पण अशा घटना रोखण्याची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधींचीही आहे. - प्रसाद लाड, भाजपा आमदार
>न्यायालयीन चौकशी करा
या हॉटेलमध्ये नियमितपणे फायर शो चालत होता. हॉटेलच्या मोकळ्या जागेवर वेदरशेडची परवानगी असतानाही बारमाही वापरात असलेले छप्पर होते. त्यामुळे आग हॉटेलच्या आतल्या बाजूस पसरली शिवाय धुराचा निचराही झाला नाही. अनेक जण हे आगीच्या भक्षस्थानी पडून होरपळून नव्हे तर धुराने गुदमरून मरण पावले. या संपूर्ण प्रकरणाला हॉटेल व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा आणि महापालिका प्रशासनाचा भ्रष्टाचार कारणीभूत आहे. पालिका प्रशासनच या घटनेला जबाबदार असताना पालिका आयुक्तांकडून या दुर्घटनेची चौकशी करण्याऐवजी स्वतंत्रपणे न्यायालयीन चौकशी केली जावी.
- सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई अध्यक्ष
>पालिका आयुक्तांची हकालपट्टी करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईकरांची चिंता असेल तर त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन किंवा सीबीआय चौकशीचे आदेश द्यावेत. अलीकडेच साकीनाका येथील आगीत १२ जणांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा आगीची दुर्घटना घडली. या दोन्ही प्रकरणांना मुंबई महानगरपालिका जबाबदार आहे. त्यामुळे मनपा आयुक्त अजय मेहता यांचीदेखील हकालपट्टी करावी.
- संजय निरुपम, मुंबई काँग्रेस अध्यक्ष
>घटनेची माहिती सकाळी

Web Title: #KamalaMillsFire: Thirtyfirst in Kamala Mill fire problem?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.